विधानसभा अधिवेशनाचा सोपस्कार

0
86

>> केवळ राज्यपालांचे अभिभाषण, २६ सदस्यांची उपस्थिती

 

गोवा विधानसभेचे एक दिवशीय अधिवेशन काल अल्पकाळात संपन्न झाले. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या दोन पानी अभिभाषणाशिवाय विधानसभेत अन्य कोणतेही कामकाज झाले नाही.
विधानसभेचे शेवटचे अधिवेशन होऊन सहा महिन्यांचा काळ पूर्ण होण्यापूर्वी अधिवेशन घेणे हे घटनेच्या कलम १७४ (१) नुसार बंधनकारक असल्याने विधानसभेचे हे अधिवेशन काल घेण्यात आल्याचे डॉ. सिन्हा यांनी यावेळी सांगितले. गोवा विधानसभेचे शेवटचे अधिवेशन ३१ ऑगस्ट २०१६ रोजी घेण्यात आले होते. काल एका दिवसाचे अधिवेशन बोलावून सहा महिन्यांचा काळ पूर्ण होण्यापूर्वी पुन्हा अधिवेशन घ्यायला हवे असे घटनेत जे बंधन आहे त्याची पूर्तता या अधिवेशनामुळे होणार असल्याचे डॉ. सिन्हा यांनी सांगितले.
पुढे बोलताना डॉ. सिन्हा म्हणाल्या की दि. ४ फेब्रुवारी रोजी गोव्यात विधानसभेसाठीच्या निवडणुका झाल्या. ८३ टक्के एवढे जे मतदान झाले त्यासाठी राज्यातील जनता अभिनंदनास पात्र आहे. निवडणुका शांततापूर्ण वातावरणात घडवून आणण्यास सरकारला यश आल्याबद्दल सरकारही अभिनंदनास पात्र असल्याचे डॉ. सिन्हा यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात सरकारने काही चांगली धोरणे राबवल्याचाही उल्लेख यावेळी डॉ. सिन्हा यांनी केला.
अभिभाषणाने प्रारंभ
सकाळी ११.३० वा. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरवात झाली. हे अधिवेशन म्हणजे केवळ औपचारिकपणा असल्याचे डॉ. सिन्हा यांनी प्रारंभीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले. गोवा विधानसभेचे शेवटचे अधिवेशन झाले, त्या घटनेला सहा महिन्यांचा काळ पूर्ण होत आलेला असून तो पूर्ण होण्यापूर्वी अधिवेशन घेणे हे बंधनकारक असल्यानेच हे अधिवेशन बोलावण्यात आले असल्याचे त्यांनी अभिभाषणातून स्पष्ट केले.
अधिवेशनात अभिभाषण व राष्ट्रगीतच
त्यांचे सव्वादोन पानी अभिभाषण तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात संपले. तद्नंतर राज्यपाल सभागृहातून निघून जाताना त्यांना बाहेरपर्यंत सोडण्यास सभापती अनंत शेट, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व काही मंत्रिगण सभागृहाबाहेर गेले. तद्नंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज पुढे नेले ते केवळ राष्ट्रगीतासाठी. त्यामुळे अधिवेशनाच्या प्रश्‍नावरून सरकारला धारेवर धरण्याच्या विचारात असलेल्या विरोधकांना काहीही बोलता आले नाही. पण राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे यांनी उभे राहून सरकारने लोकशाहीची थट्टा केल्याचा आरोप केला. मात्र, ते बोलत असतानाच राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आल्याने राणे यांना आवरते घ्यावे लागले.
२६ सदस्यांचीच हजेरी
काल झालेल्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला विधानसभेच्या केवळ २६ सदस्यांचीच हजेरी होती. आजारी असलेले उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, उपसभापती विष्णू वाघ, आमदारकीचा राजीनामा दिलेले रमेश तवडकर, मॉविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर तसेच विजय सरदेसाई, बाबुश मोन्सेर्रात, नरेश सावळ, रोहन खंवटे, मिकी पाशेको, कायतानो सिल्वा, विश्वजीत राणे आदी मंडळी अधिवेशनाला हजर
नव्हती.
ढवळीकर बंधू विरोधी बाकांवर
मगो पक्षाचे नेते व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारबरोबरच्या युतीतून बाहेर पडलेले सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांना काल विरोधी बाकांवर बसावे लागले.