एका प्रश्‍नाला अनेक उत्तरे शक्य : डॉ. माशेलकर

0
97

शांतादुर्गा शिक्षण संस्थेच्या परिषदेचे उद्घाटन
शिकणे म्हणजे निरीक्षण करणे, आढावा घेणे आणि विश्‍लेषण करणे. एका प्रश्‍नाला एकाच प्रकारचे उत्तर अशी आमची शिक्षण व्यवस्था आहे ती बदलायला हवी. एका प्रश्‍नावर विविध उत्तरे असायला हवीत असे प्रतिपादन ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे केले.
कवळे येथील श्री शांतादुर्गा शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा भाग म्हणून कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. माशेलकर यांचे बीजभाषण झाले त्यावेळी ते बोलत होत. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सतीश शेट्ये, भारतीय जीवन विमा महामंडळाचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक एस. पी. एस्. विखलू, शांतादुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकुमार सरज्योतिषी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘शिक्षण आणि समाज’ या विषयावर सखोल चर्चा व्हावी व त्यातून शिक्षणाला वेगळी दीशा मिळावी या हेतूने आयोजित केलेल्या परिषदेत देशातील मान्यवर शिक्षणतज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
तंत्रज्ञान सगळ्यांना समान संधी निर्मा करते असे स्पष्ट करून डॉ. माशेलकर म्हणाले, कमी वयाच्या मुलांनी एखादी गोष्ट केली तर ती कमी लेखू नये किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नये. गोव्याने खूप वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व स्वीकारले आहे. गोव्याने इतर राज्यांशी स्पर्धा करायची गरज नाही, गोवा आज खूप पुढे आहे, असे ते म्हणाले.
श्रीपाद नाईक यांनी सांगितले की आज आपल्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणार्‍या शिक्षणाची गरज आहे. युवक पदवीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरी मिळविण्यासाठी धडपडतात आणि नोकरी मिळाली नाही की निराश होतात. श्री शांतादुर्गा शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला व वैयक्तिक जीवनात उपयोगी पडणार्‍या व्यवहारिक शिक्षणाशी आजच्या शिक्षणाची सांगड घालण्याची गरज व्यक्त केली. यावेळी डॉ. सतीश शेटये, श्री. विखलू यांनीही आपले विचार व्यक्त केले. श्रीकुमार सरज्योतिषी यांनी स्वागत केले. सिध्दी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.