बांगलादेशचा अफगाणवर ६२ धावांनी विजय

0
100

>> शकिब अल हसनची अष्टपैलू चमक

बांगलादेशने काल सोमवारी अफगाणिस्तानवर ६२ धावांनी विजय संपादन केला. अष्टपैलू शाकिब अल हसनने अर्धशतकाबरोबरच घेतलेले पाच बळी बांगलादेशी संघाच्या विजयाची खासियत ठरली. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या २६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाण संघ २०० धावांत संपला. बांगलादेशने या विजयासह क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेशाची आशा कायम ठेवली आहे. बांगलादेशच्या विजयामुळे यजमान इंग्लंडवर यामुळे दबाव वाढला आहे.
आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना नैब व रहमत यांनी अफगाण संघाला ४९ धावांची सलामी दिली. १२व्या षटकात संघाचे अर्धशतक फलकावर लागले होते. यावेळी धावगती ४.१६ अशी समाधानकारक होती. नैब व शाहिदी यांनी यानंतर कुर्मगती फलंदाजी करत संघावर दबाव वाढवला. विसाव्या षटकापर्यंत धावगती ३.८५पर्यंत खाली आली. यातच शाहिदी बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने अफगाणचे गडी बाद होत राहिले. मधल्या फळीतलील समिउल्ला शिनवारीने नाबाद ४९ धावा करत पराभवाचे अंतर कमी केले. बांगलादेशकडून शाकिबने २९ धावांत ५ गडी बाद करत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन केले.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. बांगलादेशने तमिम इक्बालसह लिटन दाससह डावाची सुरुवात केली. परंतु, याचा फायदा झाला नाही. मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या लिटनला सलामीवीराची भूमिका जमली नाही. वैयक्तिक १७ धावांवर तो माघारी परतला. तमिम इक्बालने शाकिब अल हसनच्या साथीने ५९ धावांची भागीदारी झाली. तमिम नबीच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्याने ३६ धावा जमवल्या. शाकिब अल हसनने मात्र आपला फॉर्म कायम राखत आपले ४५वे एकदिवसीय अर्धशतक केले. परंतु, अर्धशतकानंतर लगेचच मुजीबने त्याला पायचीत करत अफगाण संघाला मोठे यश मिळवून दिले. मुश्फिकुर रहीम आणि शाकिब यांच्यात तिसर्‍या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी झाली.

शाकिब माघारी गेल्यानंतर रहीमने डावाची सूत्रे हात घेतली. त्याने आपले ३५वे एकदिवसीय अर्धशतक केले. त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचत ८७ चेंडूत ८३ धावा केल्या. पण दुसर्‍या बाजूने त्याला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. सौम्य सरकार अवघ्या ३ धावा करून बाद झाला. महमदुल्ला याला आवश्यक वेगाने धावा करता आल्या नाहीत. ३८ चेंडूंत २७ धावा करून तो परतला. शेवटच्या टप्प्यात मोसद्देक हुसेनने २४ चेंडूत ३५ धावांची छोटेखानी आक्रमक खेळी करत बांगलादेशला ५० षटकात ७ बाद २६२ धावांपर्यंत मजल मारून दिली. अफगाण संघाकडून मुजीबने ३, नैबने २ तर दौलत झादरान आणि नबी यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
बांगलादेशने या सामन्यासाठी संघात दोन बदल करताना सब्बीर रहमान व रुबेल हुसेन यांच्या जागी मोसद्देक हुसेन व मोहम्मद सैफुद्दिन यांना संघात घेतले. दुखापतीमुळे या द्वयीला मागील सामन्यात खेळता आले नव्हते. दुसरीकडे अफगाणिस्तानने हझरतुल्ला झाझाय व आफताब आलम यांना बाहेरचा रस्ता दाखवून दौलत झादरानला पुन्हा संघात घेतले. तसेच समिउल्ला शिनवारीला आपल्या पहिल्याच विश्‍वचषक लढतीत खेळण्याची संधी दिली.

धावफलक
बांगलादेश ः लिटन दास झे. शाहिदी गो. मुजीब १६, तमिम इक्बाल त्रि. गो. नबी ३६, शाकिब अल हसन पायचीत गो. मुजीब ५१, मुश्फिकुर रहीम झे. नबी गो. दौलत ८३, सौम्य सरकार पायचीत गो. मुजीब ३, महमुदुल्ला झे. नबी गो. नैब २७, मोसद्देक हुसेन त्रि. गो. नैब ३५, मोहम्मद सैफुद्दिन नाबाद २, अवांतर ९, एकूण ५० षटकांत ७ बाद २६२
गोलंदाजी ः मुजीब उर रहमान १०-०-३९-३, दौलत झादरान ९-०-६४-१, मोहम्मद नबी १०-०-४४-१, गुलबदिन नैब १०-१-५६-२, राशिद खान १०-०-५२-०, रहमत शाह १-०-७-०
अफगाणिस्तान ः गुलबदिन नैब झे. दास गो. शाकिब ४७, रहमत शाह झे. तमिम गो. शाकिब २४, हशमतुल्ला शाहिदी यष्टिचीत रहीम गो. मोसद्देक ११, असगर अफगाण झे. सब्बीर गो. शाकिब २०, मोहम्मद नबी त्रि. गो. शाकिब ०, समिउल्ला शिनवारी नाबाद ४९, इक्रम अली खिल धावबाद ११, नजिबुल्ला झादरान यष्टिचीत रहीम गो. शाकिब २३, राशिद खान झे. मोर्तझा गो. मुस्तफिझुर २, दौलत झादरान झे. रहीम गो. मुस्तफिझुर ०, मुजीब उर रहमान त्रि. गो. सैफुद्दिन ०, अवांतर १३, एकूण ४७ षटकांत सर्वबाद २००
गोलंदाजी ः मश्रफी मोर्तझा ७-०-३७-०, मुस्तफिझुर रहमान ८-१-३२-२, मोहम्मद सैफुद्दिन ८-०-३३-१, शाकिब अल हसन १०-१-२९-५, मेहदी हसन मिराझ ८-०-३७-०, मोसद्देक हुसेन ६-०-२५-१

शाकिब अल हसन अनोख्या पंक्तीत
बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी वेस ओलांडताना विश्‍वचषक स्पर्धेत एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याच्या नावावर १०१६ धावा झाल्या आहेत. त्याच्या नावावर २७ लढतींत ३३ बळींची नोंददेखील आहे. विश्‍वचषक स्पर्धेत एक हजारांहून जास्त धावा तसेच २५पेक्षा जास्त बळी घेणारा तो केवळ दुसरा खेळाडू बनला आहे. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने ३८ सामन्यांत ११६५ धावा करताना २७ बळी घेतले आहेत.