शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती काल मुंबईत साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी उद्धव ठाकरेंनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, राज ठाकरेंसोबत आपण ‘वादळात’ खेळून मोठे झाल्याचे आवर्जून सांगितले. वडिलांशी असलेले नाते आणि आईने घर सावरण्यात दिलेल्या योगदानाचा गौरव करतानाच त्यांनी आपल्या घराण्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला. तसेच, विरोधकांवर आणि गद्दारांवर कडाडून टीका करताना ‘गद्दारी हा महाराष्ट्राला लागलेला शाप’ असल्याचे सांगून, भगव्याशी गद्दारी झाली नसती तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असता, असा रोखठोक विचार त्यांनी यावेळी मांडला.
शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नाही. शिवसेना विचार आहे. तो भाजपवाले संपवू शकत नाहीत. ठाकरे नाव पुसायला अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत, पण ते पुसले जाणार नाही. आपलीच लोक आपल्यावर घाव घालण्यासाठी दोन गुजराती लोक वापरत आहेत. मेलो तरी बेहत्तर पण दोन गुजरातींचा गुलाम होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते की, आज बाळासाहेब नाहीत तेच बरे आहे, असे उद्विग्न विधान राज ठाकरे यांनी यावेळी केले. आजची परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यथित झाला असता. त्या माणसाला काय त्रास झाला असता. पूर्वी चावडीवर उभे राहून माणसांचे लिलाव चालायचे, आज त्याप्रमाणे महाराष्ट्रात लिलाव सुरू आहेत. आज सध्याचे चित्र पाहून शिसारी आली. आज हे चित्र पाहायला माननीय बाळासाहेब नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले.