मला भावलेले अनिल बाब

0
316
  • कामिनी कुंडईकर

विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना. पण या बातम्या फोल ठरत नाही. तरणाताठ, उंचीपुरी देहयष्टी असणारा माणूस असा कसा लवकर गेला, असं विचारणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. कारण येणं तसं जाणं आपल्या हातात नसतं हेच निर्विवाद सत्य.

‘आगो कला अकादमीत अतुल मिश्रा हांच्या हिंदी अवीट गोडीच्या पदांचो कार्यक्रम आसा सगळी पोन्नी पदा’ माधवी, माझ्या मैत्रीणीने मला ‘रकाद’ दिला आणि वाचकहो जुनी गाणी, जुने सिनेमा हा माझा वीक पॉईंट!
दीर्घ निद्रेतून उठून सुंदर रमणीय पहाट बघण्यासारखे मला झाले. आम्ही दोघी कार्यक्रमाला जायला बाहेर पडलो त्या अगोदर व्हॉट्‌सऍपवरून सर्वांना कळवले होतेच.

आणि वाचकहो काय सांगू तिथे पोहोचल्यावर म्हणजे ब्लॅकबॉक्समध्ये दर्दी लोकांची मांदियाळी स्थानापन्न झाली होती. लगेच संगीतखुर्चीप्रमाणे आम्ही अडीच तासासाठी जागा ‘सुगुर’ केली. जिवाला एकदम ‘सू’ झाले. नंतर स्वभावाप्रमाणे उजव्या – डाव्या बाजूला पाहिले, ओळखीच्यांना स्माईल दिले. बरोबर ६.४५ वा. अतुलजी व्यासपीठावर अवतरले. त्यांच्याबरोबर त्यांची अर्धांगिनी होती. निवेदन ती करीत होती.

आमचे आगत-स्वागत झाल्यावर त्यांनी गाण्याला सुरुवात केली. गाण्याबरोबर गाण्याचे एकेक पदर उलगडून सांगत होते. गाण्याचा इतिहास- भूगोल- स्थळ- काळ वगैरे वगैरे. हे करीत असताना ते संगीतकार किंवा निर्माता यांची जरा ‘गफलत’ होत होती अन् त्याची अडचण लांब बांध्याचा, गोरा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि तोंडावर ज्ञानाचे तेज झळकणारे शिक्षित व्यक्तिमत्त्व, त्याला वेळोवेळी ‘देवदूता’सारखी मदत करीत असे. आम्ही सगळे त्याला ‘आ वासून’ बघत होतो. अतुलजी तर ‘शुक्रिया’ म्हणत होते. वाचकहो, या विद्वत्ताप्रचूर माणसाने सिनेमासृष्टीचे अख्खे दालनच म्हणजे ‘कूळ- शील ’ सगळे पटापट सांगितले. जिभेवर गाणे आणि त्यामागचा इतिहास घट्ट बांधून ठेवल्यासारखा. लाजवाब. मध्येच कुजबुज ‘कोण गो तो?’
मला वाटलं फक्त एका गाण्याबद्दल ते सांगणार. पण मी ‘नापास’ झाले. तो कार्यक्रमच अतुलजीऐवजी या अवलियाचा होता असे वाटले. सगळ्याच प्रेक्षकांना त्याने भारावून सोडले. सगळे जण त्यांना मनातून म्हणत होते, ‘किती दांडगा अभ्यास!’ किती शांतपणे अभ्यासपूर्ण माहिती ते देत होते प्रत्येक गाण्याबद्दल आणि त्यावेळी घडलेली घटना. वाचकहो, १९८०च्या पुढच्या पिढीला याबद्दल गोडी असेल किंवा नसेल पण कुणीतरी एक येणार आणि त्याचा वारसा पुढे चालविणार. कार्यक्रम संपण्याच्या तयारीत असताना मी म्हटले, ‘अतुलजी, अनिलजीको आज तसरीप देना चाहिएँ| अनिलजीने आज हमे बहुत ज्ञान दिया जो हमे मालूम नही था|’ सगळ्यांना त्यांच्यासाठी कडाडून टाळ्या वाजवल्या आणि शब्दकौतुकाचे हार-तुरे दिले.

कोण हे अवलिया, ज्यांच्याविषयी मी बोलते, अहो हे श्री. अनिल काणे. मूळ गाव असोळणे पण माणसांची जन्मभूमी कुठेही असली तरी कर्मभूमीसाठी त्यांना नियती कुठे नेईल हे सांगता येत नाही. त्यांचे वडील नोकरीसाठी पणजीला स्थायिक झाले आणि अनीलबाबांचे शिक्षण पणजीत झाले. त्यामुळे पणजीतील त्याचा मित्रांचा गोतावळा खूप मोठा. शिक्षणात ते अव्वल दर्जाचे. मॅट्रिकनंतरचे शिक्षण पणजीत घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. पण तिथेही त्यांना सिनेमाचे वेड सोडवतच नव्हते. पहिला शो ते आपल्या मित्रमंडळींचा वेळ ठरवून जात. अशा या माणसाकडे सिनेमाचा खजाना भरपूर असणार. कारण त्यावेळी सिनेमा संगीत लहान पटी ‘रसरंग’ खूप पुस्तके येत असत. अनिलबाबानी सिनेमा- शिक्षण यांचा चांगला मेळ बसवला. शिक्षणानंतर ते चांगल्या कंपनीत नोकरीला लागले. प्रत्येक बाबतीत स्मरणशक्ती दांडगी.

यथावकाश त्यांचे शुभमंगल धेंपे घराण्यातल्या मुलीशी झाले. पत्नी सोज्वळ, नम्र अन् भरभरून बोलणारी. कुलदेवी म्हाळशेची निस्सीम भक्तीण. गर्भश्रीमंत असूनही गर्वाचा लवलेशही नसलेली. परम दैवत असलेल्या म्हाळसेची सेवा तिने तन-मनाने केली. गर्भकुड ते रांदचे कूड- कार्यालय ते फुलवाली सर्वांशी आपुलकीने वागणे हाच तिचा अमूल्य गुण.

अनिलबाब आणि नंदिनीच्या संसारवेलीवर एक फूल उमलले, तिचे नाव देवयानी. गुणी, प्रेमळ, आईवडलांप्रमाणे शिक्षणात अत्यंत हुशार. वडलांप्रमाणेच इंजिनिअरिंगची पदवी तिने संपादन केली. यथावकाश तिला मुलगा झाला. आजी-आजोबांना काय कोडकौतुक! जात्याच आजीला नाचगाण्याची आवड. विचारूच नका. पण कसचं काय? ‘म्हजो शाणो बाबू, कावळ्या मामा येते येते कर रे मोरो…’ ही अंगाईगीते फार काळ नातवाच्या कानांवर पडलीच नाही. ‘अपूर्बाय ही आजीकडून तिला हवी तशी झाली नाही. थोडीच झाली.
१० सप्टेंबर अतुलजींनी ‘व्हिडिओद्वारा त्यांना गाण्यातून आणि त्यांच्या मित्रमंडळींकडून श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित केला होता. सगळे मित्र ‘काळजासावन’ बोलत होते. प्रत्येकाचा एकच शब्द मनमिळाऊ आणि नम्र. वाचकहो, आईबाबा आपल्या मुलाचे कौतुक करणार यात मोठेसे नाही. पण जीवनाच्या शेवटापर्यंत जे भरभरून बोलतात तो त्यांचा त्यांच्या सान्निध्यात आलेला अनुभव उगीच कुणी बोलत नाही. कारण चांगलं बोलायला वेळ लागतो, वाईट लगेच बोलतात.

लहान म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ४/५ महिने असताना या आजीला (नंदिनीला) बाय-पास शस्त्रक्रिया करावी लागली. मुंबईला तिची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली. ती गोव्यात येण्याच्या तयारीत होती. पण काळाची कुर्‍हाड पडली आणि होत्याचे नव्हते झाले. सौभाग्यवती सौभाग्याने गेली. पण असं काय वय झालं होतं? का म्हणून एक्झिट घेतली? पण आपण सगळी नियतीच्या हातातली बाहुली.
नातवाला अंगाईगीत त्याची ‘अपुर्बाय, शाणो म्हणू बाबू’ हे करण्याआधीच ती गेली. अनिलबाबू खूप हादरले. नवर्‍याची जोडीदारीण गेल्यावर ते हतबल होतात. त्यांची व्यवस्थाच कोलमडून जाते. याउलट जोडीदार गेल्यावर ईश्‍वराने जो स्त्रियांना सहनशक्तीचा निसर्गदत्त डोस दिला आहे तोच त्यांना सावरायला मदत करतो.
अनिलबाब पत्नीनिधनानंतर मडगावला मुलीकडे राहायला गेले. पण वाचकहो सिनेमाचे अतूट नातं जे त्यांनी आपल्या मनात घट्ट विणले होते ते तसूभरही कमी झाले नाही. पणजीत किंवा मडगावला गाण्याचा कार्यक्रम असेल तर ते आवर्जून आपली हजेरी लावीत असत. पण काहीही म्हणा, पत्नीच्या निधनानंतर दोन-तीन वर्षानंतर त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. पण ते जाणार किंवा असा काही गंभीर आजार अशातले काही नव्हते.

विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना. पण या बातम्या फोल ठरत नाही. तरणाताठ, उंचीपुरी देहयष्टी असणारा माणूस असा कसा लवकर गेला, असं विचारणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. कारण येणं तसं जाणं आपल्या हातात नसतं हेच निर्विवाद सत्य.
अनिलबाबांकडे सिनेमा-संग्रह खूप असणार यात संशय नाही. सिनेतारका, खलनायक, नायिका यांविषयी पुस्तके असणारच. त्यांचे जतन करून ते दर्दी संस्थेकडे सुपूर्द करणे हेच योग्य ठरेल. कारण हा दुर्मीळ ठेवा आहे. अशी ग्रंथसंपदा मिळणे दुर्लभ!
वाचकहो, राहून राहून वाटते अनिलबाब यांचा नात्यांचा गोतावळा गर्भश्रीमंत – धेंपे, रायतुरकर- वागळे या घराण्यांशी त्यांचे नाते पण या नात्यांचा ‘कैफ’ त्यांना कधीच चढला नाही.
चि. देवयानी तुझ्या नावातच देव आहे. तुझ्या आईबाबांची पुण्याई सदैव तुझ्या पाठीशी असणार. देवी म्हाळसा तुला सदैव साथ देणार.
शेवटी असेच म्हणावे लागते, ‘जिंदगी एक सफर हैं सुहाना, यहॉं कल क्या हो किसने जानां?’
अनिलबाब ही तुम्हाला माझ्या पामराची शाब्दिक श्रद्धांजली.