भाजपचे ध्येय २२ पेक्षा अधिक जागांचे ः मुख्यमंत्री

0
18

>> पणजीत भाजपचे बाबूश मोन्सेरात हेच उमेदवार

येती विधानसभा निवडणूक ही गोव्याला विकासाच्या समृद्धीकडे नेणारी आहे. त्यासाठी २०२२ मध्ये २२ पेक्षा अधिक जागा मिळवण्याचे ध्येय भाजपचे आहे. गोव्याच्या समृद्ध विकासासाठी आणि अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपची सत्ता गोव्यात येणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले.

पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार बाबूश मोन्सेरात, महाराष्ट्रातील आमदार संजय केळकर व ऍड. निरंजन डावखरे, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पणजीचा भरीव विकास झालेला आहे. बाबूश मोन्सेरात हेच भाजपचे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात उमेदवारच कुठे दिसत नाहीअसे सांगून स्वतःच्या राज्यात एकही योजना न राबवणारे गोवेकरांना मात्र फुकट देण्याचे आश्वासन देत आहेत. येथे योजना जाहीर केल्या त्या स्वतःच्या राज्यात लागू कराव्यात असे आव्हान तृणमूल व आपचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी तानावडे यांनी, विकासाचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर ठेवून भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे. विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा भाजपच सत्तेवर येणे गरजेचे असल्याचे सांगितले.

भाजप मोठा परिवार आहे. गोव्याचा आणि पणजीचा विकास करण्याचे ध्येय आपण ठेवलेले असून जर मनोहर पर्रीकर उमेदवार असते तर आपण त्यांच्या विरोधात कधीच उभा राहिलो नसतो असे मोन्सेरात यांनी यावेळी सांगितले. उपमहापौर वसंता आगशिकर यांनी विकासकामांचा आढावा घेतला.