उदिशा येथील संभालपूर जिल्ह्यात बोट उलटून मृत पावलेल्यांची संख्या २४ बनली आहे. काल आणखीन १३ शव काढण्यात आले. दरम्यान, अजून ७ जण बेपत्ता आहेत.
ही दुर्घटना परवा घडली होती. काल स्कूबा ड्रायव्हर्सतर्फे हे शव काढण्यात आले. बुडालेली बोटही त्यांनी शोधून काढली. याप्रकरणी प्रशासकीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून मृतांच्या नातेवाईकांना १.५ लाख रु. मदत घोषित केली आहे.
सहलीसाठी गेलेले लायन्स क्लबचे ११४ सदस्य हिराकूड धरणात जलविहारासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अन्य ३० जणही बोटीत चढले. त्यांपैकी काहींकडे मोटरसायकलीही होत्या. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक झाल्याचे चालकाने निदर्शनास आणले मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
ही बोट नंतर परतीच्या प्रवासावेळी मध्येच बंद पडली व बुडू लागली. दुसरी बोट त्यांच्या बचावासाठी पाठवण्यात आली मात्र त्याआधीच काहींनी भिऊन पाण्यात उड्या मारल्या. परवा संध्याकाळपर्यंत ८० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते, अशी माहिती उदिशा विधानसभेत देण्यात आली.