भटकळमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा

0
97

दहशतवादी कटाची शक्यता

गोव्यापासून अवघ्या २१८ किलोमीटरवर असलेल्या भटकळ येथे बेंगलुरू पोलिसांनी काल टाकलेल्या छाप्यात बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट, इलेक्ट्रॉनिक टायमर, स्फोटके, पीव्हीसी पाइपचे तुकडे आदी साहित्य मिळाल्याने खळबळ माजली आहे. एखाद्या मोठ्या कटाचा पर्दाफाश यासंदर्भातील तपासातून होण्याची शक्यता आहे. बेंगलुरूत अलीकडेच झालेल्या स्फोटाचा तपास करणार्‍या पोलिसांनी तिघा दहशतवाद्यांना अटक केली असून भटकळ येथील एका आरोपीच्या घरात हे साहित्य सापडले आहे.बेंगलुरूचे पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी एका भरगच्च पत्रकार परिषदेत हा स्फोटकांचा साठा सापडल्याची माहिती दिली. अन्सार अल तौहिद नामक दहशतवादी संघटनेच्या सुलतान अहमद अरमार या दहशतवाद्याचे हस्तक असलेल्या तिघांना अटक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सईद इस्माईल अफाक (३४), सद्दाम हुसेन (३५) व अब्दुल सबूर (२४) अशी त्यांची नावे आहेत. बेंगलुरूच्या कॉक्स टाऊन भागातील एका घरात छापा टाकून दोघांना अटक करण्यात आली व तिसर्‍याला भटकळमधून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.हे तिघेही संशयित सुलतान अरमार याच्या सतत संपर्कात होते. अरमार हाही भटकळचाच असून तो सध्या भारताबाहेर पळाला आहे. तो संयुक्त अरब अमिरातीत असावा असा संशय आहे.
अटक झालेल्या तिन्ही संशयितांची बेंगलुरूच चौकशी सुरू असून त्यांचा कोणता नवा कट शिजत होता याचा शोध पोलीस घेत आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ गाव इंडियन मुजाहिद्दीनचा सूत्रधार यासिन भटकळ व रियाज भटकळमुळे कुख्यात बनले असून यासिन हा सध्या तुरूंगात आहे. देशाच्या विविध भागांत यापूर्वी झालेल्या स्फोटांचा संबंध भटकळमधील काही तरुणांशी असल्याचे यापूर्वी तपासात निष्पन्न झालेले आहे.