बेपत्ता विमानाचा ठावठिकाणा नाहीच

0
80

इंडोनेशियाहून सिंगापूरसाठी रविवारी उड्डाण केलेले विमान बेपत्ता झाल्यानंतर त्याबाबतचे गूढ अजूनही उकललेले नाही. या विमानाच्या शोध मोहिमेत गुंतलेल्या इंडोनेशियन हेलीकॉप्टरला समुद्रात एका ठिकाणी तेल पसरलेले आढळून आले तर ऑस्ट्रेलियन शोधकार्यातील विमानालाही समुद्रात काही वस्तू आढळल्या. मात्र त्यांचा संबंध बेपत्ता विमानाशी असल्याविषयी कोणताही दुजोरा मिळू शकला नाही.रविवारी सकाळी एअर एशियाचे क्यूझेड ८५०१ हे विमान सूरबाया येथून सिंगापूरसाठी १६२ जणांना घेऊन निघाले होते व थोड्याच वेळात त्याचा रडारपासून संपर्क तुटला होता. इंडोनेशियाच्या शोध मोहिमेचे प्रमुख हेन्री बॅम्बांग यांनी सांगितले की शोध मोहिमेत गुंतलेल्यांशी असलेल्या समन्वयानुसार दुर्दैवी विमान कोसळले असल्यास ते समुद्रात कोसळले असल्याची अधिक शक्यता आहे आणि तसे झाल्यास ते समुद्राच्या तळाशी असू शकते.
जाकार्ताच्या हवाई दलाचे कमांडर रिअर मार्शल द्वि पुत्रांतो यांनी सांगितले की ऑस्ट्रेलियन टेहळणी विमानांना नांगका बेटाजवळ काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. मात्र त्या वस्तू एअर एशिया विमानाच्या आहेत याविषयी आम्ही ठामपणे सांगू शकत नाही, असेही पुत्रांतो म्हणाले. ढगाळ वातावरणातच आम्ही त्या वस्तूंच्या दिशेने शोध घेत आहोत असे त्यांनी सांगितले.