बुधवारी राज्यात १० हजार जणांना लस

0
159

राज्यात कोरोना लसीकरणासाठी मोहिमेत काल एकूण १० हजार १०६ जणांना लस देण्यात आली आहे. आरोग्य खात्याच्या ग्रामपातळीवरील लसीकरण मोहिमेअंतर्गत २२ पंचायत क्षेत्रांत आयोजित कोरोना लसीकरण शिबिरांतून ५१४४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तर, सरकारी आणि खासगी इस्पितळांत ३९५५ जणांना लस देण्यात आली आहे.

बुधवारी २२ पंचायतक्षेत्रांत लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पालये पंचायतक्षेत्रात २७३, तोर्से पंचायतक्षेत्रात १२४, मुळगाव पंचायतक्षेत्रात २१७, अस्नोडा पंचायतक्षेत्रात ३०४, हडफडे पंचायतक्षेत्रात २९८, मयडे पंचायतक्षेत्रात २६७, ताळगाव पंचायतक्षेत्रात ६२३, आगशी पंचायतक्षेत्रात १५९, चोडण पंचायत ३५०, म्हावशी पंचायत १३८, सावर्डे पंचायत ९८, भोम पंचायत २०३, खांडेपार पंचायतक्षेत्रात २१०, पंचवाडी पंचायत १९५, शेल्डे पंचायत २१३, पॉपुलर हायस्कूल (मडगाव) १०३, आंबावली पंचायत १३७, फार्तपा पंचायत १५१, खोला पंचायत २५४, शिरोडा पंचायत २०४, नेत्रावळी पंचायत ३८५ आणि सांकवाळ पंचायत क्षेत्रात २३८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यातील सरकारी इस्पितळे आणि खासगी इस्पितळांत एकूण ३९५५ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तसेच, मंगळवारी ६ वाजल्यानंतर १००७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

लस उत्सवाचा राजकीय
वापर नको ः आयोग

राज्यातील कोरोना लस उत्सवाचा पाच नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीत गैरवापर नको, असे राज्य निवडणूक आयोगाने काल स्पष्ट केले.

राज्यात ११ ते १४ एप्रिल दरम्यान कोरोना लस उत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता घेण्यात आली होती. आरोग्य संचालनालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे लस उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने येत्या २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोरोना लस उत्सव आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने कोरोना लसीकरणाचा राजकीय वापर होऊ नये अशी सूचना करून लसीकरणाच्या कालावधीत वाढ करण्यास मान्यता दिली आहे. कोरोना लसीकरणाचा निवडणुकीत राजकीय स्वार्थासाठी वापर केला जाऊ नये. लसीकरणाच्या जाहिरातीतून एखाद्या उमेदवार किंवा राजकीय पक्षाचा प्रचार केला जाऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी, निवडणूक निरीक्षकांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्याची सूचना केली आहे.