बेताल ट्रम्प

0
151

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेपुढे केलेले भाषण जगाला हादरवून सोडणारे ठरले आहे. एका सर्वशक्तिमान देशाचा राष्ट्राध्यक्ष एवढ्या शेलक्या, शिवराळ भाषेमध्ये जगातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाला संबोधित करतो आणि अगदी उघडउघड उत्तर कोरियाला ‘पूर्णतः उद्ध्वस्त’ करण्याची जाहीर धमकी देतो हे खरोखरच जगाला विस्मयचकित करणारे ठरले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात विरोधकांप्रती अशाच प्रकारची शिवराळ भाषा सदैव वापरली आणि ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत ते राष्ट्राध्यक्ष पदावर पोहोचले. त्यानंतर ट्वीटरवरून त्यांची शेलकी ट्वीटस् सतत येत राहिली. परंतु संयुक्त राष्ट्र आमसभेसारख्या व्यासपीठावर हे महाशय एवढ्या रोखठोक भाषेत एखाद्या देशाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची जाहीर धमकी देतील अशी मात्र अपेक्षा नव्हती. फार तर उत्तर कोरियाविरुद्ध संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध कडक करावेत, उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा इथपर्यंत आक्रमकता त्यांनी दाखवली असती तर ती उचित ठरली असती. पण येथे स्वतःच्या राष्ट्राध्यक्षपदाचा, संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक महत्त्वाच्या व्यासपीठाचा, अगदी कोणाचाही मुलाहिजा न राखता ज्या भाषेत ट्रम्प बोलले, उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची ‘रॉकेटमॅन’ म्हणून टवाळी केली, इराण, व्हेनेझुएला, क्यूबावर तोफा डागल्या, ते पाहिल्यास निश्‍चितच चिंता वाटते. खरे तर ट्रम्प यांचे भाषण होण्याआधी संयुक्त राष्ट्र महासचिवांनी ‘प्रक्षोभक भाषणांतून गैरसमज पसरतील, ही वेळ मुत्सद्दीपणा दाखवण्याची आहे’ असे समंजस वक्तव्य केले होते. परंतु ट्रम्प यांच्या एकूण भाषणाची रचना आणि त्याचा सूर हा त्यांच्या प्रचारकी सभांमधील भाषणांच्याच धाटणीचा होता. उत्तर कोरियाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची धमकी तर त्यांनी दिलीच, शिवाय इराण बरोबर बराक ओबामांनी केलेला आणि युरोपीय मित्रदेशांनी मान्यतेची मोहोर उठवलेला अणू करार ‘एकतर्फी’ ठरवीत तो रद्दबातल करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. व्हेनेझुएला आणि क्यूबालाही टीकेचे लक्ष्य केले. सर्वांत खेदजनक म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिष्ठेचाही त्यांनी मान ठेवला नाही. संयुक्त राष्ट्रसंघाला सर्वाधिक निधी अमेरिका देत आलेली आहे आणि यापुढे हे असे आर्थिक अवलंबित्व चालणार नाही हेही त्यांनी सांगून टाकले. आपल्या अमेरिकेविषयीची दर्पोक्ती त्यांच्या शब्दाशब्दांतून दिसत होती. जणू काही निवडणूक प्रचारातील ‘अमेरिका फर्स्ट’चीच जाणीव ते या व्यासपीठावरून जगाला करून देत होते. अमेरिका ही सर्वांत प्रबळ जागतिक महासत्ता जरी असली, तरी त्या देशाच्या आजवरच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक राजकारणामध्ये सकारात्मक भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे. जॉर्ज बुश यांनी जगाने लोकशाहीची कास धरण्याचा आग्रह धरला होता, तर ओबामांनी मानवी हक्कांचे महत्त्व अधोरेखित केले होते. त्या तुलनेत ट्रम्प यांचे हे बेताल भाषण म्हणजे जणू एखाद्या हुकूमशहाने जगाला ठणकावावे तशा प्रकारचे होते. त्यांच्या भाषणावेळी उपस्थितांकडून दाद येण्याऐवजी जो सन्नाटा पसरला तो बोलका होता. जागतिक प्रतिनिधींनी हतबुद्ध होऊन ट्रम्प यांचे हे भाषण ऐकले. आपल्या या आक्रमक भूमिकेचे ‘तत्त्वनिष्ठ राष्ट्रवाद’ असे गोंडस संबोधन जरी ट्रम्प यांनी चालवले असले, तरी त्यांची ही भूमिका जागतिक हिताची म्हणता येणार नाही. केवळ अमेरिकेचे हित आणि अमेरिकेच्या सार्वभौमत्त्वाची आणि जागतिक वर्चस्वाची जपणूक हेच आपले इतिकर्तव्य आहे अशा भावनेने ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली आहे. ‘सार्वभौमत्व’ हा शब्द म्हणे त्यांच्या भाषणात तब्बल २१ वेळा आला. या अहंमन्य भूमिकेतून खरे तर अमेरिकाच बदलत्या जागतिक समिकरणांमध्ये एकाकी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणच्या अणूकरारासंदर्भात ते लवकरच दिसून येईल. त्यांचे युरोपीय मित्रदेशही या करारासंदर्भात त्यांची री ओढू शकणार नाहीत आणि उत्तर कोरियाला ‘उद्ध्वस्त’ करण्याच्या भूमिकेशी तर मुळीच सहमत होणार नाहीत. ट्रम्प यांनी केवळ उत्तर कोरियाला लक्ष्य केलेले नाही, त्याच बरोबर पाठीराख्या देशांना म्हणजे चीन आणि रशियालाही फटकारले आहे. संघर्षाची शांततापूर्ण सोडवणूक करण्याऐवजी थेट युद्धाची ही ललकारी जगाला खरोखरच तिसर्‍या महायुद्धाकडे तर घेऊन जाणार नाही ना? उत्तर कोरियाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याची धमकी देत युद्धाची खुमखुमी व्यक्त करण्याऐवजी विद्यमान पेचप्रसंगातून एकमताने शांततामय तोडगा कसा काढता येईल यावर जर त्यांनी भर दिला असता तर ते त्यांच्या पदाची शान वाढवणारे ठरले असते. हवामान बदलांसारख्या जागतिक महत्त्वाच्या विषयांना स्पर्शही न करता युद्धाची खुमखुमी दर्शविणारे ट्रम्प जगाला कोठे घेऊन जाणार आहेत?