बायोस्कोप कॅलिडोस्कोप

0
111
  • प्रा. रमेश सप्रे

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा कॅलिडोस्कोप कालचक्र नि घटनाचक्र यानुसार बदलतच असतो. मुख्य भूमिका पाहणार्‍याची म्हणजे प्रत्येकाची असते. कॅलिडोस्कोपमधली नक्षी कशी पाहायची? हसत हसत की कण्हत कण्हत? उत्तर तसं उघडच आहे नाही का?

‘कलाइडोस्कोप’ असंही म्हटलं जातं. मराठीतला शब्द अधिक चित्रदर्शी नि अर्थवाही आहे – शोभादर्शक! शोभा म्हणजे सौंदर्य. नेत्रदीपक सौंदर्याची देखणी नक्षी असलेला पक्षी म्हणजे मोर. त्याचप्रमाणे सतत नक्षी बदलणारं विज्ञानातलं साधन किंवा मुलांचं खेळणं म्हणजे शोभादर्शक.

शाळकरी मुलांकडून विज्ञान- प्रदर्शनासाठी जी काही वैज्ञानिक तत्त्वावर आधारित खेळणीवजा साधनं करून घेतली जातात त्यात ‘शोभादर्शका’चा समावेश असतोच. ‘समावेश असतोच’ असं म्हणण्याऐवजी ‘समावेश असायचाच’ हे म्हणणं योग्य होईल.
कारण पूर्वीच्या विज्ञान विषयाचं शिक्षण नि आजचं या विषयाचं शिक्षण यात खूप परिवर्तन घडलंय. आज उपलब्ध असलेली शैक्षणिक दृक्‌श्राव्य (ऑडियोव्हिज्युअल) साधनं पूर्वी नव्हती. विज्ञानाच्या विशेषतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर अनेक उपकरणं, यंत्रं, साधनं यांचा समावेश शिक्षणात झाला. हे सांगायचं कारण म्हणजे शोभादर्शकातील शिक्षणाचा आकृतिबंध (पॅटर्न) बदलला.
कॅलिडोस्कोप बनवणं अगदी सोपं असतं. तीन एकाच आकाराच्या आरशाच्या काचेच्या (मिरर्) पट्‌ट्या घेऊन त्या त्रिकोणाकृतीत एकमेकाला जोडायच्या. एक बाजू बंद करून आत काही काकणांच्या (बांगड्यांच्या) काचांचे तुकडे घालायची. मग दुसरी बाजू बंद करून आत पाहण्यासाठी एक छिद्र ठेवायचं. बस्! हा शोभादर्शक हातात घेऊन फिरवला की दुसरी नक्षी तयार! प्रत्येक वेळी नवी- नवी नक्षी तयार. यामुळे नाव दिलं गेलं शोभादर्शक.
जीवनाचाही जसा बायोस्कोप असतो तसा कॅलिडोस्कोपही असतो.
हेच पहा ना ः * नक्षी क्र. १ – कुटुंबातली मुलगी. घरातल्यांची लाडकी. कुटुंबाच्या शोभादर्शकात इतर सदस्यांबरोबर तिचाही एक काचेचा तुकडा. कुटुंबाच्या नक्षीतला महत्त्वाचा घटक.

  • नक्षी क्र. २ ः- मुलगी लग्नाची झाली. चांगलं शिक्षण, नोकरीमुळे चांगला नवरा मिळाला. मुलगी योग्य स्थळी म्हणून घरात आनंदीआनंद!
  • नक्षी क्र. ३ ः- काही केल्या मुलीचं लग्नच जमत नाही. काहीतरी अडचण प्रत्येक वेळी येते. व्रतं – पूजा – कौल (प्रसाद) सर्व प्रकार झाले. मुलीचं वय तिशीकडे झुकलं. घरातलं वातावरण काहीसं गंभीर, उदास. यामुळे निराळीच नक्षी शोभादर्शकात दिसते.
    नक्षी क्र.४ ः- मुलीनं घरातून पळून जाऊन परधर्मीय मुलाशी लग्न केलं. आईला सर्वांत जास्त धक्का बसला. लोक काय म्हणतील याची चिंता घरातल्या सर्वांना लागून राहिली. नक्षी बदलली.
  • नक्षी क्र. ५ ः- एकदाचं जमलं मुलीचं लग्न. सारंकाही ठीकठाक चालत असताना एकदम काहीतरी घडलं अन् घटस्फोटाच्या तयारीनंच मुलगी घरी परतली. घरात अशांती, अस्वस्थता परत घराची शोभादर्शकता नक्षी बदलली.

अशा एक ना दोन सतत बदलत असलेल्या घटना प्रत्येकाच्या जीवनाच्या शोभादर्शकात नक्षी बदलत राहतात. कोणत्या क्षणी कोणती नक्षी असेल याची खात्री नाही. या वस्तुस्थितीला सामोरं कसं जायचं? नकारात्मक मानसिकतेनं की सकारात्मक मनोवृत्तीनं. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. या वस्तुस्थितीचा स्वीकार कसा करायचा यावर या शोभादर्शकातल्या नक्षींची शोभा अवलंबून असते.

समाजातील परिस्थितीचाही शोभादर्शक असतोच की! गेले वर्ष-दीड वर्ष सारं जग कोविड नावाच्या महामारीच्या ऑक्टोपसी विळख्यात सापडलंय. एका पायातून सुटतो न सुटतो की दुसर्‍या पायांनी अडकवलंच म्हणून समजा. आठच नव्हे तर असंख्य पायांचा हा कोरोना महाऑक्टोपस जगाचा घास घेऊन, घात करून राहिलाय. पण आपल्या देशात या परिस्थितीच्या शोभादर्शकात निरनिराळ्या नक्षी तयार झाल्या.

  • नक्षी क्र.१ – प्रचंड भीति, अभूतपूर्व लॉकडाऊन, सारे व्यवहार ठप्प. असा अनुभव युद्धकाळातही अनुभवला नव्हता. सारेच भ्रमित नि भयग्रस्त.
  • नक्षी क्र.२ – घरोघरी घरातली माणसं घरच्या घरीच. त्यामुळे एक अननुभूत (यापूर्वी न अनुभवलेलं) असं वातावरण घरात तयार. जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला, स्मृती ठळक झाल्या, नवीन कौटुंबिक खेळ, खाण्याचे पदार्थ, जीवनशैली यामुळे आरंभीच्या काळात खूप बरं वाटलं सर्वांना. नक्षी अधिक सुखावह झाली.
  • नक्षी क्र.३ – घराबाहेरच्या कोरोनाचा आतंक वाढत गेला. अनेक घरातली माणसं कोविडग्रस्त झाली. बाधितांचा नि मृतांचा आकडा काळजाचा ठोका चुकावा तसा घडोघडी वाढत होता. घरात राहणं आवश्यक असलं तरी आजुबाजूला अंधारच होता.
  • नक्षी क्र.४ – नवनव्या कल्पना शोधून काढून जनतेचं मनोधैर्य टिकवण्याचे प्रयोग सुरू झाले. दिवे विझवण्यापासून, आशेचा एक तरी दिवा देवासमोर पेटवून ठेवण्यापर्यंत, थाळ्या वाजवण्यापासून टाळ्या पिटून भीतीला पिटाळण्यापर्यंत अनेक प्रयोग केले गेले. – अनेक व्यक्ती, संघटना पुढे येऊन देणग्या, प्रत्यक्ष कार्य करू लागल्या. कोविड- वॉरियर्सवर (स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा, लोकसेवा करणारी मंडळी) हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षा अशा उपक्रमातून एक नवीनच नक्षी तयार झाली.

अशाप्रकारे जीवनाचा हा शोभादर्शक आपल्याला नवंनवं विश्‍वरूपदर्शन घडवत आपल्याला अंतर्मुख बनवू लागला. खरं जीवनशिक्षण होतं, नव्हे आहे हे.

शोभादर्शक नावाचं खेळणं अजूनही जत्रेत मिळतं. काचांचे रंग, आकार, प्रकार यामुळे बदलत जातात आकृतिबंध नि बदलत राहतात चित्रविचित्र नक्षी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा कॅलिडोस्कोप कालचक्र नि घटनाचक्र यानुसार बदलतच असतो. मुख्य भूमिका पाहणार्‍याची म्हणजे प्रत्येकाची असते. कॅलिडोस्कोपमधली नक्षी कशी पाहायची? हसत हसत की कण्हत कण्हत? उत्तर तसं उघडच आहे नाही का?