बंगालमधून तृणमूल, पंजाबातून आप स्वबळावर

0
14

>> लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीतून तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच पंजाबमधून आपनेही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत मोठी बिघाडी झाली असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसची सध्या भारत न्याय यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मात्र या यात्रेचा उलटा परिणाम बंगालमध्ये दिसून आला. ममता बॅनजी यांनी ही यात्रा सुरू असतानाच स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे.

स्वबळावर लढणार
ममता बॅनर्जी यांनी इिंया आघाडीतून माघार घेताना तृणमूल काँग्रेस पक्ष एकटाच भाजपला पराभूत करु शकतो असे सांगितले आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच ममता बॅनर्जी यांनी, आगामी निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणा करत सर्व घटक पक्षांना मोठा धक्का दिला आहे. ममता बॅनर्जींनी तडकाफडकी एवढा मोठा निर्णय घेण्याचे कारण राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा असल्याचे मानले जाते. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमधून जाणार आहे, मात्र आम्हाला याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नसल्याची खंत ममता बॅनर्जी यांनी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी आजवर अनेकदा ममता बॅनर्जींविरोधात जोरदार टीका केलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी उद्या एखाद्या अधिकाऱ्याचा खूनही होऊ शकतो, असे म्हणत चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली होती.

भाजपचा सल्ला
भाजपने या दरम्यान, राहुल गांधींना भारत जोडो सोडा, इंडिया आघाडी जोडो यात्रा काढा, असा खोचक सल्ला दिला आहे. दरम्यान, भाजपने 2019 साली जिंकलेल्या 303 लोकसभेच्या जागांमध्ये पश्चिम बंगालमधील 18 जागांचा समावेश होता. आताही ममता बॅनर्जींनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

आपचा प्रत्येक जागेवर पर्याय
आम आदमी पक्षाने प्रत्येक जागेवरील उमेदवारांसाठी 3 पर्याय निवडले आहेत. आता या उमेदवारांबाबत पक्ष सर्वेक्षण करणार आहे. तसेच जनतेच्या पसंतीस उतरलेल्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे आपने सांगितले.

पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर असून काँग्रेस विरोधी पक्ष आहे. हे दोघे एकत्र आल्यास विरोधी पक्ष हा मुद्दा गांभीर्याने उपस्थित करतील. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांना कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू ‘आप’सोबत युती करण्याच्या बाजूने आहेत, तर काँग्रेसचे प्रमुख राजा वाडिंग विरोध करत आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसही आपसोबत युती करण्यास तयार नाही. फक्त नवज्योत सिद्धू याचे समर्थन करत आहेत. याशिवाय काँग्रेस संघटनेतील बडे नेतेही ‘आप’सोबत युती करून निवडणूक लढवण्याच्या कल्पनेला विरोध करत आहेत. त्यामुळे काँग्रेसनेही पंजाबमध्ये उमेदवारांचा शोध सुरू केला आहे.

पंजाबमध्ये ‘आप’ स्वबळावर
आम आदमी पक्षानेही पंजाबमधील सर्व 13 जागांवर एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यासाठी ‘आप’ने तयारी पूर्ण करताना लोकसभेच्या 13 जागांसाठी 40 नावांची यादीही तयार केली आहे. यावेळी त्यांनी काही जागांवर पर्याय ठेवले आहेत. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे. या बैठकीत आपचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही आप हा निर्णय मांडणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सल्ला सातत्याने देत असून आप लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये 13 पैकी 13 जागा जिंकेल असा दावा केला आहे.

आघाडीवर टीका
ममता बॅनर्जीं यांनी इंडिया आघाडीला डावे नियंत्रित करतात, असा खळबळजनक आरोप करताना आपण इंडिया हे नाव सूचवूनही आता डाव्यांच्या हातात इंडिया आघाडी गेली असल्याची टीका केली आहे. ज्यांच्याविरोधात 34 वर्ष लढा दिला, त्या डाव्यांसोबत आम्ही राहू शकत नाही, असे म्हणत ममता बॅनर्जींनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.