अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

0
101

>> सहा पालिका निवडणुकीसाठी एकूण २८९ जणांचे अर्ज

राज्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आणखी १२२ उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आले असून आत्तापर्यंत २८९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सहा नगरपालिका, पणजी महानगरपालिका, नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक आणि पंचायतीच्या २२ प्रभागांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची ४ मार्च २०२१ ही अंतिम तारीख आहे.

राज्यातील सहा नगरपालिकांच्या येत्या २० मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. काल बुधवारी आणखी १२२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात डिचोलीमध्ये ३१ अर्ज, वाळपईत १५ अर्ज, पेडण्यात १० अर्ज, कुंकळ्ळीत १६ अर्ज, कुडचडे-काकोड्यात २७ अर्ज आणि काणकोणात २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आणखी ११ उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आले आहेत. पंचायत पोटनिवडणुकीसाठी आत्तापर्यंत ४० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आगशी पंचायत १ अर्ज, मेरशी पंचायत ४ अर्ज, कोरगाव पंचायत २ अर्ज, मुळगाव पंचायत २ अर्ज, रिवण पंचायत २ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
नावेली जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीसाठी आणखी ४ उमेदवारी अर्ज काल दाखल करण्यात आले आहे. या पोटनिवडणुकीसाठी आत्तापर्यंत ५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

पणजी मनपासाठी बुधवारी ३७ अर्ज

पणजी महानगरपालिकेच्या २० मार्च २०२१ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी आणखी ३७ उमेदवारी अर्ज येथील निवडणूक अधिकार्‍यांकडे काल दाखल करण्यात आले असून महानगरपालिकेसाठी आत्तापर्यंत ७४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. व्ही पणजीकर पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज काल दाखल केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार ४ मार्च ही अंतिम तारीख आहे.

महानगरपालिकेच्या ३० जागांसाठी आत्तापर्यंत ७४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आणखी अर्ज सादर केले जाणार आहेत.

महानगरपालिका मंडळाच्या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे पॅनल, व्ही पणजीकर पॅनलबरोबर आणखी काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

व्ही पणजीकर पॅनलकडून सर्व ३० प्रभागात उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, अशी माहिती पॅनलचे निमंत्रक तथा माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

व्ही पणजीकर या पॅनलमध्ये पक्षीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या हितासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेकजण एकत्र आले आहेत, अशी माहिती वाल्मिकी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार मोन्सेरात यांनी जाहीर केलेल्या भाजपच्या पॅनलवर भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे.