ब्लास्टर्सकडून हैदराबादचा धुव्वा

0
112

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) केरला ब्लास्टर्स एफसीने सहाव्या मोसमातील दुसर्‍या विजयाची प्रतीक्षा अखेर धडाक्यात संपुष्टात आणली. येथील नेहरू स्टेडियमवर ब्लास्टर्सने तळातील हैदराबाद एफसी संघावर ५-१ असा दणदणीत विजय मिळविला.
याबरोबरच ब्लास्टर्सने घरच्या मैदानावरील विजयी सलामीनंतर नऊ सामन्यांतील अपयशी मालिका संपुष्टात आणली. ब्लास्टर्सने गुणतक्त्‌यात नऊवरून दोन क्रमांक प्रगती करताना सातवे स्थान गाठले.

नायजेरियाचा ३५ वर्षीय स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे (३३वे व ७५वे मिनिट) याने दोन गोलांसह सिंहाचा वाटा उचलला. याशिवाय बचाव फळीतील मॅसेडोनियाचा २७ वर्षीय व्लाच्को ड्रोबारोव (३९वे मिनिट), कॅमेरूनचा २७ वर्षीय स्ट्रायकर मेस्सी बौली (४५वे मिनिट), भारताचा सैत्यसेन सिंग (५९वे मिनिट) यांनी प्रत्येकी एका गोलासह योगदान दिले. त्यामुळे सुमारे दहा हजार प्रेक्षकांना नववर्षात जल्लोषाची पर्वणी मिळाली.
हैदराबादचा संघ तळात, तर ब्लास्टर्स शेवटून दुसर्‍या म्हणजे नवव्या स्थानावर असल्यामुळे या लढतीला वेगळेच महत्त्व होते. हैदराबादने केवळ १४व्या मिनिटाला खाते उघडून सनसनाटी सुरवात केली होती. ब्राझीलचा ३४ वर्षीय स्ट्रायकर बोबो याने हा गोल केला होता. त्यानंतर मात्र ब्लास्टर्सने जोरदार प्रतिआक्रमण करत संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले. हैदराबादसाठी हा निकाल निराशाजनक ठरला. त्यांना सुद्धा दुसर्‍या विजयाची प्रतीक्षा होती, पण ११ सामन्यांत त्यांना आठवा पराभव पत्करावा लागला. एक विजय आणि दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण आणि दहावे स्थान कायम राहिले.

ब्लास्टर्सचा हा ११ सामन्यांतील दुसराच विजय असून पाच बरोबरी आणि चार पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ११ गुण झाले. दणदणीत विजयामुळे ब्लास्टर्सचा गोलफरक १५-१५ असा शून्य म्हणजे बरोबरीत आला. त्यांनी उणे गोलफरक असलेल्या नॉर्थईस्ट युनायटेड -३ (९-१२) आणि चेन्नईन एफसी -५ (११-१६) यांना मागे टाकले. नॉर्थईस्टचे ११, तर चेन्नईनचे ९ गुण आहेत.

सलामीला ब्लास्टर्सने घरच्या मैदानावर दोन वेळच्या माजी विजेत्या एटीके एफसीला २-१ असे हरविले होते. त्यानंतर दोन पराभव, एक बरोबरी, एक पराभव, तीन बरोबरी, एक पराभव, एक बरोबरी अशी त्यांची कामगिरी झाली होती. मागील लढतीत त्यांना नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली होती.