बंद पडलेल्या कोकणी शाळांमध्ये रोमन लिपीतील कोकणी शिकवा

0
98

>> विष्णू वाघ यांची विधानसभेत मागणी

 

कोकणी माध्यमातील प्राथमिक शाळा बंद पडण्याचे कारण महत्त्वाचे आहे. देवनागरी लिपीतील कोकणी त्या शाळांतील विद्यार्थ्यांना कठीण झाली. रोमन लिपीतून शिकवले असते तर त्या शाळांमध्ये इंग्रजी आली नसती, असे सांगून रोमन लिपीतील कोकणी त्या शाळांमध्ये शिकवावी, अशी मागणी सांत आंद्रेचे आमदार विष्णू सुर्या वाघ यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी केली.
सध्या शैक्षणिक माध्यमाचा जो घोळ निर्माण झाला आहे, तो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घातलेला नाही. त्यांना या घोळाला तोंड द्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. अनुदानाचा विचार करताना सरकारने राज्यातील उर्दू व कानडी माध्यमातील शाळांचाही विचार करावा.
कोकणी व मराठीबरोबरच वरील प्रादेशिक भाषांतील शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी नियमात दुरुस्ती करावी, अशी मागणी वाघ यांनी केली. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

दिगंबर कामत यांचा इशारा

माध्यमप्रश्‍नी निर्णय लांबणीवर
टाकल्यास गंभीर परिणाम
शिक्षण माध्यम प्रश्‍नावर राज्यात आंदोलन सुरू आहे. यासंबंधीचे विधेयक निवड समितीकडे आहे. सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. निर्णय आणखी लांबणीवर टाकल्यास गंभीर समस्या निर्माण होईल, असा इशारा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी दिला. क्रीडापटूंना परीक्षेत गुण दिले जातात. त्याच धर्तीवर कला क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना गुण देण्याची मागणी त्यांनी केली.