बेंगलोरचा दिल्लीवर रोमहर्षक विजय

0
57

>> एबीचे विस्फोटक अर्धशतक; पंत-हेटमेयरची फटकेबाजी वाया

दक्षिण अफ्रिकन स्टार एबी डीव्हिलियर्सच्या विस्फोटक ७५ धावांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सवर १ धावेने मात करीत आयपीएलच्या १४व्या पर्वातील आपला पाचवा विजय नोंदविला.

आरसीबीकडून मिळलेल्या १७२ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला ४ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावांपर्यंत मजल मारता आली. पृथ्वी शॉ (२१), शिखर धवन (६), स्टीव्ह स्मिथ (४) आणि मार्कुस स्टॉइनिस (२२) हे तंबूत परतल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि विंडीजचा अष्टपैलू शिमरॉन हेटमेयर यांनी नाबाद अर्धशतके नोंदवित विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदार केली. परंतु त्यांना विजय थोडक्यात दोन धावेने हुकला. शेवटच्याचेंडूवर सहा धावांची गरज असता पंतला चौकार ठोकता आला. पंतने ६ चौकारांसह नाबाद ५८ तर हेटमेयरने २ चौकार व ४ षटकारांसह २५ चेंडूंत विस्फोटक केलेली ५३ धावांची नाबाद खेळी वाया गेली. आरसीबीकडून हर्षल पटेलने २ तर मोहम्मद सिराज व काइल जेमीसन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने एबी डिव्हिलियर्सच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या ५ गडी गमावत १७१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. आरसीबीची सुरुवात खराब झाली होती. आवेश खानने कर्णधार विराट कोहलीच्या (१२) यष्ट्या उधळत दिल्लीला प्रारंभची महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. लगेच पुढच्या षटकांत ईशांत शर्माने सध्या लयीत असलेल्या देवदत्त पडिक्कलला (१७) त्रिफळाचित करीत आरसीबीला दुसरा झटका दिला. आक्रमक सुरुवात केलेला ग्लेन मॅक्सवेल अमित मिश्राला उचलून मारण्याच्या प्रयत्नात स्टीव्ह स्मिथकडे झेल देऊन परतल्याने आरसीसीची स्थिती ३ बाद ६० अशी झाली होती. परंतु त्यानंतर दक्षिण आफ्रिकन स्टार एबी डीव्हिलियर्सने तडाखेबंद अर्धशतक झळकवले. त्याने चौथ्या विकेटसाठी रजत पटिदारच्या साथीत ५४ धावांची भागीदारी केली. तर वॉशिंग्टन सुंदर (६) समवेत पाचव्या विकेटसाठी २५ धावांचे लक्ष्य ठेवता आले. दिल्लीकडून ईशांत शर्मा, कागिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ः विराट कोहली त्रिफळाचित गो. आवेश खान १२, देवदत्त पडिक्कल त्रिफळाचित गो. ईशांत शर्मा १७, रजत पटिदार झे. स्टीव्ह स्मिथ गो. हर्षल पटेल ३१, ग्लेन मॅक्सवेल झे. स्टीव्ह स्मिथ गो. अमित मिश्रा २५, एबी डीव्हिलियर्स नाबाद ७५, वॉशिंग्टन सुंदर झे. व गो. कागिसो रबाडा ६, डॅनियल सॅम्स नाबाद ३.
अवांतर ः २. एकूण २० षटकांत ५ बाद १७१ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-३० (विराट कोहली, ३.६), २-३० (देवदत्त पडिक्कल, ४.१), ३-६० (ग्लेन मॅक्सवेल, ८.३), ४-१११ (रजत पटिदार, १४.५), ५-१३९ (वॉशिंग्टन सुंदर, १७.६)

गोलंदाजी ः ईशांत शर्मा ४/१/२६/१, कागिसो रबाडा ४/०/३८/१, आवेश खान ४/०/२४/१, अमित मिश्रा ३/०/२७/१, अक्षर पटेल ४/०/३३/१, मार्कुस स्टोइनिस १/०/२३/०.
दिल्ली कॅटिल्स ः पृथ्वी शॉ झे. एबी डीव्हिलियर्स गो. हर्षल पटेल २१, शिखर धवन झे. युजवेंद्र चहल गो. काइल जेमीसन ६, स्टीव्ह स्मिथ झे. एबी डीव्हिलियर्स गो. मोहम्मद सिराज ४, ऋषभ पंत नाबाद ५८, मार्कुस स्टॉइनिस झे. एबी डीव्हिलियर्स गो. हर्षल पटेल २२, शिमरॉन हेटमेयर नाबाद ५३.
अवांतर ः ६. एकूण २० षटकांत ४ बाद १७० धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-२३ (शिखर धवन, २.३), २-२८ (स्टीव्ह स्मिथ, ३.३), ३-४७ (पृथ्वी शॉ, ७.२ ओव्ह), ४-९२ (मार्कुस स्टॉइनिस, १२.४)
गोलंदाजी ः डॅनियल सॅम्स २/०/१५/०, मोहम्मद सिराज ४/०/४४/१, काइल जेमीसन ४/०/३२/१, वॉशिंग्टन सुंदर ४/०/२८/०, हर्षल पटेल ४/०/३७/२, युजवेंद्र चहल २/०/१०/०.

डीव्हिलियर्सने गाठला ५००० धावांचा पल्ला
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ७५ धावांची नाबाद विस्फोटक खेळी केलेल्या एबी डीव्हिलियर्सने काल आयपीएलमध्ये आपल्या ५००० धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो दुसरा विदेशी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर (५,३९०) हा ५००० धावांचा पल्ला गाठणार एकमेव विदेशी खेळाडू होता. आयपीएलमध्ये अन्य चार भारतीय खेळाडूंनीही ५००० धावांचा पल्ला गाठलेला आहे. त्यात विराट कोहली (६,०४१), सुरेेश रैना (५,४७२), शिखर धवन (५,४५६) आणि रोहित शर्मा (५,४३१) यांचा समावेश आहे.