बारावी उत्तरपत्रिका घोळाबाबत मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवला

0
101

गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी घोळाप्रकरणी काल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंडळाला सविस्तर अहवाल सादर करण्यास फर्मावले आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती ‘नवप्रभे’ला दिली. वरील घोळामुळे शिक्षण मंडळातही खळबळ निर्माण झाली आहे. संगणकावर फेरतपासणी करण्याच्या प्रस्तावास मंडळाच्या अनेक सदस्यांचा विरोध होता, परंतु मंडळाचे अध्यक्ष रिबेलो यांनी धिसाडघाईने वरील निर्णय घेण्यास भाग पाडल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. शालान्त मंडळाने सरकारला अहवाल सादर केल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीत कोणता घोळ झाला हे स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, शालान्त मंडळ मात्र आपली चूक कबूल करण्यास तयार नाही. उत्तरपत्रिका तपासणीत दरवर्षी चुका होत असतात. यंदाही त्या झाल्या. ज्या मुलांनी फेरमूल्यांकनाची मागणी केली त्यांचे फेरमूल्यांकन करण्यात आले. त्यातील काही मुलांना जास्त गुण मिळाले हे खरे मात्र, जास्तीत जास्त मुलांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी योग्य रितीनेच झाल्याचे गोवा शालान्त मंडळाचे चेअरमन जे. आर. रिबेलो यांनी सांगितले. याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे काय, असे विचारले असता त्याची गरज आहे असे आपणाला वाटत नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्याचबरोबर याप्रकरणी चर्चा करण्याची गरज असेल तर शालान्त मंडळ त्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. गुणांचे फेरमूल्यांकन करताना जर एखाद्या विद्यार्थ्यांला चुकून कमी गुण देण्यात आले असल्याचे आढळून आल्यास दुरुस्ती करून गुण वाढवून देण्यात येतात. मात्र, एखाद्या विद्यार्थ्यांला चुकून जास्त गुण देण्यात आले असल्याचे आढळून आल्यास मात्र त्याचे गुण आम्ही कमी करीत नसतो, असे रिबेलो यांनी स्पष्ट केले.