बारावीचा निकाल ९०.१ टक्के

0
133

>>यंदाही मुलींनी मारली बारावीत बाजी

  • वाणिज्य ९१.१६ टक्के
  • विज्ञान ८९.४६ टक्के
  • कला ८९.३५ टक्के
  • व्यावसायिक ८९.४० टक्के

गेल्या फेब्रुवारी – मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९०.१ टक्के लागल्याची माहिती गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यंदाही या परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच जास्त चमकल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा पाच टक्क्यांनी अधिक आहे. यंदा या परीक्षेला ७३८२ मुलगे, तर ८०२८ मुली बसल्या होत्या.
यंदा सर्वाधिक निकाल वाणिज्य शाखेचा लागला असून तो ९१.१६ टक्के एवढा आहे. विज्ञान शाखेचा निकाल ८९.४६ टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ८९.३५ टक्के आणि व्यावसायिक शाखेचा निकाल ८९.४० टक्के लागला आहे.
उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची टक्केवारी दरवर्षी वाढत आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ८८.१ टक्के एवढा लागला होता. दरवर्षी निकालाची टक्केवारी वाढत असल्याचे रिबेलो यांनी सांगितले. यंदा ९५ टक्क्यांपेक्षा अधिक टक्केवारी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांची संख्या २५ असून त्यात एकाही सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचा समावेश मात्र नाही. काणकोण येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९० टक्क्यांच्या आसपास आहे. यंदा क्रीडा गुणांमुळे १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. क्रीडा गुण मिळाले नसते तर ते नापास झाले असते. क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १.२ टक्का असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुरवणी परीक्षा वीस दिवसांत
एक किंवा दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होता यावे यासाठी यंदा वीस दिवसांच्या आत पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. ही पुरवणी परीक्षा ८ जूनपासून सुरू होईल अशी माहिती रिबेलो यांनी दिली.
उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत
ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेची पुनर्तपासणी करावयाची आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत ईमेलद्वारे पाठवण्यात येईल. ती पाहिल्यानंतर जर त्यांना फेरतपासणी हवी आहे असे वाटले, तर ती करण्यात येईल. अधिक पारदर्शकतेसाठीच विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती पाठवण्याचा निर्णय मंडळाने घेतला असल्याचे ते म्हणाले. यंदा काही मोजक्या विषयांच्या उत्तरपत्रिकांची शिक्षकांनी संगणकाच्या मदतीने तपासणी केली, पण गुण देण्याचे काम शिक्षकांनीच केले. गुणांची बेरीज मात्र संगणकाच्या मदतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
संगणकाची मदत
यापूर्वी गेल्या ऑक्टोबर महिन्यात परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सुमारे दोन हजार उत्तरपत्रिका सर्वांत प्रथम संगणकाची मदत घेऊन तपासण्यात आल्या होत्या. डिजिटल पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याची ही पद्धत लाभदायक आहे की नाही याचा अभ्यास येत्या एक – दोन महिन्यांत शालांत मंडळ करील. ही पद्धत खर्चिक आहे असे रिबेलो यांनी सांगितले. निकालाची टक्केवारी दरवर्षी वाढत असते याचे कारण काय असे विचारले असता, प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा हुशार असते.