बाबुशविरुद्ध बंड

0
142

पणजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. मुख्यत्वे कॉंग्रेसमधून भाजपात आलेले आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी पणजी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने पॅनल उतरवताना जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा पत्ता काटल्याने त्याविरुद्ध उघड बंडाळीच्या पवित्र्यात जुनी मंडळी पुढे सरसावली आहेत. खरे तर अशा प्रकारे असंतोष उफाळणार ही अटकळ भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांना होतीच, त्यामुळेच तर यावेळी पालिका व महापालिका निवडणुका ह्या पक्षीय पातळीवर लढवल्या जाऊ नयेत अशी भूमिका भाजपने घेतली. अन्यथा जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीतील यशानंतर पालिका निवडणुकांवरही पक्षाचा झेंडा फडकवून त्याचे श्रेय पदरात पाडून घेतल्याविना पक्षनेते राहिले असते का?
इतर पालिकांमध्ये जेवढा अंतर्गत संघर्ष उद्भवला नाही, तेवढा पणजी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उफाळला आहे आणि तो अपेक्षितही होता. बाबुश मोन्सेर्रात यांच्यासारख्या विस्तारवादी बाहुबली नेत्याच्या मदतीने कॉंग्रेसमधून घाऊक पक्षांतर घडवून आणून आपले सरकार मजबूत करणार्‍या भाजपाला त्यासाठी ही किंमत मोजावी लागणारच होती. बाबुश हे काही पक्ष वाढवण्यासाठी भाजपामध्ये आलेले नाहीत. ते स्वतःचे राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठीच भाजपच्या गोटात आलेले आहेत. दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या विचारधारेशी त्यांचे आणि त्यांच्यासारख्या आयात मंडळींचे काहीही देणेघेणे नाही.
पणजी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पूर्वीप्रमाणेच यावेळीही बाबुश यांना आपले उमेदवार उतरवून ती काबीज करावीशी वाटली तर नवल नाही. परंतु त्यांचा हा हट्ट कितपत पुरवायचा याचे भान भाजपा नेतृत्वाला असणे आवश्यक होते. बाबुश यांच्यापुढे लोटांगण घालताना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही हे पाहिले जाणे गरजेचे होते. त्यासाठी किमान प्रयत्न तरी व्हायला हवा होता. बाबुश यांच्याद्वारे पॅनल जाहीर होण्यापूर्वी निष्ठावंत व उपरे यांच्यात तडजोडपूर्वक समन्वय साधून हे पॅनल जाहीर करणे अगदीच अशक्य ठरले असते असे नव्हे. परंतु आजच्या केवळ ‘विनेबिलिटी’ किंवा जिंकून येण्याची क्षमता पाहण्याच्या जमान्यामध्ये जुन्या जाणत्या निष्ठावंतांना पक्षामध्ये काय किंमत आहे हेच हा जो प्रकार झाला त्यातून दिसून आले आहे. हे केवळ पणजीतीलच चित्र आहे असे नव्हे, देशभरात सध्या हाच प्रकार चालला आहे. पक्षविस्ताराच्या आणि सत्ता राखण्याच्या धामधुमीत किती निष्ठावंत चिरडले जात आहेत, भरडले जात आहेत याचे भान आहे कोणाला? त्याची कोणाला गरजही वाटेनाशी झालेली आहे, कारण आज जे काही चौफेर यश मिळालेले आहे, त्यात त्या निष्ठावंतांचे योगदान फारसे नाही या वास्तवाचा नैतिक आधार घेऊन ही सगळी घाऊक आयात चाललेली आहे. प्राधान्य आहे सत्तेला आणि पक्षविस्ताराला. त्यामुळे पणजी महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे समोर आले आहे ती केवळ एक प्रातिनिधिक झलक आहे असे कोणी म्हणाले तर ते गैर ठरू नये.
पणजी महापालिका यावेळी भाजपने जणू बाबुश यांना आंदण दिलेली आहे असे आम्ही यापूर्वी म्हटले होते, त्याचाच प्रत्यय येतो आहे. परंतु सिद्धार्थ कुंकळ्येकर काय, दत्तप्रसाद नाईक काय किंवा अन्य कोणी काय, बाबुश यांच्यापुढे पक्षाने जरी शरणागती पत्करलेली असली, तरी त्याला आव्हान देण्याची क्षमता त्यांच्यात कितपत आहे ह्याचा जोवर पक्षनेतृत्वाला प्रत्यय येत नाही, तोवर ह्या बंडाळीची एका मर्यादेपलीकडे दखल घेतली जाण्याची शक्यता फार कमी आहे. बाबुश यांना या मंडळींची फिकीर करण्याचे काही कारण नाही, कारण ते मूलतःच एक बाहुबली नेते आहेत आणि पणजी महापालिका जिंकण्यासाठी त्यांनी त्यांची रणनीती आखलेली आहे. आता ह्या प्रयत्नांत खो घालण्यासाठी सर्व विरोधकांचा पाठिंबा मिळवून भाजपमधील बंडखोर काही आव्हान निर्माण करू शकणार आहेत का हे पाहावे लागेल. भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळावा यासाठी विरोधक ह्या मंडळींची साथ देऊ शकतात. तसे झाले तर मात्र ते पक्षासाठी पणजीत अडचणीचे ठरू शकते. परंतु ह्या ‘जर तर’च्या भाषेला सध्या तरी काही अर्थ नाही. बंडाची भाषा जरूर चालली आहे, परंतु त्यात जोर किती हे दिसेल तेव्हाच त्याला गांभीर्याने घेतले जाईल हेच खरे!
बंडाचे हे जे वातावरण निर्माण झालेले आहे, ते केवळ ह्या पणजी महापालिका निवडणुकीपुरतेच मर्यादित नसेल. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनोहर पर्रीकर यांचे राजकीय वारसदार म्हणून पणजीमध्ये पक्षाची उमेदवारी कोणाला दिली जाणार त्याचा सोक्षमोक्षही यातून लागणार आहे. उत्पल पर्रीकर पणजीतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत व त्यामुळेच सध्या सावध पावले टाकत आहेत. पक्ष त्यांना पर्रीकरांचा वारसदार मानणार आहे की बाबुश मोन्सेर्रात यांना हेही यातून कळेल!