बांधकाम उद्योगाला चालना

0
173
  • शशांक मो. गुळगुळे

बांधून तयार असलेली पण विक्री न झालेली घरे फार मोठ्या प्रमाणावर पडून असल्यामुळे येत्या काही वर्षांत सध्याच्या पातळीवर ज्या घरांच्या किमती आहेत त्यात वाढ होणे शक्य नाही. तसेच भाव बरेच खाली येण्याचीही शक्यता नाही.

कोरोनाचा प्रवेश भारतात होण्यापूर्वीपासून बांधकाम उद्योग आर्थिक अडचणीत होता. बर्‍याच सदनिका/घरे बांधून विक्री न होता पडून होती. कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर बांधकाम उद्योग प्रचंड अडचणीत आला. पण आता बांधकाम क्षेत्राकडे ग्राहकांची पावले परत पडू लागली आहेत. जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीचे घर विक्रीचे आकडे मात्र बांधकाम उद्योजकांना आनंद देऊन गेले. तसेच सध्याच्या ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत या उद्योगाला चालना मिळत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने हा उद्योग भरभराटीला यावा (कारण या उद्योगामुळे रोजगारनिर्मिती फार मोठ्या प्रमाणावर होते) म्हणून गेल्या आठवड्यात पंतप्रधान आवास योजनेसाठी रुपये १८ हजार कोटी संमत केले. याशिवाय बांधकाम उद्योजक व सदनिका खरेदीदार यांच्यासाठी आयकर सवलतही जाहीर केली. घरांची विक्री आणि घरांची रजिस्ट्रेशन यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत ७ हजार ९२९ घरांच्या खरेदी-विक्रीचे रजिस्ट्रेशन झाले. ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत यात ३६ टक्के वाढ झाली. मुंबईत झालेल्या रजिस्ट्रेशनची संख्या गेल्या ८ वर्षांतील सर्वाधिक आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रमुख शहरांत याअगोदरच्या तिमाहीच्या तुलनेत घरविक्रीत ३३ टक्के वाढ होऊ शकेल, तर ऑक्टोबर-डिसेंबर २०१० च्या तुलनेत ६६ टक्के वाढ होऊ शकेल. लोक मुंबई-गोव्यातच नव्हे तर भारतभर घर खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत आणि घरे विकतही घेत आहेत. एचडीएफसीच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२० मध्ये ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत कर्ज मंजुरीच्या आकडेवारीत ५८ टक्के वाढ झाली. कर्ज वितरणात वर्षाचा विचार करता ३५ टक्के वाढ झाली असून ही वाढ एचडीएफसीच्या इतिहासात आतापर्यंतची दुसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम वाढ ठरली आहे.

घरांचा शोध घेणार्‍यांच्या किंवा घरांची माहिती काढणार्‍यांच्या संख्येत कोरोनाच्या अगोदरच्या तुलनेत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. सध्या बांधकाम उद्योजकांकडून वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या जात आहेत. बांधकाम उद्योजकांची बांधून तयार झालेली घरे विकली जावीत म्हणून हे उद्योजक ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करीत आहेत. सध्या घर खरेदी बाजारपेठ ही ग्राहकांची बाजारपेठ झाली आहे. ग्राहकाकडे घर खरेदीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. गृहकर्जे देण्यासाठी बर्‍याच कंपन्या बाजारात आहेत. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांनी प्रयत्नपूर्वक गृहकर्जांवरील व्याजाचे दर खाली आणले आहेत. याशिवाय सामान्यांसाठी पंतप्रधान आवास योजना हा पर्यायही उपलब्ध आहे. या पार्श्‍वभूमीचा विचार करता गरजूंनी घर खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे, हे योग्य वातावरण आहे असे समजण्यासारखी परिस्थिती आहे. सध्या बांधकाम उद्योजक जाहीर केलेल्या किमतीपेक्षा ५ ते १५ टक्के रक्कम कमी करून घरे विकत आहेत. बांधून तयार असलेली पण विक्री न झालेली घरे फार मोठ्या प्रमाणावर पडून असल्यामुळे येत्या काही वर्षांत सध्याच्या पातळीवर ज्या घरांच्या किमती आहेत त्यात वाढ होणे शक्य नाही. तसेच भाव बरेच खाली येण्याचीही शक्यता नाही. जुलैमध्ये घर विकत घेण्यास इच्छुक असलेल्यांपैकी ७३ टक्के जणांची मागणी हे जाहीर केलेले भाव बरेच खाली यावेत अशी होती. पण ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण कमी होऊन ४३ टक्क्यांवर आले.

शासनाने ही घरविक्री वाढावी, बांधकाम उद्योग आर्थिक मंदीतून बाहेर यावा म्हणून स्टॅम्प ड्युटी कमी करून आपले उत्पन्न कमी केले आहे. स्टॅम्प ड्युटी व सदनिका रजिस्ट्रेशनचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र राज्याने प्रॉपर्टी मूल्याच्या ५ टक्के असलेली स्टॅम्प ड्युटी सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीसाठी ५ टक्क्यांवरून २ टक्के इतकी खाली आणली आहे व जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या कालावधीत ती ३ टक्के असेल. यामुळे ही विक्री वाढली. गृहकर्जावर सध्या ७ टक्के व्याज आकारले जात आहे. एवढे कमी व्याज यापूर्वी कधीही आकारले गेले नव्हते. गृहकर्ज घेतल्यामुळे आयकरात मिळणार्‍या सवलतीचा विचार करता ग्राहकाला बराच फायदा मिळतो. कमी व्याजदरामुळे ‘इएमआय’चा आकडा कमी झाला आहे. ग्राहकांसाठी तो सुसह्य झाला आहे. पाच वर्षांपूर्वी १५ वर्षांच्या ५० लाख रुपयांच्या गृहकर्जावर ५२ हजार २११ रुपये मासिक हप्ता भरावा लागत होता तो आता सुमारे ४४ हजार ९४१ रुपये भरावा लागत आहे. देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता, गृहकर्जावरील व्याजदर नजीकच्या भविष्यात वाढण्याची बिल्कुल शक्यता नसून व्याजदर आणखी कमी होण्याची मात्र शक्यता आहे.

घरून काम करण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कित्येकांना मोठ्या घराची स्वप्ने पडू लागली आहेत. पती-पत्नी दोघेही ‘वर्क फ्रॉम होम’ करीत असतील व मुले ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर सध्याची घरे लहान पडू लागली आहेत. यामुळे शांतपणे काम करता यावे म्हणून कित्येक खरेदीदार घराला मोठी बाल्कनी असलेली घरे घेणे पसंद करीत आहेत. बेंगळुरूमध्ये ३ बेडरूम जागांना मागणी वाढली आहे. अशीच मागणी दिल्लीजवळील नोयडा, गाझियाबाद, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबई येथेही आहे. ब्रोकरमार्फत घरे घेत असाल तर ब्रोकर हा रेरा रजिस्टर आहे याचा पुरावा पहा. घर निवडण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बांधकाम उद्योजकांचे प्रकल्प ‘ऑनलाईन सर्च’ करू शकता किंवा प्रत्यक्ष जाऊन पाहणी करू शकता. घर खरेदी करताना घराचे मूल्य, घराचे आकारमान, घराचे ठिकाण या बाबीही विचारात घ्याव्या लागतात.

जुलै ते सप्टेंबर २०२० मध्ये विक्री झालेल्या घरांचा तक्ता

शहराचे नाव विक्री झालेल्या अगोदरच्या तिमाहीच्या तुलनेत

घरांची संख्या झालेली वाढ किंवा घट

बेंगळुरू १७४२ -१२ %
चेन्नई १५७० २४ १%
दिल्ली (एनसीआर) ३११२ ३८ %
हैद्राबाद २१२२ ७६ %
कोलकाता ३९० -१९ %
मुंबई ४१३५ १७ %

पुणे १३४४ ५८ %

एकूण १४,४१५ ३४ %

जाणकारांना ऑक्टोबर-डिसेंबर २०२० मध्ये अपेक्षित घरविक्री

शहराचे नाव अपेक्षित घर अगोदरच्या तिमाहीच्या

विक्रीची संख्या तुलनेत अपेक्षित वाढ

दिल्ली एनसीआर १०,७०० ३१ %
मुंबई मेट्रोपोलिटन रिजन १८,३२० ३६ %
बेंगळुरू ११,२०० ३५ %
पुणे ९,४१० ३४ %
हैद्राबाद ३,४८० २१ %
चेन्नई २,७८० २२ %

कोलकाता ३,२६० ३० %

एकूण ५९,१५० ३३%

जुलै-सप्टेंबर २०२० मध्ये विक्रीविना पडून असलेली तयार घरे

शहराचे नाव सदनिकांची संख्या

बेंगळुरू ९२,६१२
चेन्नई ३१,६७७
दिल्ली एनसीआर १,१७,१३७
हैद्राबाद ३१,१४८
कोलकाता २८,६८४
मुंबई १,२०,७४३

पुणे ३५,१२६

एकूण ४,५७,४२७