बिपरजॉय गुजरातेत?

0
11

गोव्याच्या पश्चिमेला अरबी समुद्रात गेल्या आठवड्यात ठाण मांडून बसलेले बिपरजॉय चक्रीवादळ आता उत्तरेकडे सरकत सरकत गुजरातजवळ पोहोचले आहे. आज दुपारी ते जमिनीवर धडकेल असा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळेच त्या राज्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. आजकाल अत्याधुनिक साधनांमुळे अशा चक्रीवादळांच्या मिनिटा – मिनिटाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळेच हे वादळ कुठल्या दिशेने निघाले आहे, ते कुठे धडकू शकते याचे काही ठोकताळे बांधता येतात, मात्र, शेवटी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि निसर्ग हा लहरी आणि बेभरवशाचा असतो. त्यामुळे ऐनवेळी हे वादळ कुठल्या दिशेने सरकेल आणि नेमके कुठे धडकेल याचा निश्चित अंदाज बांधणे हवामानतज्ज्ञांनाही शक्य नसते. सध्या तरी हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्रात कुठे तरी आदळेल असा अंदाज आहे व त्यामुळे त्या प्रदेशातील, विशेषतः किनारपट्टीजवळ राहणाऱ्या जवळजवळ पंचेचाळीस हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. तिकडे पाकिस्तानला हे चक्रीवादळ आपल्याकडे सरकण्याची भीती आहे आणि कराचीपर्यंतच्या किनारपट्टीवरील गावांमध्ये मोठी स्थलांतर मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. सिंध प्रांतातील जवळजवळ साठ हजार लोकांना त्यांनी स्थलांतरित केलेे आहे आणि कराची शहरातील किनाऱ्याजवळील व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. भारत सरकारनेही गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्रकडे जाणाऱ्या रेलगाड्या खबरदारीचा उपाय म्हणून आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा बंद आहेत, व्यवसाय बंद आहेत. गुजरातच्या किनारी भागांत कालपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. देवभूमी द्वारका जिल्ह्यात काल 121 मि. मी. म्हणजे जवळजवळ पाच इंच पाऊस झाला. आजूबाजूच्या भागांतही मुसळधार वृष्टी झाली. काल संध्याकाळपर्यंत चक्रीवादळ थोडेसे सौम्य झाल्याचेही दिसले, परंतु प्रत्यक्षात जेव्हा ते जमिनीवर धडकेल तेव्हा त्याचा वादळी वेग काय असेल त्यावर त्यापासून होणारी हानी अवलंबून असेल. लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या प्रदेशात हे चक्रीवादळ जमिनीवर धडकणार आहे हे येथे लक्षात घेणे जरूरी आहे, त्यामुळेच मोठी हानी त्यातून होऊ शकते. वादळापासून बचाव करण्याची कितीही खबरदारी जरी घेतली तरी वाऱ्याचा वेग जास्त असेल तर झाडे उन्मळणे, विजेचे खांब तुटणे, दूरध्वनी मनोरे वाकणे वगैरे गोष्टी आपण टाळू शकत नाही. गुजरातच्या किनारी भागांत तर पवनचक्क्याही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची वाताहतही या वादळात होऊ शकते.
बिपरजॉय समुद्रात होते तेव्हा त्याच्या वादळी वाऱ्याचा वेग ताशी 160 ते 195 कि. मी. होता. काल दुपारी त्याचा वेग 150 कि. मी. पर्यंत कमी झाल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यात काय चढउतार होतो त्यावर या वादळाची तीव्रता अवलंबून असेल. बिपरजॉय जरी गुजरात किंवा शेजारच्या पाकिस्तानात धडकण्याची चिन्हे असली, तरी भारतीय वेधशाळेने आठ राज्यांना आज मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि त्यात गोव्याचाही समावेश आहे. गुजरातपासून केरळपर्यंतच्या राज्यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे गोव्यानेही मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन काळजी घेण्याची गरज आहे. आपला समुद्र तर गेले काही दिवस खवळलेला आहेच. समुद्रकिनारे पर्यटकांना बंद ठेवण्यात आले आहेत. बिपरजॉयने मोसमी पावसाचे वेळापत्रकच पार कोलमडून टाकले आहे. एरव्ही आपल्याकडे मृगनक्षत्राला म्हणजे पाच जूनला पाऊस अवतरतो. कधीकधी त्याचे त्याआधीच आगमन झालेले असते. मात्र, यंदा पाच जूनला मान्सून केवळ केरळपर्यंत आला. म्हणजेच तब्बल सात दिवस उशिराने तो आला. मात्र, त्यानंतर बिपरजॉयचा परिणाम म्हणून पावसाचे ढग समुद्रावरून गोव्याच्या दिशेने न जाता परस्पर उत्तरेकडे सरकत चालल्याचे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले. त्यामुळे गोव्यातही पावसाने बहुतेक वेळ दडीच मारलेली दिसून आली. शेजारच्या महाराष्ट्रात सध्या तरी तुरळक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे पेरण्या करण्यास सज्ज असलेले तेथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. भारतासारखा देश हा कृषिप्रधान देश असल्याने पावसावर, त्यातही मान्सूनवर त्याचे पीकपाणी अवलंबून असते. नैऋत्य मोसमी पाऊस कमी होणे याचा अर्थ देशातील पिकांवर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. त्याचे चटके मग अर्थव्यवस्थेलाही सोसावे लागतात. त्यामुळे बिपरजॉयचा प्रभाव ओसरल्यानंतर तरी मोसमी पावसाने जोर धरावा आणि सध्याची तूट भरून काढावी अशी आपण अपेक्षा करूया.