१० वी, १२ वी परीक्षेसाठी एसओपी जारी करणार

0
67

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी खास मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी केली जाणार आहे. एका वर्गात केवळ १२ विद्यार्थी बसण्यास मान्यता दिली जाणार असून परीक्षा केंद्रामध्ये वाढ केली जाणार आहे. तसेच, कोविडबाधित विद्यार्थी असल्यास खास विलगीकरण परीक्षा केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दिली.

राज्यातील बारावी ठरलेल्या वेळापत्रकानुसार येत्या २४ एप्रिलपासून घेतली जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे. राज्यभरात शंभरच्या आसपास परीक्षा केंद्रे तयार केली जाणार आहेत. एका परीक्षा वर्गात केवळ १२ विद्यार्थी बसण्यास मान्यता दिली जाणार आहे. परीक्षा वर्ग मोठा असल्यास पंधरा ते सतरा विद्यार्थी बसण्यास मान्यता दिली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. मास्क, सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सामाजिक अंतराचे पालन केले जाणार आहे. आगामी बारावीच्या परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, असेही अध्यक्ष शेट्ये यांनी सांगितले.

कोविडबाधित विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कुणीही व्यक्ती कोविड बाधित असल्यास त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. राज्यातील प्रमुख १८ केंद्रांवर कोविडबाधित विद्यार्थ्यांसाठी खास विलगीकरण परीक्षा केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. बाधित विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयाचे प्रमुख किंवा परीक्षा केंद्र प्रमुखांमार्फत मंडळाकडे अर्ज सादर केला पाहिजे किंवा मंडळाकडे ई-मेलच्या माध्यमातून थेट अर्ज सादर केला जाऊ शकतो. एखादा विद्यार्थी दोन किंवा चार विषयांची परीक्षा दिल्यानंतर बाधित झाल्यास त्याला जून महिन्यात होणार्‍या परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.

मडगावच्या जिल्हा इस्पितळात
‘आयसीयू’ सुरू करणार ः राणे

राज्यातील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्याचे निर्देश आरोग्य खात्याला देण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

दक्षिण गोव्यातील इस्पितळातील खाटांची संख्या वाढविण्यासाठी आयटीयू आणि आयसीयू विभाग सुरू करण्यावर भर दिला जात आहे. मडगाव ईएसआय इस्पितळात आयसीयू आणि आयटीयू विभाग सुरू केले जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ७ हजारांना लस
राज्यात कोरोना लसीकरणासाठी मोहिमेत आत्तापर्यंत १ लाख ६८ हजार ६३१ जणांना पहिला आणि ३८ हजार ५४२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण २ लाख ७ हजार १७३ जणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेमुळे लसीकरणाला थोडी गती मिळाली आहे. गुरूवारी एकूण १० हजार १९८ जणांना लस देण्यात आली आहे. आरोग्य खात्याच्या ग्रामपातळीवरील लसीकरण मोहिमेअंतर्गत १६ पंचायत क्षेत्रांत आयोजित कोरोना लसीकरण शिबिरांतून २९०४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तर, सरकारी आणि खासगी इस्पितळांत ६३३० जणांना लस देण्यात आली आहे.