बदलती जीवनशैली कर्करोगास कारणीभूत

0
104

डॉ. देशपांडे : तंबाखूबंदी आल्यास रोगाचे ३० टक्के प्रमाण घटणे शक्य
कर्करोग हा जसा तंबाखूचे सेवन केल्याने होतो तसाच तो चुकीचा व आरोग्यास हानिकारक असा आहार घेतल्यानेही होतो. अनुवंशिकतेतूनहीतो होऊ शकतो. जसाजसा विकास होणार आहे तसे तसे कर्करोगाचे प्रमाणही वाढण्याचा धोका आहे, असे सुप्रसिध्द कर्करोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत देशपांडे यांनी काल ‘कॅन्सर-गैरसमज आणि वस्तुस्थिती’ या विषयावर बोलताना सांगितले.
गोवा कॅन्सर सोसायटीने कर्करोग जागृती निि’त्त काल येथील इन्स्टिट्यूट मिनेजस ब्रागांझा सभागृहात त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्यात डॉ. देशपांडे बोलत होते.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवर जर पूर्णपणे बंदी आली तर भारतात कर्करोगाचे प्रमाण ३० टक्क्यांनी खाली येईल असे ते पुढे म्हणाले. यावेणी बोलताना डॉ. देशपांडे यांनी विविध प्रकारचे कर्करोग, त्यावरील उपचार पध्दती, हे कर्करोग होण्यामागील विविध कारणे याविषयी यावेळी माहिती दिली. गोव्याचे हॉंगकॉंग व मुंबईचे शांघाय करण्याची स्वप्ने आपण बघतो. पण या विकासाबरोबरच कर्करोगाचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शहरांतील वाढत्या प्रदुषणामुळे कर्करोग्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे होत. तुम्ही कोणत्या भागांत राहताव तेथील वातावरण कसे आहे याबरोबरच तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न घेता यावरही तुम्हाला कॅन्सरचा धोका किती आहे हे ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्ण दीर्घायुषी होणे शक्य
कर्करोग झालेला रुग्ण बरा होऊ शकत नाही हा गैरसमज असून तो मनातून काढून टाकायला हवा. आता आलेल्या उपचार पध्दतीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे. भविष्यात कर्करोग झालेले रुग्ण व्यवस्थित उपचार घेतल्यास दीर्घायुषी होऊ शकतील असे डॉ. देशपांडे म्हणाले. कर्करोग झालेल्या रुग्णांनी कोणत्या प्रकारचे उपचार घ्यायला हवेत याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आधुनिक उपचारपद्धतीची मदत
आयुर्वेद व अन्य प्रकारच्या उपचार पध्दतीमुळे कर्करोग बरा होईल याची कोणतीही शाश्‍वती देता येत नसल्याचे सांगून शस्त्रक्रिया, केमोथेरपी, स्टेम सेल थेरपी आदी आधुनिक उपचार पध्दतीचाच अवलंब करायला हवा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आधुनिक पध्दतीने रुग्णांची बायोप्सी करून त्याला कर्करोग झाला आहे की काय याचे निदान झाल्यानंतरच त्याच्यावर उपचार करण्यात येतात असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीच्या मुत्राद्वारे जर रक्त जात असेल किंवा विष्ठेतून रक्त जात असेल तर ताबडतोब तपासणी करून घ्यायला हवी. महिला तसेच पुरुषांनी एरवीसुध्दा वर्षातून एकदा कर्करोगासाठी तपासणी करून घेतल्यास कित्येक जणांचे प्राण वाचू शकतील. महिलांनी मेमोग्राफी सारख्या तपासण्या करून घ्यायला हव्यात अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. सर्वप्रथम गोवा कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी स्वागत केले. हे व्याख्यान आयोजित करण्यामागे कॅन्सरविषयी जागृती घडवून आणणे हा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनी कॅन्सरविषयी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची डॉ. रमाकांत देशपांडे यांनी उत्तरे दिली.
दरवर्षी १२ लाख रुग्ण
भारतात दरवर्षी सुमारे १२ लाग लोकांना कॅन्सर होत असल्याचे आढळून आले आहे. सुमारे १०० प्रकारचे कर्करोग असल्याचे डॉ. देशपांडे यावेळी म्हणाले. प्राथमिक टप्प्यावर उपचार घेणार्‍या रुग्णांपैकी ९७ टक्के रुग्ण हे कायमस्वरूपी बरे होतात. एकदा कॅन्सरचे निदान झाले की पूर्ण उपचार घेण्यची गरज असते. उपचार अर्ध्यावर सोडणारे रुग्ण वाचणे कठीण असते. काही लोक अंधश्रध्देला बळी पडून उपचार अर्ध्यावर सोडून देतात. असे करू नये असे ते म्हणाले.
कॅन्सरची लस
लवकरच कॅन्सरची लस येऊ घातलेली असून ती टोचून घेणार्‍याना गर्भाशयाच्या कॅन्सरसह अन्य काही प्रकारच्या कॅन्सरपासून मुक्ती मिळू शकेल, असे ते म्हणाले.