बीसीसीआय झुकली

0
114

>> ‘नाडा’ करणार भारतीय क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संस्था (नाडा) अंतर्गत येण्यास काल शुक्रवारी सहमती दर्शवली. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी व महाव्यवस्थापक (क्रिकेट व्यवहार) साबा करीम यांनी क्रीडा सचिव राधेश्याम झुलनिया व नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांची नवी दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर मंडळाचा निर्णय जाहीर केला.

बीसीसीआयने आमच्यासमोर तीन मुद्दे ठेवले असून, त्यात उत्तेजक चाचणीच्या किट्सची गुणवत्ता, पॅथॉलॉजिस्टचा दर्जा आणि नमुने गोळा करण्याच्या प्रक्रियेचा समावेश होता, असे झुलनिया यांनी सांगितले. त्यांना आवश्यकतेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी काही शुल्क आकारण्यात येईल, असेही झुलनिया यांनी स्पष्ट केले आहे.

आत्तापर्यंत स्वीडनस्थित इंटरनॅशनल डोप टेस्टिंग मॅनेजमेंट (आयडीटीएम) ही संस्था क्रिकेटपटूंचे नमुने घेऊन राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला पाठवत होती. बीसीसीआयने आयडीटीएमसोबत करार केला होता. आत्ता मात्र ‘नाडा’ला सर्व हक्क प्राप्त झाले आहेत.

नाडा अंतर्गत येत नसल्यामुळे बीसीसीआय आणि सरकारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. बीसीसीआय सरकारच्या आर्थिक मदतीनुसार चालणारी संस्था नाही. त्यामुळे आम्ही नाडाच्या अंतर्गत येत नाही, असे बीसीसीआय सातत्याने सांगत होती.
पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला पुन्हा एकदा फटकारले होते. बीसीसीआयला चाचणीचे कोणतेही अधिकारच नसल्याचे म्हणत केंद्रीय क्रीडामंत्रालयाने बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना पत्र लिहून खडसावले होते. बीसीसीआयने घेतलेल्या चाचण्यांना केंद्र सरकारची संस्था ‘नाडा’ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था ‘वाडा’ यांची परवानगी नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट करत मंडळावर दबाव टाकला होता. बीसीसीआयला, ‘नाडा’च्या नियमाअंतर्गतच काम करावे लागेल, तुम्हाला नाही म्हणण्याचा अधिकारच नाहीये. प्रत्येक क्रीडा संस्थांसाठी एकच नियम बनवण्यात आला आहे आणि सर्वांना तो पाळावाच लागणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले होते.