बाबूशना चार दिवसांचा रिमांड

0
79

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांना काल येथील बाल न्यायालयाने आणखी चार दिवसांचा पोलीस रिमांड दिला. या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या पीडित मुलीच्या सावत्र आईलाही न्यायालयाने चार दिवसांचा पोलीस रिमांड दिला आहे.

दरम्यान, जामिनासाठी आतापर्यंत अर्ज न केलेल्या मोन्सेर्रात यांनी तपासकामाची माहिती पत्रकारांना पोलीस देत असल्याचे आपल्या वकिलामार्फत न्यायालयाच्या नजरेस आणून दिले व पत्रकारांना ही माहिती दिली जाऊ नये अशी विनंती केली. पत्रकारांपर्यंत ही माहिती कशी पोहोचते असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला होता, यासंबंधी सविस्तर माहिती देण्याची सूचना न्यायालयाने पोलिसांना काल केली. तपासकामाची माहिती पोलिसांनी पत्रकारांना देऊ नये असा आदेश २०११ साली मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा भंग होत असल्याचा दावा आरोपीचे वकील ऍड. राजीव गोम्स यांनी केला. त्यावर न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना सविस्तर उत्तर देण्यास सांगितले आहे.