बायोस्कोप – ३ कोकोच शत्रू कोकोचा

0
226
  • प्रा. रमेश सप्रे

तुझा सर्वांत चांगला मित्र (हितचिंतक) तू स्वतःच आहेस आणि तुझा सगळ्यात वाईट शत्रू (हितशत्रू)ही तूच आहेस. असं असताना आपण इतरांकडे कशाला बोटं दाखवायची?

तिघंचौघं मित्र आपापल्या वैद्यकीय उपचारपद्धतीविषयी गरमागरम चर्चा करत होते.
एक – ‘आम्ही रोगाची लक्षणं पाहतो नि त्यानुसार इलाज करतो.’
दुसरा – ‘आम्ही व्याधीच्या कारणांच्या मुळापर्यंत जाऊन उपचार करतो.’
तिसरा – ‘आमचं शास्त्र सरळ सोपं आहे.- उष्णतेनं उष्णता मारायची, तर थंडीनं थंडी.’
चौथा – ‘मला तुमचं काही कळत नाही. एक मात्र निश्चित कोको किल्स कोको!’
शेवटच्याचं ते वाक्य ऐकून पहिले तिघे कोरस स्वरात उद्गारले- ‘म्हणजे?’
‘अरे, अगदी सोप्पं आहे. कोरोना- कोविड या कोकोनं जवळजवळ वर्षभर सार्‍या दुनियेला पिडलंय, हे माहितै ना? आता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन हेही ‘कोको’च की! आता लसीकरण सुरू झालंय तर थोड्याच कालावधीत आपण कोरोना- कोविडवर मात केली असेल. आहे किनई कोको किल्स कोको!’
या चौथ्या व्यक्तीच्या बोलणत तथ्य आहे. पण त्यातला मथितार्थ लक्षात घ्यायला हवा. या दोन लसी आपल्या देशातील संशोधकांनी नि डॉक्टरांनी त्यामानानं अल्पावधीत शोधून काढणं हे कौतुकास्पद आहे. सारं विश्व त्यांचं कौतुक करतंय. आपल्या या दिवसरात्र संशोधनात मग्न असलेल्या व्यक्तींबद्दल सार्थ अभिमान वाटला पाहिजे. तरीही अनेक मंडळींना यात एखादं कटकारस्थान दिसतंय. तोंडाला येईल ते बरळलं जातंय. अशा बुद्धिवंतांच्या बुद्धीत कोरोना विषाणू शिरलाय. त्यांना मनाचा कोविड झालाय. यातून कसं सुटायचं? निदान आपल्या मनाबुद्धीला अशी लागण होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.

यावेळच्या बायोस्कोपमध्ये याच्यावर चिंतन करायचं. सॅनेटायझेशन ऑफ माइंड अँड व्हॅक्सिनेशन ऑफ ब्रेन- म्हणजे मनाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. तसं बुद्धीला योग्य विचारांची (विचारपद्धतीची) लस टोचली पाहिजे. विशेष म्हणजे हे मनाचं निर्जंतुकीकरण आणि बुद्धीचं लसीकरण ज्याचं त्यानं केलं पाहिजे. म्हणजे इतर अनेक गोष्टी सहाय्यक ठरतील पण खरा उपचार हा आपला आपणच करायला हवा.
भगवद्गीतेत अशाच संदर्भात श्‍लोक आहे. ‘उद्धरेत्मनात्मानम् नात्मानं अवसादयेत्’. पुढे असंही म्हटलंय – तुझा सर्वांत चांगला मित्र (हितचिंतक) तू स्वतःच आहेस आणि तुझा सगळ्यात वाईट शत्रू (हितशत्रू)ही तूच आहेस. असं असताना आपण इतरांकडे कशाला बोटं दाखवायची? म्हणतात ना –
‘ज्यावेळी एक बोट दोष दाखवण्यासाठी तू इतरांकडे रोखत असतोस, त्याचवेळी उरलेली चार बोटं तुझ्या दिशेनं वळलेली असतात.’
अशा छोट्या छोट्या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात.

  • मनाचं निर्जंतुकीकरण म्हणजे शुद्धीकरण. हल्लीच्या काळात मनावर नुसता ताणच येत नाही तर निरनिराळे एकमेकाच्या विरुद्ध विचार मनावर येऊन आदळतात. साधं वृत्तपत्रं किंवा दूरचित्रवाणीच्या (टी.व्ही.) अनेकानेक वृत्त वाहिन्या यांचं उदाहरण घेतलं तर हे सारे ‘न्यूज’ कमी नि स्वतःचे ‘व्ह्यूज’ अधिक देतात. न्यूजपेपरचा बनलाय व्ह्यूजपेपर. यात वाईट म्हणजे निखळ सत्यघटनांवर आधारित निर्भेळ बातम्या किंवा वृत्तांत आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. प्रसारण होतं आपला पक्ष, आपला गट, आपला मंच अशा संकुचित विचारांचा.
    यामुळे मन नुसतं गोंधळून जात नाही तर ते दूषित- प्रदूषित बनतं. रुग्ण बनतं मन. सिक् माइंड! म्हणून हे सत्यापासून दूर नेणारे पण प्रभावीपणे मांडलेले विचार हे जंतू बनतात. निर्जंतुकीकरण करायचं ते याचं.
  • यासाठी चाळणी लावून, फिल्टर लावून विचार स्विकारण्याचं कौशल्य विशेषतः अतिशय संवेदनशील अवस्थेतील अरुणांना- तरुणांना (टीनएजर्सना) शिकवलं पाहिजे.
  • घरात, विद्यालयात एकाच विषयावरच्या निरनिराळ्या वृत्तपत्रातील एकाच घटनेसंबंधीच्या वृत्त – वृत्तांतावर खुली चर्चा झाली पाहिजे. यासाठी घरी – शाळेत मुद्दाम वेळ ठेवला पाहिजे. या संदर्भात ते यशस्वी झालेले प्रयोग पाहण्यासारखे आहेत.
  • मुक्तशरसंधान – ठरवलेल्या वेळेत शिक्षकांना कोणतेही प्रश्‍न विचारायचे ज्याची उत्तरं आपल्याला उपयोगी पडणार आहेत. नुसते प्रश्‍नासाठी प्रश्‍न नाही विचारायचे. एका ठराविक विषयावर विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरं मिळवताना मनाचं शुद्धीकरण तर होतंच पण सबलीकरण होतं. विचारांच्या कक्षा विस्तारतात.
  • मला सोलून काढा (स्किन् मी अलाइव्ह) – यावेळी शिक्षक- पालक तसेच मुलं- विद्यार्थी यांच्या वागण्यातले, स्वभावातले, शिकण्या – शिकवण्याच्या पद्धतीमधले गुण-दोष, विशेषतः दोष यांची खुली चर्चा करायला हवी. खुल्या दिलानं स्विकार करायला पाहिजे अशा सत्रातून मिळालेल्या सूचनांचा नि मार्गदर्शनाचा.
  • बुद्धीचं लसीकरण – चांगले विचार, विधायक कल्पना, कल्याणकारी योजना, व्यक्तिमत्त्व विकासासाठी केलेलं समुपदेशन (कौन्सेलिंग) यामुळे बुद्धीची वाईट गोष्टींचा प्रतिकार करण्याची क्षमता (इम्युनिटी) वाढते. आपण असत्य – अफवा – चुकीचा प्रचार – खोट्या जाहिराती यांच्यापासून मुक्त राहतो. बुद्धीचं आरोग्य चांगलं राखलं जातं. असं इन्जेक्शन नियमित कालांतरानं मिळत राहणं बुद्धीच्या आरोग्यासाठी उपकारक गोष्ट आहे.
    अशाप्रकारे २०२० हे वर्षं कोरोना – कोविडच्या सक्तीचं वर्ष होतं. २०२१ हे वर्ष कोव्हॅक्सिन- कोविशिल्ड या लसींमुळे मिळणार्‍या शक्तीचं वर्ष ठरू दे. कोकोतून मुक्ती कोकोद्वारेच. म्हणूनच म्हटलं – कोको किल्स कोको!