गोवा-मुंबई सिटी आज आमनेसामने

0
165

हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात पहिल्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. शुक्रवारी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना होईल.

हिरो आयएसएल इतिहासात सर्वाधिक सातत्य राखलेला संघ म्हणून गोव्याचा उल्लेख केला जातो. विक्रमी सहाव्या वेळी या संघाने बाद फेरी गाठली आहे, पण त्यांना अद्याप एकदाही जेतेपद मिळविता आलेले नाही. अंतिम फेरीत दोन वेळा त्यांच्या वाट्याला पराभव आला आहे. आता या संघाचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न साकारण्याचे ध्येय आहे. त्यासाठी साखळीतील अव्वल क्रमांकाची ढाल मिळविलेल्या मुंबई सिटीला शह दिल्यास त्यांचे एक पाऊल पुढे पडलेले असेल. गोव्याने सलग चौथ्यांदा बाद फेरीत धडक मारली आहे. यावेळी त्यांचा जेतेपदाचा विश्वास असेल. गोवा हा मनोरंजक खेळ करणार्‍या संघांमध्ये अग्रभागी आहे. सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत मुंबईनंतर नॉर्थईस्ट युनायटेडच्या साथीत त्यांचा संयुक्त दुसरा क्रमांक आहे. फॉर्म गोव्याच्या जमेची बाजू आहे. गेल्या १३ सामन्यांत हा संघ अपराजित आहेत. अशी कामगिरी हिरो आयएसएलच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाला जमलेली नाही, पण मुंबई सिटीच्या आव्हानाला सामोरे जाणे सोपे नसेल. अशावेळी जेतेपदापर्यंत घोडदौड करण्याचा निर्धार बाळगलेला आपला संघ शैलीशी ठाम राहून खेळेल अशी आशा गोव्याचे प्रशिक्षक जुआन फरांडो यांना आहे.

गोव्यासमोरील आव्हान खडतर झालेले असेल, याचे कारण इव्हान गोंझालेझ आणि अल्बर्टो नोग्युरा यांना निलंबनामुळे खेळता येणार नाही. चेंडूवरील ताब्याच्या बाबतीत गोव्याचा संघ ५८ टक्क्‌यांसह आघाडीवर असला तरी मुंबई सुद्धा पिछाडीवर नाही. मुंबईची टक्केवारी केवळ एकने कमी आहे. चेंडूवर ताबा ठेवण्याच्या शैलीमुळे सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने तब्बल ३५ गोल केले आहेत. या दोन संघांमधील आधीच्या लढतीच्यावेळी फरांडो यांनी सांगितले होते की, साखळीतील अव्वल क्रमांक हवा असल्यामुळे मुंबईवर दडपण असेल. आता हा क्रमांक मिळविला असल्यामुळे लॉबेरा यांचा आपल्या आधीच्या संघाविरुद्ध आणखी काही सिद्ध करून दाखविण्याचा निर्धार असेल. फरांडो यांच्याप्रमाणेच लॉबेरा यांनी सुद्धा आपल्या संघाने दडपण न घेता खेळाचा आनंद लुटावा असे सांगितले.
मुंबई सिटीचा अमेय रानवडे निलंबनामुळे खेळू शकणार नाही, पण ह्युगो बुमूस चार सामन्यांच्या बंदीनंतर पुनरागमन करेल.