बँक बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

0
70

सार्वजनिक क्षेत्रातील बँकातील कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून याच्या निषेधार्थ काल राज्यातील बँक कर्मचार्‍यांनी संप पुकारला. त्याला राज्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी बँका पूर्णपणे बंद होत्या तर काही शहरात दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू होते.

केंद्र सरकारने बँकांसंदर्भात घेतलेले निर्णय कर्मचार्‍यांच्या विरोधात असल्याने त्या विरुद्ध गेल्या दोन दशकापासून बँक कर्मचारी लढा देत आहेत, पण सरकारने आजपर्यंत बँक कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष करून अजूनही ठोस पावले उचलली नाहीत. सरकारी बँकांचे खासगीकरण रोखावे, कर्जप्रकरणी थकबाकीदारांवर कारवाई करण्यात यावी आणि नोटाबंदीच्या कालावधीत अधिक तास काम केलेल्या बँक कर्मचार्‍यांना भत्ता देण्यात यावा, यासारख्या अनेक प्रमुख मागण्या आहेत. याव्यतिरिक्त बँक क्षेत्रात कामगार संघटना करण्यास व संप करण्यास विरोध होत आहे. बँक कर्मचार्‍यांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे. बँकांची काही कामे आउटसोर्सिंग करण्यास देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या या कामगारविरोधी धोरणाला देशातील बँक कर्मचार्‍यांनी विरोध दर्शवून काल देशव्यापी संप पुकारला.
वास्कोत १०० टक्के बंद
बँकांनी काल मंगळवारी पुकारलेल्या संपात वास्कोतून १०० टक्के प्रतिसाद मिळाला. काहींना याची पूर्वकल्पना होती तर काहींना याची कल्पना नसल्यामुळे बँकांजवळ आल्यावर बँक बंद पाहून माघारी परतावे लागले. काहींनी बँका बंद असल्यामुळे एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण काही ठिकाणी एटीएमही बंद असल्याने अनेकांना पैशांविना दिवस काढावा लागल्याचे चित्र दिसत होते.