- प्रमोद ठाकूर
फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे रितेश नाईक आणि काँग्रेसचे केतन भाटीकर यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे. दिवंगत नेते रवी नाईक यांनी फोंड्यात फुलवलेले कमळ त्यांचे पुत्र रितेश नाईक कायम ठेवतात की केतन भाटीकर वा ‘आप’चे गीतेश नाईक वर्चस्व गाजवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री, फोंड्याचे आमदार, कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी नवा आमदार निवडण्यासाठी येत्या 9 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत नेते रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेस पक्षाने केतन भाटीकर आणि आम आदमी पार्टीने गीतेश नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरले आहे. निवडणूक रिंगणात तीन उमेदवार असले तरी भाजपचे रितेश नाईक आणि काँग्रेसचे केतन भाटीकर यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फोंडा विधानसभा मतदारसंघात फोंडा नगरपालिका आणि कुर्टी-खांडेपार ग्रामपंचायत क्षेत्राचा समावेश होतो. या मतदारसंघात प्रारंभीच्या काळात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) व त्यानंतर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. गेल्या निवडणुकीत रवी नाईक यांनी फोंडा मतदारसंघ काबीज करून प्रथमच भाजपचे ‘कमळ’ फुलविले होते. दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे एक चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जात. त्यांनी बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या राजकीय पक्षांत प्रवेश करून राजकारणातील आपले वर्चस्व शेवटपर्यंत अबाधित ठेवण्यात यश मिळविले होते. रवी नाईक फोंडा मतदारसंघातून एकूण सहा वेळा निवडून आले, तर त्यांना 2012 च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. तसेच मडकई मतदारसंघातून ते एक वेळा निवडून आले होते. मगोप, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हांवरून फोंडा मतदारसंघातून रवी नाईक निवडणूक आले होते. 1984 मध्ये ‘मगोप’च्या तिकिटावरून फोंडा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले होते. फोंडा मतदारसंघात रवी नाईक यांचा पराभव करण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना रवी नाईक यांच्या विरोधात उभे करून मतदारसंघ खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रवी नाईक यांना पराभूत करणे शक्य झाले नाही. रवी नाईक चार वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून निवडून आले. 2022 च्या निवडणुकीपूर्वी रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना फोंडा मतदारसंघात उमेदवारी दिली. भाजपला कित्येक वर्षे फोंड्यात कमळ फुलविणे शक्य झाले नव्हते. तथापि, रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच झटक्यात फोंड्यात भाजपची निशाणी असलेले कमळ फुलविण्यात यश मिळविले.
फोंडा मतदारसंघात काँग्रेस, भाजप व मगोप या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. गोवा विधानसभेच्या 2022 साली झालेल्या निवडणुकीत रवी नाईक हे केवळ 70 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी मगोपचे केतन भाटीकर यांनी रवी नाईक यांच्याशी कडवी झुंज दिली होती. त्या निवडणुकीत रवी नाईक यांना 7,514 मते मिळाली, तर केतन भाटीकर यांना 7,437 मते मिळाली होती. काँग्रेसचे राजेश वेरेकर यांना 6,839 मते, आरजीपीला 1,770 मते, तर ‘आप’ला 620 मते मिळाली होती.
केतन भाटीकर यांनी वर्ष 2022 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही फोंडा मतदारसंघात आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. ‘मगोप’ने भाजपशी आघाडी केल्याने केतन भाटीकर यांनी ‘मगोप’पासून फारकत घेतली. राज्यातील डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत केतन भाटीकर यांनी कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघात उमेदवार उभा केला होता. केतन भाटीकर यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला या निवडणुकीत 5,636 मते मिळाली. त्याने भाजपच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली. भाजपच्या उमेदवाराला 6,494 मते मिळाली, तर राजेश वेरेकर यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला 1,876 मते मिळाली. ‘मगोप’ पक्षापासून फारकत घेतल्यानंतरही केतन भाटीकर यांनी आपल्या उमेदवाराला भरघोस मते मिळविण्यात यश मिळविले. फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केतन भाटीकर यांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाने फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी एकमताने केतन भाटीकर यांना उमेदवारी दिली आहे. केतन भाटीकर यांनी 2017 साली ‘गोवा सुरक्षा मंच’च्या उमेदवारीवरून पणजी मतदारसंघातून प्रथम निवडणूक लढविली. काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी केतन भाटीकर यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. केतन भाटीकर यांनी फोंड्यात आपल्या प्रचाराला जोर लावला आहे.
भाजपने दिवंगत नेते रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र, फोंड्याचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक रितेश नाईक यांना उमेदवारी दिली आहे. रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर फोंडा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ दळवी व इतर काही जणांनी नाराजी व्यक्त केली होती; मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारीच्या प्रश्नावरून निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात यश मिळविले आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रितेश नाईक यांच्या प्रचारासाठी कार्यरत झाले आहेत.
आम आदमी पार्टीने गीतेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ‘आप’ पक्षातसुद्धा उमेदवारी विषयावरून बरेच राजकारण झाले. ‘आप’चा एक कार्यकर्ता उमेदवारीसाठी इच्छुक होता. त्याला बाजूला ठेवून ‘आप’ने गीतेश नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. ‘आप’च्या नेत्यांनीही फोंडा मतदारसंघात आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
मगोपने भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांना पाठिंबा जाहीर करून भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. मगोपचे ज्येष्ठ नेते, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मगोपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक प्रचाराबाबत मार्गदर्शन केले आहे.
भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांच्या प्रचारात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री, आमदार सहभागी होत आहेत. रितेश नाईक यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे.
फोंडा मतदारसंघात निवडणूक प्रचार जोरात सुरू झालेला आहे. भाजप, मगोप, काँग्रेस, ‘आप’चे उमेदवार आणि कार्यकर्ते घरोघरी भेट देऊन प्रचार करीत आहेत. समाजमाध्यमांवरूनसुद्धा निवडणूक प्रचार केला जात आहे. समाजमाध्यमांतून एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
भाजपच्या उमेदवारीसाठी रितेश नाईक यांच्याबरोबर विश्वनाथ दळवीही इच्छुक होते. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रितेश नाईक यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले विश्वनाथ दळवी बरेच नाराज झाले. फोंडा मतदारसंघात विश्वनाथ दळवी गेली कित्येक वर्षे भाजप संघटना मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मिळेल अशी ते अपेक्षा बाळगून होते. पण विश्वनाथ दळवी यांचा उमेदवारीच्या प्रश्नावरून अपेक्षाभंग झाला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी विश्वनाथ दळवी यांच्याशी उमेदवारीच्या विषयावरून चर्चा करून बंड न करण्याची विनंती केली. विश्वनाथ दळवी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन पोटनिवडणुकीतील उमेदवारीच्या प्रश्नावर चर्चा केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विश्वनाथ दळवी यांची समजूत काढण्यात यश मिळविले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विश्वनाथ दळवी यांच्याशी चर्चा करून त्यांना काही आश्वासने दिली आहेत. त्यानंतर विश्वनाथ दळवी यांनी भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांना पाठिंबा देण्याचे जाहीर वक्तव्य केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विश्वनाथ दळवी यांना दिलेल्या आश्वासनाचा उलगडा आगामी काळात होणार आहे. विश्वनाथ दळवी यांनी भाजपच्या विरोधात बंड करून त्यात यशस्वी न झाल्यास ते गोत्यात येण्याची शक्यता होती. झाकली मूठ सव्वा लाखाची अशी एक म्हण आहे. या म्हणीप्रमाणे विश्वनाथ दळवी यांनी माघार घेणे पसंत केले आहे. आगामी काळात भाजपच्या उमेदवारीसाठी मजबूत दावा ते करू शकतात.
केतन भाटीकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी काँग्रेसचे राजेश वेरेकर व काही स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर अखेर राजेश वेरेकर यांनी माघार घेऊन केतन भाटीकर यांना पाठिंबा जाहीर केला.
भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकजूट व्हावे, असा विचार मांडला जातो. तथापि, हा विचार कृतीमध्ये येत नाही. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट हवी असे मत ‘आप’चे आमदार व्हेंन्झी व्हिएगश, नवनिर्वाचित अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे फोंडा पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उभा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण ‘आप’ने फोंंडा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून एकजुटीच्या संकल्पनेला तूर्त नकार दिल्याचे दिसून येते. ‘आप’ने जिल्हा पंचायत निवडणुकीतसुद्धा ‘एकला चलो रे’चा निर्णय घेऊन अनेक मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. ‘आप’चा केवळ 1 उमेदवार निवडून आला. विरोधी पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने भाजपला फायदा झाला होता. तरीही विरोधी पक्षातील नेत्यांना एकजुटीचे महत्त्व पटत नाही.
फोंडा पोटनिवडणुकीसाठी ‘आरजीपी’ आणि ‘गोवा फॉरवर्ड’ या पक्षांनी उमेदवार उभा केला नाही. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ‘आरजीपी’, ‘गोवा फॉरवर्ड’च्या नेत्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. केवळ नाममात्र पाठिंबा जाहीर करून काहीच साध्य होत नाही. सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजप दबावाखाली येऊ शकतो. पण विरोधी पक्षांमध्ये भाजपवर दबाव आणण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे.
राज्याच्या अनेक भागांत विकास प्रकल्प व इतर मुद्द्यांवरून आंदोलन केली गेली. विरोधी पक्षाचे नेते राज्यात आंदोलन करणाऱ्या नागरिकांचा विश्वास संपादन करू शकले नाहीत. त्यामुळे विविध प्रश्नांवरून आंदोलन करणारे नागरिक विरोधी पक्षातील नेत्यांवर विश्वास ठेवत नाहीत, असे दिसून येते.
भाजपने 2027 च्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला अजून लागलेले नाहीत असेच चित्र दिसत आहे. विरोधी पक्षाने भाजपसमोर आव्हान उभे करण्यासाठी आत्तापासून प्रयत्न सुरू करायला हवे होते. फोंडा पोटनिवडणूक एकजुटीने लढवायला हवी होती. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही असेच दिसून येते. त्यामुळे आगामी 2027 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीच्या शक्यतेबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. गत 2025 च्या जिल्हा पंचायत निवडणुकीपासून विरोधक बोध घेणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजप, काँग्रेस यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आणि काहींनी नाराजीचा सूर लावला. मात्र वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर नाराजी दूर होऊन उमेदवारीला विरोध करणाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला. मात्र त्यांच्या अंतर्गत गोष्टींचा थांगपत्ता लागू शकत नाही. पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच कुणी कुणी पक्षासाठी काम केले याचा उलगडा होऊ शकतो.
फोंडा पोटनिवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. फोंडा मतदारसंघात फिरत्या गस्ती पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. फोंडा मतदारसंघात संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश नाही. सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ईव्हीएम’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून ती कडक सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना घरोघरी जाऊन पोस्टल मतपत्रिकांचे वितरण केले आहे.
फोंडा विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंतचे आमदार
वर्ष 1963 – गजानन रायकर (मगोप), वर्ष 1967 – शशिकला काकोडकर (मगोप), वर्ष 1972 आणि वर्ष 1977 – रोहिदास नाईक (मगोप), वर्ष 1980 – ज्योईल्द आगियार, वर्ष 1984 – रवी नाईक (मगोप), वर्ष 1989 आणि 1994 – शिवदास वेरेकर (मगोप), वर्ष 1999, 2002 आणि 2007 – रवी नाईक (काँग्रेस), वर्ष 2012 – लवू मामलेदार (मगोप), वर्ष 2017 – रवी नाईक (काँग्रेस), वर्ष 2022 – रवी नाईक (भाजप)