बंदर आरोग्य अधिकार्‍यास लाच स्वीकारताना अटक

0
93

भ्रष्टाचार प्रतिबंधक पोलीस पथकाने केलेल्या एका कारवाईत काल सकाळी बंदर आरोग्य अधिकार्‍यास ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मुरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गुन्हा अन्वेषणच्या अधिकार्‍याने तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले.

सडा येथील भारतीय अन्न महामंडळाचे बंदर आरोग्य संघटनेचे कार्यालय असून डॉ. के. आर. शिवाडीकर या कार्यालयात बंदर आरोग्य अधिकारी म्हणून आहेत. त्यांनी तक्रारदारांकडून ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर आरोपीने तक्रारदारास मुरगाव बंदरात आपल्या कार्यालयात पैसे घेऊन बोलाविले. त्यानुसार केंद्रीय गुन्हा अन्वेषण खात्याचे निरीक्षक निलेश शिरोडकर यांनी सापळा रचून आरोपीला तक्रारदारांकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ खाली गुन्हा नोंदविला असल्याचे सांगण्यात आले.