बायोस्कोप – ४ क्वारंटाइन

0
88
  • प्रा. रमेश सप्रे

वाचन, वादन, गायन, नर्तन, भजन यासारख्या कलांची साधना करण्यासाठी क्वारंटाइन ही पर्वणी असते. ज्यावेळी इतर जण आपला संपर्क नि संसर्ग टाळतात त्यावेळी ते आपल्यापासून दूर असतात ही एक इष्टापत्ती समजली पाहिजे.
एकूण काय रोगट क्वारंटाइन नव्हे तर निरोगी बनण्यासाठी- राहण्यासाठी एकांतवास ही देणगी स्वतःच स्वतःला द्यायला हवी.

‘क्वारंटाइन’ला मराठी शब्द कोणता असं विचारलं तर बहुसंख्य मंडळींना तो माहीत नाही. वृत्तपत्र सोडली तर दूरचित्रवाणीच्या सर्व भाषातील वाहिन्यांवर सर्व सार्वजनिक वाहतुक सेवांतून म्हणजे बस-ट्रेनमध्ये, अगदी रस्त्यावरसुद्धा क्वारंटाइन हाच शब्द वापरला जातो. हा, त्याचे उच्चार निरनिराळे असतात. पण ‘विलगीकरण’ कुणीही म्हणत नाही. अगदी पोदेर (पाववाला), भाजीवाली, मासेवाला सर्वजण हाच शब्द वापरतात- क्वारंटाइन!
तसं पाहिलं तर कोविडच्या संदर्भात हा शब्द जरी गेल्या वर्षी असंख्य वेळा वापरला गेला तरी यापूर्वी सु. चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वी एका ऐतिहासिक प्रसंगासंदर्भात तो वापरला गेला होता. मानवाची यशस्वी चांद्रस्वारी. अपोलो-८ या अंतरीक्ष यानानं इतिहास घडवला होता. चंद्रावर पदार्पण करून विजयी विश्‍वमानव म्हणून पृथ्वीवर अवतरलेल्या आर्मस्ट्रांग- आल्ड्रिन आदींना आल्या आल्या क्वारंटाइनमध्ये ठेवलं गेलं. त्यांच्या अंतराळवीराच्या पोषाखावर किरणोत्सर्ग, अज्ञात जीवजंतू (असलेच तर!) यांचा काही परिणाम झाला आहे का, तसेच त्या वीरांच्या प्रकृतीवर, देहातील निरनिराळ्या संस्थांवर (बॉडी सिस्टम्स) काय प्रभाव पडलाय याचा अभ्यास, निरीक्षण नि परीक्षण करण्यासाठी ते क्वारंटाइन होतं.

कोविडनं मात्र असे एरवी फारसे वापरात नसलेले शब्द व शब्दप्रयोग प्रचारात आणले. क्वारंटाइन म्हणजेच विलगीकरण या प्रकारात रोग झालेल्या व्यक्तीला इतरांपासून दूर ठेवायचं असतं. बाकीच्यांचा संपर्क कमीत कमी कसा येईल आणि त्यामुळे रोगाचा संसर्ग किमान कसा होईल याचा प्रयत्न क्वारंटाइन व्यवस्थेत असतो. होम-क्वारंटाइन हा असाच प्रकार. हॉस्पिटल्स कोविड रुग्णांनी भरून वाहायला लागल्यावर होम- क्वारंटाइनशिवाय पर्याय नव्हता. एका खोलीत बंदिस्त राहणं हे अनेकांना बिलकुल सवय नसल्यामुळे खूप अवघड होतं. काही मंडळींनी मात्र क्वारंटाइनचा फायदा विश्रांती, व्यायाम, छंदविकास, वाचन- श्रवण, उपासना यासाठी पुरेपूर करून घेतला. म्हणून ही मंडळी क्वारंटाइनला छुपं वरदानच समजतात (ब्लेसिंग इन् डिसगाइज). असो. आपत्काळात आपद्धर्म म्हणून जे जे केलं जातं त्याचा जणूकाही सूड म्हणून परिस्थिती सुधारल्यावर अगदी विरुद्ध वर्तन, निषेध किंवा बंडखोरी म्हणून केलं जातं. त्याचे दुसरे दुष्परिणाम भोगावे लागतात.

आता कोरोना- कोविडचं (कोकोचं) ग्रहण सुटत आलंय. या काळात काही चांगल्या गोष्टी आपण निश्चितच चालू ठेवू या. निराळ्या रुपास्वरुपात! त्यापैकी एक म्हणजे क्वारंटाइन! इतरांपासून केवळ तुटून दूर राहणं (विलगीकरण) म्हणजे क्वारंटाइन हा अर्थ फार मर्यादित आहे. यापेक्षा एकांतवास, एकांतसेवन, एकाकी वाटू न देता एकटं राहणं या गोष्टी आपल्या आतल्या विकासासाठी (आत्मविकासासाठी) अत्यावश्यक आहेत. विशेषतः आजच्या धामधूमीच्या जीवनात, गदारोळाच्या काळात तर एकांतसेवन म्हणजे एकांतात राहण्याचा अनुभव अत्यावश्यक बनला आहे.
गोमंतकासारखा शांत, निसर्गरम्य वातावरणात असा एकांत मिळणं सहजशक्य आहे. पण हल्ली संधी मिळाली की विकेंड आउटिंग्ज, ट्रेकिंग, पार्टी गेटटुगेदर्स (या शब्दांना चपखल असे पर्यायी मराठी शब्द- जे सर्वांना समजतील- असे नाहीत.)
एकांतात आपण स्वतःच्या समोर उभे राहतो. त्याचे अनेकविध लाभ आहेत. उदा.-

  • आपले गुण- दोष आपल्या लक्षात येतात. त्याप्रमाणे निरीक्षण मात्र केलं पाहिजे.
  • आपल्या आजपर्यंतच्या जीवनाचा विचार करून आपलं ध्येय किंवा स्वप्न, त्यासाठी आजपर्यंतचे प्रयत्न, यापुढच्या जीवनात स्वप्नपूर्तीसाठी काय करायला हवं यावर मनात मंथन.
  • आपल्याला आजवर नि भविष्यात उपलब्ध असलेल्या संधी (ऑपर्च्युनिटीज्) आणि त्या मिळवण्यात आपल्यातील उणीवांची भरपाई असं अंतःपरीक्षण करण्यासाठी एकांतवास ही सुवर्णसंधी.
  • वाचन, वादन, गायन, नर्तन, भजन यासारख्या कलांची साधना करण्यासाठी क्वारंटाइन ही पर्वणी असते. ज्यावेळी इतर जण आपला संपर्क नि संसर्ग टाळतात त्यावेळी ते आपल्यापासून दूर असतात ही एक इष्टापत्ती समजली पाहिजे.
  • मौनाचा अभ्यास करण्यासाठी मोबाइलसारख्या जगाला जोडणार्‍या साधनांचा कमीत कमी उपयोग केला पाहिजे. आपली अंतर्शक्ती जी बोलण्यातून सर्वात अधिक वाया जाते तिचा संचय करायला शिकलं पाहिजे.
  • प्रत्येकाला त्याच्या कार्यक्षेत्रानुसार अभिनव कल्पना, विचार, प्रकल्प सुचू शकतील. त्याची नोंद ठेवली पाहिजे. यातून सृजनशीलता, नवनव्या कल्पनांची कार्यवाही अशा जीवन घडवणार्‍या क्षमतांचा विकास होऊ शकेल.
  • हल्ली सर्वांना, विशेषतः खूप कामकाज किंवा कार्यभार असलेल्या व्यावसायिकांना अशा सर्वांपासून दूर राहून निसर्गाच्या सांनिध्यात, आपल्या अंगच्या कलाकौशल्यांच्या आविष्कारात अनेकांना अभूतपूर्व आनंदाचा अनुभव घेता येईल. इच्छाशक्ती मात्र हवी. अशा सुट्टीला केवळ व्हेकेशन न म्हणता रिट्रीट म्हणतात (म्हणजे प्रत्याहार- स्वतःच्या आत उतरण्यासाठी संधी) कायम बहिर्मुख, बहिर्गामी असलेल्या तनामनाला अंतर्यात्रेसाठी असा एकांतवास ही सुसंधी असते.
    एकूण काय रोगट क्वारंटाइन नव्हे तर निरोगी बनण्यासाठी – राहण्यासाठी एकांतवास ही देणगी स्वतःच स्वतःला द्यायला हवी.
    ज्यांना आध्यात्मिक उपासनेची ओढ असते त्यांनी प्रार्थना करायला हरकत नाही…
    ‘गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे,
    देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे |’