राजधानी पणजीतील बेकायदेशीर ‘स्पा’ ‘मसाज सेंटर्स’चा प्रश्न काही दिवसांपासून ऐरणीवर आला होता व पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनीही त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर कालपासून राजधानी पणजीतील बेकायदेशीर ‘स्पा’ व ‘मसाज सेंटर’वर कारवाई सुरू झाली असून, काल येथील 18 जून मार्गावरील एका ‘स्पा’ व ‘मसाज पार्लर’वर पणजी महापालिका, महसूल खाते, पणजी पोलीस व आरोग्य खात्याने संयुक्तरित्या छापा टाकला. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता, आरोग्य खात्याचा परवाना, आगसुरक्षा प्रमाणपत्र तसेच पणजी महापालिकेचा व्यापार परवाना न मिळवता स्पा व मसाज पार्लर सुरू केल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. कारवाई केलेल्या स्पा आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले असून, त्यांना आवश्यक ते सर्व परवाने सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.