बिहारमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेचप्रसंग

0
24

>> विद्यमान अध्यक्षांचा राजीनाम्यास नकार; आजपासून अधिवेशन

बिहार विधानसभेचे अधिवेशन बुधवार दि. २४ आणि गुरुवार दि. २५ ऑगस्टला होणार असून, त्यामध्ये नवीन नितीश कुमार व तेजस्वी यादव यांच्या महागठबंधन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र त्यापूर्वी बिहारच्या राजकारणाने आणखी एक वळण घेतले आहे. बिहार विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. सिन्हा हे भाजपचे आमदार आहेत. राज्यात सत्तांतर होऊन १३ दिवस झाल्यानंतरही सिन्हा यांनी राजीनामा दिलेला नाही. सत्ताधारी जदयू आणि राजद यांच्याकडून विजय सिन्हा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे; मात्र ते राजीनामा देण्यास तयार नाहीत. अविश्वास ठरावाची जी नोटीस देण्यात आलेली आहे, ती नियमांना अनुसरुन नाही, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय भूंकप घडवत भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दलासबोत सत्ता स्थापन केली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या महागठबंधनच्या सरकारसमोर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर येत्या २४ आणि २५ ऑगस्टला विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दि. २४ ऑगस्टला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे, तर दि. २५ ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. मात्र विजय सिन्हा यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. सिन्हा यांच्या भूमिकेमुळे बिहारच्या राजकारणात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
विजय सिन्हा यांनी काल पाटणा येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. माझ्यावर जो अविश्वास ठराव आणला गेला आहे. त्यामध्ये नियमांना आणि तरतुदींना बगल देण्यात आली आहे. त्यामुळे तो फेटाळणे माझी जबाबदारी असल्याचे सिन्हा म्हणाले.