जहरी फुत्कार

0
111

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर हिज्बूल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दिनला अमेरिकेच्या गृह खात्याने ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले खरे, परंतु त्यातून काही साध्य होईल असे वाटत नाही. या सलाहुद्दिनने नुकतीच पाकिस्तानच्या ‘जिओ टीव्ही’ ला एक मुलाखत दिली आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर आपली संघटना दहशतवादी हल्ले चढवीत आल्याची सुस्पष्ट कबुली तर त्याने दिली आहेच, वर अमेरिकेच्या त्या निर्णयाचीही खिल्ली उडवली आहे. याच सलाहुद्दिनने ‘काश्मीर खोरे आता भारतीय सुरक्षा दलांचे स्मशान बनेल’ अशी धमकी गेल्या वर्षी दिली होती. बुरहान वानीचा खात्मा झाला त्याला येत्या ८ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होईल. त्यानिमित्ताने आठवडाभर काश्मीर खोरे पेटवण्याचा संकल्पही त्याने केलेला आहे. पाकिस्तानात राहून आयएसआयच्या आश्रयाने भारतविरोधात विष ओकत राहिलेल्या या सलाहुद्दिनचा खात्मा जोवर होत नाही, तोवर भारताची सुरक्षा नीती बचावात्मक रूपातच राहील. अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी सूचित केले खरे, परंतु त्या निर्णयाची भाषा जर वाचली तर केवळ अमेरिकी नागरिकांचे हित विचारात घेऊन तो निर्णय अमेरिेकेने घेतल्याचे स्पष्ट होते. भारताशी आणि काश्मीरमधील रक्तपाताशी त्याचा काहीही संबंध नाही. शिवाय अमेरिकेने संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख करताना ‘भारताच्या हाताखालील काश्मीर’ असाच केला आहे. अमेरिकेची दुटप्पी नीतीच त्यातून अधोरेखित होते. अमेरिकेने जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर सलाहुद्दिनच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने एक निवेदन दिले. खुद्द सलाहुद्दिनने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादेत एक पत्रकार परिषदही घेतली. म्हणजेच सलाहुद्दिनचे उघडउघड समर्थन पाकिस्तान करीत आलेला आहे. हिज्बूल मुजाहिद्दीनचे आणि युनायटेड जिहाद कौन्सिलचे नेतृत्व करीत असलेल्या या सलाहुद्दिनला काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक म्हणून जगापुढे प्रस्तुत करण्याची पाकिस्तानची नेहमीच खेळी राहिली आहे. त्याला दहशतवादी मानण्यास पाकिस्तान आजही तयार नाही. स्वतः सलाहुद्दिनने आपण दहशतवादी हल्ले चढवल्याची कबुली जाहीरपणे दिली तरीही पाकिस्तान डोळ्यांवरील झापडे काढायला तयार नाही. ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी ‘काश्मीर ः द वाजपेयी इयर्स’ या पुस्तकात याच सलाहुद्दिनच्या मुलाला त्याच्या विनंतीवरून भारत सरकारने वैद्यकीय प्रवेश कसा मिळवून दिला ते नमूद केलेले आहे. अर्थात, त्याच्या मुलाने या गोष्टीचा इन्कार केला असला तरीही त्यामुळे सत्य काही लपत नाही. सलाहुद्दिन भारतात परतण्यास उत्सुक होता तेही दुलत यांनी सांगितले आहे. पण ती वेळ निघून गेली आहे. आज हाच सलाहुद्दिन मृत्यूदूत बनून काश्मीर पेटवण्यामागे लागलेला आहे. दक्षिण काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवाद्यांच्या फौजा निर्माण करण्याचा त्याचा पद्धतशीर प्रयत्न चालला आहे. एकेकाळी याच सलाहुद्दिन ऊर्फ महंमद युसूफ शाहने मुस्लीम युनायटेड फ्रंटच्या तिकिटावर श्रीनगरच्या अमिराकडालमधून विधानसभेची निवडणूकही लढवली होती. त्याची बायको आणि पाच मुले आजही काश्मीरमध्ये राहतात. विशेष म्हणजे पाम्पौरला जेव्हा उद्योजकता विकास संस्थेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा तिथल्या ज्या कर्मचार्‍यांची भारतीय लष्कराने सुटका केली, त्यात याच सलाहुद्दिनचा तेथे काम करणारा एक मुलगाही होता. परंतु साप शेवटी साप असतो. त्याला कितीही दूध पाजले, तरी तो उलटतोच. सय्यद सलाहुद्दिन हा असाच जहरी साप आहे. पाकिस्तानात राहून तो सतत फुत्कार सोडतो आहे. काश्मीर आज पुन्हा अशांततेच्या खाईत ढकलणार्‍या या सापाला ठेेचल्याविना आता पर्याय नाही.