बारा वर्षांत कॉंग्रेसने सतत अपमानच केला…

0
152
  • नारायण राणे

आज मी आणि मुलाने कॉंग्रेस पक्ष सोडला आहे. पुढचा निर्णय नवरात्र संपायच्या आत घेऊ. त्या अगोदर जरा अभ्यास करू. नक्की काय करायचेय. लवकरच, दसर्‍याच्या अगोदर आमची भविष्याची दिशा आम्ही स्पष्ट करू…

जवळजवळ पंचवीस वर्षे मी महाराष्ट्रामध्ये विधिमंडळात काम केेले. मुख्यमंत्री झालो. मला वाटले की आता एका राष्ट्रीय पक्षात जावे, काम करावे म्हणून २००५ साली कॉंग्रेसमध्ये गेलो. तोही स्वतःहून गेलो नाही. कॉंग्रेसचे चार नेते – सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष प्रभा राव, पक्षाच्या निरीक्षक मार्गारेट अल्वा आणि दिवंगत बाळासाहेब विखे पाटील ही चार माणसे रात्री तीन वाजता दिल्लीला मी ज्या ताज हॉटेलमध्ये उतरलो होतो, तेथे आली व मला सांगितले की, तुम्ही कॉंग्रेसमध्ये या. मी त्यांना विचारले की मी शिवसेना सोडलेली आहे, पण मी कॉंग्रेसमध्ये यावे असे तुम्हाला का वाटते? कॉंग्रेसमध्ये तुम्ही काय द्याल? असे विचारताच अहमत पटेल म्हणाले, ‘राणेजी, हमे कुछ वक्त दीजीये.’ मी विचारले, ‘कितना वक्त आपको चाहिये?’ तर म्हणाले, ‘छह महिने दीजीए, हम आपको मुख्यमंत्री बनायेंगे.’ मी विचार केला, सहा महिने सहज जातील, काही हरकत नाही. तरी मी त्यांना सांगितले, आता तुम्ही लगेच मी आलो असे समजू नका. मी उद्या सकाळी अकरा वाजता तुम्हाला सांगतो की, मी मॅडमना भेटायला तयार आहे की नाही. मी त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी अकरा वाजता सांगितले. सोनिया मॅडमनी दुपारी चारची अपॉइंटमेंट दिली. तिथे हे सगळे नेते होते. त्यांच्यासमोर ‘यांना सहा महिन्यांनी मुख्यमंत्री बनवू‘ असे त्यांनी सांगितले. २६ जुलै २००५ रोजी मी अशा रीतीने कॉंग्रेस प्रवेश केला. मुंबईत त्या दिवशी भरपूर पाऊस पडला होता. मुंबई बंद पडली होती.
दुसर्‍या दिवशी मी मुंबईत आलो. ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी मंत्री झालो. महसूल मंत्री म्हणून मी फिरलो. आज टीव्हीवर ज्या चर्चा होत आहेत की, राणे चक्रव्यूहात अडकणार काय? पण तुम्हाला मी सांगेन, कॉंग्रेसने – या जुलैमध्ये मला पक्षात येऊन बारा वर्षे झाली, त्यापैकी नऊ वर्षे कॉंग्रेसच्या हाती सत्ता होती. म्हणजे सत्ता असताना मी नऊ वर्षे कॉंग्रेसमध्ये होतो. या नऊ वर्षांत ते माझ्याशी जे वागले ते आज मी मुद्दाम सांगणार आहे. समोरून फार आदराने वागायचे. मला घाबरतात असे दाखवायचे. दिल्लीला मी कधीही गेलो तरी अपॉइंटमेंट मिळायची.
जे अहमद पटेल, मॅडमचे सल्लागार आहेत. कॉंग्रेसमध्ये मला वर्ष झाल्यावर त्यांनी मला फोन केला, ‘राणेजी, आप दिल्ली आईये. हम मॅडमसे मिलेंगे.’ मी जाऊन त्यांना भेटलो. ते म्हणाले, आपणा दोघांना मॅडमकडे जायचे आहे. मॅडमकडे नेले. विलासराव देशमुखांविरुद्ध त्यांनी मॅडमना जे सांगायचे ते सांगितले. बाहेर आल्यावर त्यांनी मला सांगितले की ‘राणेजी, दो – तीन दिन मे मुख्यमंत्रीकी शपथ लीजिएगा’ आणि त्यांनी माझे अभिनंदनही केले.
दोन दिवस काय, आठवडा झाला, महिना झाला, वर्ष झाले. पण मी कधीही विचारले नाही की, शब्द दिला होता, काय झाले?
हे एकदा झाले. परत दुसर्‍यांदा बोलावले. आणि मला परत मॅडमकडे नेले. पहिल्यावेळी केले तसेच मॅडमशी बोलणे झाले. मला म्हणाले ‘राणेजी, आनेवाले वीक मे हो जाएगा सबकूछ. हम निर्णय ले लेंगे’ बाहेर आल्यावर परत अभिनंदन. गाडीतून घरी घेऊन गेले वगैरे. चहा पाजला. तोही आठवडा गेला. परत वर्ष गेले. काही झाले नाही.
विलासरावांना बदलून अशोक चव्हाणना मुख्यमंत्री केले तेव्हाचा प्रसंग अजून वेगळा. त्यापूर्वी मार्गारेट अल्वांनी बोलावले होते. त्या अहमद पटेलांसोबत मॅडमकडे घेऊन गेल्या. बाहेर आल्यावर दोघांनी माझे अभिनंदन केले. मार्गारेट अल्वांच्या घरी गेलो. त्या म्हणाल्या, ‘अब हो जाएगा.’ ही तिसरी वेळ.
चौथ्यांदा, विलासरावांना बदलून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केले, तेव्हा विधिमंडळात प्रत्येक आमदाराला प्रणव मुखर्जी, संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि दिग्विजय सिंह निरीक्षक म्हणून आले होते ते भेटले. प्रत्येक आमदाराला विचारले. त्यात ४८ जणांनी मुख्यमंत्रीपदासाठी ‘नारायण राणे’ हे नाव दिले, ३२ जणांनी ‘अशोक चव्हाण’ दिले आणि ४ जणांनी ‘बाळासाहेब विखे पाटील’ दिले. त्या दिवशी प्रणवदा त्या विधिमंडळाच्या बाहेर पायरीवर येऊन नाव जाहीर करणार होते. ती पद्धत असते. मतदान झाल्यानंतर निरीक्षकाने निवडलेल्या नेत्याचे नाव जाहीर करायचे असते. पण त्या दिवशी ते जाहीर होऊ दिले गेले नाही. त्याच रात्री मी दिल्लीला गेलो. प्रणवदा, अँटनी, दिग्विजयांनी मला त्यांच्या विमानात घेतले. दिग्विजयांनी माझे अभिनंदन केले. ‘राणेजी, हो गया’. त्यांच्या विमानातून दिल्लीला आलो. रात्री दीड वाजता मॅडमना भेटलो. आम्हाला सांगितले गेले की, सकाळी अकराला जाहीर होईल. सकाळी मी हॉटेलमध्येच होतो. अकरा वाजता टीव्ही लावला तर त्यात मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांचे नाव.
या सगळ्या प्रकारात एक तर तुम्ही सांगितले का? तुम्ही बोलावता का? बोलवून करणार म्हणता आणि करीत का नाही? हे अनेकवेळा, तीन – चार वेळा झाले. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेतली.
ज्यावेळी दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव जाहीर झाले तेव्हा त्यांनी दिल्लीहून मला फोन केला की, तुम्ही कुठे आहात, पहिल्यांदा मी तुम्हाला भेटणार. नंतर राज्यपालांना भेटेन. मी ‘सह्याद्री’वर गेलो. तिथे ते मला भेटले. मला म्हणाले, जे तुम्हाला खाते पाहिजे ते देतो. पण त्यांनी माझे महसूल खाते काढले आणि उद्योग खाते दिले. तेव्हा नितेशचे लग्न चार दिवसांवर आले होते. तेव्हाच खरे तर मी राजीनामा देणार होतो, परंतु नितेशच्या लग्नामुळे थांबलो.
अशा तर्‍हेने वारंवार अपमान झाला.
हे षड्‌यंत्र कॉंग्रेसवाल्यांचे. जे महाराष्ट्रात नेते आहेत, त्यांनी हे षड्‌यंत्र केले. आता मला विधानपरिषदेचा आमदार केले. राहुल गांधीने आमदार केले. मी मागितले नव्हते. आता त्यांनीच मला आमदार म्हणून जाहीर केले. तेथेही शेवटच्या दिवसापर्यंत अशोक चव्हाण दिल्लीला बसून राहिले. कोणालाही करा, पण नारायण राणेला आमदार करू नका. पण शेवटी राहुल गांधींनी माझे नाव जाहीर केले. मी मुंबईत होतो तेव्हा कपिल सिबल यांची पत्रकार परिषद तीन वाजता होती. विधानपरिषद आणि राज्यसभेची दोन नावे जाहीर होणार होती. राज्यसभेसाठी चिदंबरम यांचे नाव होते व विधानपरिषदेसाठी माझे होते. सिब्बल आले. पण पत्रकार परिषदेत एकच नाव जाहीर केले, चिदंबरम. पत्रकारांनी विचारले, दुसरे नाव का जाहीर करीत नाही? तर म्हणाले अजून जाहीर झालेले नाही. अशोक चव्हाणांनी माझे नाव जाहीर करू दिले नाही. एका पत्रकाराने चव्हाणांना विचारले, अहो, पण राणेंचे नाव आहे. त्यांनी उत्तर दिले, माझ्याकडे ५२ की ५४ राणे आहेत.
शेवटी मी विधानपरिषदेचा आमदार झालो. विधानपरिषदेत बसायला गेलो. मी माजी मुख्यमंत्री. मी कुठेही बसू शकत नाही. मला प्रोटोकॉल आहे. मी विधिमंडळ सचिवांना विचारायला गेलो, माझी जागा कुठे आहे? त्यांनी मला चार नंबरची जागा दाखवली. खरे तर विरोधी पक्षनेत्यानंतर दोन क्रमांकावर माझी जागा असायला हवी होती. मग मी विचारले तेव्हा सांगण्यात आले की, ‘चव्हाणसाहेबांना मी विचारले. ते म्हणाले असे असे करा.’ मी त्या सभागृहात सर्वांत ज्येष्ठ. खरे तर मला त्यांनी त्या सभागृहात कॉंग्रेसचा गटनेता करायला हवे होते, पण केले नाही. त्या विधिमंडळात कॉंग्रेस आणि सगळे पक्ष एकत्र माझ्याविरुद्ध उभे. मी केव्हा बोलायचे? मी म्हणालो, माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी बोलणार. मी हात वर करायचो. त्या ठिकाणी मी आतापर्यंत काम केले. काय अवस्था आहे विधानसभेत, विधानपरिषदेत? कॉंग्रेसचे अस्तित्व दिसतेय का? विधानसभेत विखे पाटील आणि वरच्या सभागृहात धनंजय मुंडे सरकारला काय घेरतात हो? ज्या विधिमंडळात मी इतिहास घडवला, तेथे अशोक चव्हाण ज्येष्ठतेनुसार नियमाने मिळाले पाहिजे ते पद मला देत नाहीत. मग कसे काम करायचे?
ज्या दिवशी मला गटनेता बनवले त्याच दिवशी मी ठरवले की हे आता आपल्याला कामच नाही देणार. भाजप – सेनेला माहीत आहे की मी तिथे काय करू शकेन. माझ्या अभ्यासाचा, माझ्या अनुभवाचा कोणताही उपयोग बारा वर्षांत कॉंग्रेसने केला नाही. कॉंग्रेस नेतृत्वाला महाराष्ट्रात कॉंग्रेस वाढवायचीच नाही. पदे घ्यायची व स्वतःसाठी वापर करायचा. २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसची सत्ता यावी म्हणून कोणीही प्रयत्न केलेले नाहीत. कोणी करणार नाही. तुम्ही काय आम्हाला बरखास्त करता? आम्हीच तुम्हाला सोडतो! हा इतिहास घडवला आपण. कॉंग्रेसच्या इतिहासात शंभर टक्के लोक सोडून जातात असे कधी घडलेले नाही. मी सोनिया गांधींना आज माझ्या राजीनाम्याचे पत्र पाठवले. अडीच वाजता ते पोचले असेल. माझा आमदारकीचा राजीनामाही मी सभापतींकडे दोन वाजून पंचवीस मिनिटांनी पाठवला. आता पाहूया कॉंग्रेसची ताकद काय आहे ती! मी दोन्ही पदांचा आता राजीनामा दिला. पदाच्या मागे मी जात नाही. पद माझ्या मागे चालून येते. एवढे कर्तृत्व मी महाराष्ट्रात दाखवलेले आहे. आता कॉंग्रेसला कळेल. केवळ सिंधुदुर्ग नाही. रत्नागिरी नाही. महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांतून आज लोक कॉंग्रेस सोडतील. नाशिक, सातारा… प्रत्येक जिल्ह्यातून लोक येत आहेत. या निर्णयाने आता शिवसेना आणि कॉंग्रेस दोन्ही खाली करा!
मी सोनिया गांधींचे नाव तरी घेतले? राहुल गांधींचे? टीका केली? नाही केली. उलट मी आभार मानले. महाराष्ट्रात कोणी कॉंग्रेस सदस्यता केली आहे? कोणीही नाही? कोण यायला तयार आहे स्वतःहून कॉंग्रेसमध्ये? कोणीही नाही. आज मी पक्ष सोडला. पुढचा निर्णय नवरात्र संपायच्या आत घेऊ. त्या अगोदर जरा अभ्यास करू. नक्की काय करायचेय. लवकरच, दसर्‍याच्या अगोदर आमची भविष्याची दिशा आम्ही स्पष्ट करू. उद्या परवापासून मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार. नागपूरपासून सुरू करणार. कोणाच्या पाठीशी लोक आहेत हे मी अशोक चव्हाणांना दाखवून देणार. अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे माहीत नव्हते. २००५ साली शिवसेनेच्या चक्रव्यूहातून मी बाहेर पडलोच ना! ती विद्या मला माहीत आहे. जे माझ्या नजरेसमोर राहू शकत नाहीत ते मला चक्रव्यूहात काय ढकलणार?