‘पंचप्राण’ आणि त्यांचे कार्य योगसाधना – ५१४ अंतरंग योग – ९९

0
602
  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपल्या जीवनातून निरुपयोगी गोष्टी फेकून देता आल्या पाहिजेत. हलक्या प्रकारचे रागद्वेष, खोटे अहंकार, अविवेकी क्रोध वगैरे गोष्टी जीवनात हानिकारक आहेत. अशा गोष्टींना त्याज्य समजून दूर केले पाहिजे.

विश्‍वात जे कुणी जिवंत आहेत त्यांना तीन गोष्टींची आवश्यकता आहे- घन पदार्थ (भोजन), द्रव पदार्थ (पाणी वगैरे) आणि हवा. ही यादी फार मोठी आहे. यात फक्त मनुष्यच आहे असे नाही. तर करोडो जीव-जंतू, प्राणी, पशू, पक्षी आहेत. तसेच वृक्ष-वनस्पती देखील आहेत.
ह्यातील काहीजण – पशू, पक्षी, प्राणी, मानव हवा घेताना दिसतात. म्हणजे ते श्‍वास घेतात आणि ते सहज कळते, दृष्टिक्षेपात येते. अनेक जीवजंतू व वृक्षवनस्पती श्‍वास घेताना दिसत नाहीत, पण त्यांनादेखील हवेची गरज आहेच.
घन, द्रव पदार्थांशिवाय जीव अनेक दिवस जगू शकतो. पण हवेशिवाय फक्त काही मिनिटेच जगणार. ह्या हवेतील मुख्य घटक म्हणजे प्राणवायू. जोपर्यंत प्राणवायू आहे, तोपर्यंत त्या जिवात प्राण आहे. श्‍वास बंद झाला तर प्राणही गेला. अथवा प्राण गेला तर श्‍वास बंद होतो.

भारतातील थोर महापुरुषांनी, तत्त्ववेत्त्यांनी, ऋषी-महर्षींनी हवा या विषयावर पुष्कळ चिंतन केले. अभ्यास केला, गहन संशोधन केले. त्यामुळे ‘पंचप्राण’ ह्या संकल्पनेचा शोध लागला.

  • पंचप्राण- प्राण, अपान, समान, उदान, व्यान.
    हृदयात -प्राण, गुदस्थानात-अपान, नाभिमण्डलात समान, कंठात उदान, व्यान- संपूर्ण शरीरात.
    त्या पंचप्राणातील प्रत्येक घटक आपले कार्य व्यवस्थित करतो. म्हणून हे सर्व शरीर व इंद्रिये व्यवस्थित चालतात.

१) प्राण- हृदयातील हा घटक किती महत्त्वपूर्ण आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. कारण हृदय बंद पडले तर प्राणाचे अस्तित्वच संपते. आजकाल हृदयरोगाचे रुग्ण पुष्कळ प्रमाणात वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी वृद्धांना (साठनंतर) होणारा हा रोग आता तरुणवयात देखील दिसून येतो. त्याची कारणे अनेक आहेत- ताणतणाव, हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचित पावणे, बंद होणे… वगैरे. त्यासाठी विविध उपायांबरोबर… ताणतणाव कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधे, रक्तातील कॉलेस्टरॉलसारखे घटक कमी करण्यासाठी व्यवस्थित समतोल भोजन, व्यायाम, योगासने-इत्यादी शास्त्रशुद्ध प्राणोपासनेमुळे हृदयातील प्राणाला बळकटी येते. हे विकार कमी होऊ शकतात.
पूर्वी सर्व वृद्धांची हृदयें निरोगी असत. ते दीर्घायुषी असत. याची कारणे अनेक आहेत. पण मुख्य म्हणजे जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. ताणतणाव आजच्यासारखा नव्हता. भोजन सात्त्विक होते. चालणे-फिरणे पुष्कळ होत होते. कारण वाहने कमी होती, व्यसने कमी होती. घरी व समाजात भक्ती नियमित व व्यवस्थित होत होती, एकत्र कुटुंबे होती, तंटे-बखेडे, घटस्फोट, बलात्कार फार नव्हते… आजच्या जीवनात-नवीन पिढीला तरी या सर्व गोष्टीत नावीन्य वाटते.
ह्या सर्व गोष्टी कलियुगात किती टाळता येतील माहीत नाही. पण प्राणोपासनेमुळे त्या व्यक्तीला तरी फार फायदा होईल.

२) अपान वायू फारच महत्त्वाचा आहे. शरीराच्या अधःस्थानात राहून तो विसर्जनाचे महान कार्य करतो. प्राणी जीवंत, म्हणजे मलमूत्र व इतर कचरा तयार होणारच. त्यांचे वेळीच संपूर्ण विसर्जन गरजेचे आहे. तसे केले नाही तर अनेक तर्‍हेचे रोग शरीराला जडतात. व्यक्तीला पुष्कळ त्रास होतो. विसर्जनाची क्रिया नियमित व योग्य पद्धतीने चालली तर शरीर विशुद्ध राहते. प्रत्येकाला याचा अनुभव आहे. मनाला समाधान लाभते.
पू. पांडुरंगशास्त्री ह्या संदर्भात सांगतात की आपल्या जीवनातूनही निरुपयोगी गोष्टी फेकून देता आल्या पाहिजेत. हलक्या प्रकारचे रागद्वेष, खोटे अहंकार, अविवेकी क्रोध वगैरे गोष्टी जीवनात हानिकारक आहेत. अशा गोष्टींना त्याज्य समजून दूर केले पाहिजे. कुटुंब, समाज, राष्ट्र किंवा प्रभुकार्यातही मनाची संकुचितता, बुद्धीची जडता, दृष्टीचा पूर्वग्रह बाधक ठरतो. अशा गोष्टींना प्रथम संधी देऊन त्यांचे विसर्जन झाले तरच कार्यसिद्धी होते आणि कार्यकर्ते मानसिक शांती व प्रसन्नता अनुभवतात. ह्याप्रमाणे ‘अपान’ वायूची उपासनादेखील कार्यसिद्धीमध्ये फारच उपकारक ठरते.

३) समान- हा वायू नाभिस्थानात राहून कफ, वात व पित्त यांचे समत्व राखतो. आयुर्वेदाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे माणसाच्या तीन तर्‍हेच्या प्रकृती असतात. कफ, वात, पित्त. त्याप्रमाणे अनेक गोष्टी प्रस्थापित होतात. त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याला होणारे रोग, रोगोपचारामध्ये फरक. कुठलीही एक प्रवृत्ती जास्त असली तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीला तसे रोग, तसा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून समतोलता अत्यंत महत्त्वाची आहे.
मानवी जीवनातदेखील ही समत्ववृत्ती अत्यावश्यक आहे. ह्या संदर्भात श्रीमद्भगवद्गीतेत देखील श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात-
योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय|
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते॥

  • गीता- २.४.८
  • हे धनंजया! कर्मफळाची आसक्ती सोडून, यशापयशाविषयी सारखी बुद्धी ठेवून योगयुक्त होत्साता कर्में कर. ह्या समत्वबुद्धीलाच योग म्हणतात.
    ह्या संदर्भात शास्त्रीजी म्हणतात – की सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय, यश-अपयश, सफलता-निष्फलता… वगैरे बाबतीत समवृत्ती राखणे हाच खरा योग आहे. कोणतेही अपयश कायमचे असत नाही. अपयश हे यशाचा विरोध नाही तर विलंब सुचविते. अपयशाच्या पायर्‍यांवरूनच यशाची शिडी निर्माण होते. अवसर आपल्यामध्ये निराशा-प्रेरक न बनता सर्व पुरुषार्थाची प्रेरणा प्रगट करणारे बनले तर आपण समवृत्तीचे म्हणजेच समान वायूचे उपासक आहोत असे म्हणू शकतो. कोणत्याही प्रसंगात जो स्वतःचे मानसिक संतुलन गमावून बसत नाही, तोच माणूस महान व महान कार्याचा साधक बनतो. भगवान बुद्धानेदेखील धर्म प्रसारासाठी जाणार्‍या आपल्या शिष्यांना ह्याच कसोटीवर कसून पाहिले होते. बाह्य यशापयशापेक्षा आत्मिक विकासावर ज्याच्या सफलतेचा आधार असतो असा माणूस कधी निष्फळ बनत नाही. तसेच स्वतःचे मानसिक समत्व गमावत नाही.

४) उदान- कंठात राहणारा हा वायू भाव व्यक्त करण्याचे काम करतो. प्रत्येक व्यक्तीला शिंक अथवा ढेकर ह्यांचा पुरेपूर अनुभव आहे. ह्या दोन्ही क्रिया अपान वायूमुळे घडतात. शिंक येण्याच्या आधी आपल्या नाकात एक विचित्र पीडादायक अनुभव येतो. तदनंतर शिंक आल्यावर बरे वाटते. केव्हा केव्हा ही शिंक नाकात धुळीचे कण, धूर अथवा तत्सम गोष्टी गेल्यामुळे येते. तसेच पोटात गॅस साचल्याने गुदमरायला होते. व्यवस्थित ढेकर आले की बरे वाटते. गॅसची अनेक कारणे आहेत. पण मुख्य म्हणजे अपचन होणे. सारांश काय तर ह्या दोन्ही पीडांचे निवारण करण्यासाठी उदान मदत करतो.
पूजनीय पांडुरंगशास्त्री ह्या क्रियेकडे एका वेगळ्याच भावनेने बघतात. त्यांचं मत आहे की शिंक आल्याने जसे डोक्याचे दुखणे कमी होते व ढेकर आल्यामुळे पोटाचा भार हलका होतो तसेच अन्य माणसाबद्दलच्या आपल्या भावाच्या व्यक्त करण्याने त्याच्या आणि आपल्या संबंधात असलेला भार व क्लिष्टता दूर होते व संबंध हलके, फुलासारखे होतात. आपल्या मनोभावांचे प्रकटीकरण आपल्याला तसेच समोरच्या व्यक्तीला सुखकारक होते. अतिशयोक्तीप्रमाणे अल्पोक्ती किंवा न्यूनोक्तीही नुकसानकारक आहे. एकमेकांबद्दलचे स्वतःचे भाव व्यक्त करण्याच्या संकोचामुळे कितीतरी दाम्पत्यांचे जीवनातील काव्य नष्ट झालेले आहे. कार्यात देखील सहकार्य करून प्रत्येकाचा स्वतःचा भाव प्रगट करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशंसेची दोन-चार पुष्पे उधळणे हे विष्णुसहस्रनामाचे पारायण करण्याइतके पवित्र कार्य आहे. भावाला वाणीतून व्यक्त करण्याची अमूल्य देणगी भगवंताने मानवाला दिली आहे. ‘उदान‘ वायूची पूजा करून त्या शक्तीला मानव जर योग्य दिशेला वळवील तर सृष्टीवरच स्वर्ग निर्माण होईल.

५) व्यान- हा वायू संपूर्ण शरीरात फिरतो. त्यामुळे आपले रक्त संपूर्ण शरीरात फिरवण्याचे काम व्यान करतो. हृदयाच्या स्पंदनांमुळे अवश्य रक्त फिरत राहते. पण त्याचबरोबर व्यानाची सूक्ष्म शक्तीदेखील कार्य करते.

इथेदेखील शास्त्रीजी दुसर्‍याच नजरेने बघतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही कार्याचा विस्तार झाल्यानंतर संपूर्ण कार्यात फिरणारे असे काही लोक असले पाहिजेत, नाही तर
‘अति विस्तारविस्तीर्ण न गतिर्जायते शुभा’
ह्याच्यासारखे होते. वैदिक विचाररुपी रक्त समग्र प्रमाणात शरीरात फिरत राहावे यासाठी भारतात ब्राह्मण व संन्यासी व्यान वायूप्रमाणे सर्वत्र फिरत असतात. आजही भारतीय संस्कृती जिवंत आहे याच्या मुळाशी ते कारण आहे.

खरेच, धन्य ते आपले ऋषीमहर्षी ज्यांनी एवढा सखोल अभ्यास करून प्राणाबद्दलचे गूढ मानवतेसमोर आणले. त्यामुळे सामान्य व्यक्तीला प्राणाचे महत्त्व समजले. त्याचप्रमाणे पूजनीय पांडुरंगशास्त्रींसारखे विद्वान महापुरुष ज्यांनी चिंतन करून पंचप्राणाबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन आमच्यापुढे मांडला.
हे सूक्ष्म व गूढ तत्त्वज्ञान जर आम्हाला समजले, त्याचा आपण थोडा अभ्यास केला तर जीवनाच्या प्रत्येक पैलूंत चैतन्य येईल- कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्‍विक. आपल्या जीवनाची दिशाच बदलून जाईल. सर्वत्र सुखशांती नांदेल.

हे तत्त्वज्ञान आदिशंकराचार्य, स्वामी विवेकानंद… यांच्यासारख्या अनेक सत्पुरुषांना ज्ञात झाले होते व ते देशाची व विश्‍वाची परिक्रमा करीत होते. आजदेखील अनेक संस्था ह्या दिशेने कार्यरत आहेत. त्यांचे कौतुक करायला हवे.

आपण सर्व त्यांचे अनुकरण करुया. तसेच प्रभूपाशी भावभक्तिपूर्ण प्रार्थना करुया की ह्या सर्वांना प्राणवान बनवावे.(संदर्भ- संस्कृती पूजन- प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले)

चित्रेः- वृक्ष- वनस्पती. प्राणी – पशू-पक्षी – शंकराचार्य – स्वामी विवेकानंद