बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवींचे निधन

0
158

सशक्त चतुरस्र अभिनय आणि लोभस सौंदर्य यांच्या मिलाफाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत अनेक दशके स्वत:ची खास ओळख निर्माण केलेल्या दिग्गज अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निकटवर्तियांच्या एका विवाह समारंभासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर व मुलगी खुशी यांच्यासह दुबईला गेल्या होत्या. वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी झालेल्या त्यांच्या मृत्युमुळे हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञांसह सिनेचाहत्यांनाही जबर धक्का बसला आहे. बॉलिवूडची पहिली महिला सुपर स्टार अशी उपाधी श्रीदेवी यांना त्यांच्या या क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे लाभली आहे. त्यांच्यावर आज सोमवारी मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

सदमा, चॉंदनी, हिम्मतवाला, चालबाज, मिस्टर इंडिया, नागीन, मवाली, तोहफा, गुमराह यासह अन्य अनेक चित्रपटांमधील श्रीदेवींच्या भूमिका अजरामर ठरल्या आहेत.

पंतप्रधानांना दु:ख
भारतीय सिनेसृष्टीत श्रीदेवींच्या निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया सिने क्षेत्रातील दिग्गजांसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनीही व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या या अकाली निधनामुळे आपण व्यथित झालो आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते तथा श्रीदेवी यांचे दिर संजय कपूर यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मोहित मारवा यांच्या विवाहसमारंभासाठी श्रीदेवी यांचे सर्व कुटुंबीय दुबईला गेले होते. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे पती बोनी कपूर व मुलगी खुशी होती. मात्र दुसरी मुलगी जान्हवी कामानिमित्त मुंबईत राहिली होती.

सिनेसृष्टीतील आलेख
हिंदी सिने सृष्टीत पदार्पण करण्याआधी श्रीदेवी यांनी तामिळ, तेलगू, मल्याळम व कानडी अशी विविध दक्षिण भारतीय चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. १९६०च्या अखेरीच्या सुमारास अभिनय क्षेत्रात उतरल्यानंतर १९७१ साली ‘पुम्बाटा’ या मल्याळी चित्रपटातील अभिनयासाठी उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून राज्य पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली.

‘ज्युली’मधून बॉलिवूडमध्ये
बॉलिवूडमध्ये श्रीदेवींनी बाल कलाकाराच्या रूपात पदार्पण केले ते १९७५मध्ये ‘ज्युली’ चित्रपटातून. प्रौढ कलाकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ठरला तो (१३व्या वर्षी) ‘मुंद्रू मुडिचू’ हा तामिळ चित्रपट. १५ वर्षांचा ब्रेक
‘जुदाई’ चित्रपटानंतर श्रीदेवींनी १५ वर्षांचा प्रदिर्घ ब्रेक घेतला. त्यानंतर २०१२ साली त्या ‘इंग्लिश विंग्लिश’ द्वारे पुन्हा रूपेरी पडद्यावर आल्या. २०१७ मधील ‘मॉम’ या चित्रपटापर्यंत त्यांनी आपल्या सकस अभिनयाचा आनंद सिनेशौकिनांना दिला.
सर्वात संस्मरणीय भूमिका अनिल कपूर बरोबर

बॉलिवूडमधील श्रीदेवींच्या भूमिका सर्वात संस्मरणीय ठरल्या त्या त्यांच्या वास्तविक जीवनात दिर असलेल्या अनिल कपूर यांच्या समवेत. त्यापैकी बहुतेक चित्रपट त्यांचे पती बोनी कपूर यांनी तयार केले आहेत. त्यांच्या नेत्रदीपक कारकिर्दीतील अखेरचा ‘झिरो’ हा शाहरूख खानची भूमिका असलेला चित्रपट असून तो येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे

दिग्गजांच्या प्रतिक्रिया

सुभाष घई : भारतीय सिनेसृष्टीतील एक जादुई कलाकार. अशी श्रीदेवी पुन्हा होणे नाही. १९८५ नंतर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीची सर्वोत्तम कलाकार म्हणजे श्रीदेवी.

रजनीकांत : श्रीदेवींच्या रूपाने एक प्रिय स्नेही गमावल्याने मला मोठा धक्का बसला आहे. चित्रपटक्षेत्राने एक महान कलाकार गमावला आहे.

आमीर खान : श्रीदेवींच्या अकाली व वेदनादायक निधनांने जबर धक्का बसला आहे. त्यांच्या अभिनयाचा मी एक निस्सिम चाहता होतो.

कमल हसन : श्रीदेवींच्या किशोरवयीन वयापासून त्यांच्या जीवनाचा मी एक साक्षीदार आहे. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे श्रेष्ठत्व हे निर्विवाद आहे.

माधुरी दीक्षित : चित्रपट जगताने एक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्व गमावले आहे.

धर्मेंद्र : श्रीदेवीच्या निधनाच्या वृत्तावर विश्‍वास बसणे कठीण ठरले. मला मोठा धक्का बसला आहे. श्रीदेवी म्हणजे एक देवाची देणगीच होती.

सोनाक्षी सिन्हा : श्रीदेवींच्या आठवणी सदैव आमच्या मनात राहतील.

ऋषी कपूर : सकाळीच मिळालेल्या या वृत्तामुळे खिन्न झालो आहे. बॉनी व त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना.

ऋतिक रोशन : अभिनयाच्या क्षेत्रात माझा पहिला प्रसंग श्रीदेवीसमवेत होता. त्यांचा मी प्रशंसक व चाहता होतो.

श्रीदेवींचे पार्थिव आज मुंबईत आणणार

दुबईतील कायदेशीर प्रक्रिया काल वेळेत पूर्ण न झाल्याने श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत आणले जाणार आहे. शवविच्छेदन व न्यायवैद्यक तपासणी अहवाल या प्रक्रियांच्या पूर्ततेसाठी त्यांचे पार्थिव रविवारी त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज पार्थिव मिळाल्यानंतर ते मुंबईत आणल्यानंतर मुंबईत अंत्यसंस्कार होणार असल्याचे बोनी कपूर यांच्या प्रवक्त्याने सांगितले.
श्रीदेवी यांचे पार्थिव कालच मुंबईत आणले जाणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर त्यांचे कुटुंबिय, बॉलिवूडमधील कलाकार, चाहते यांची रिघ लागली होती.