‘फेव्हरिट’ मैदानावर द.आफ्रिकेचा कस

0
142
Indian bowler Kuldeep Yadav (2R) celebrates the dismissal South African batsman Kagiso Rabad (not in picture) during the second One Day International cricket match between South Africa and India at Centurion cricket ground on February 4, 2018 in Centurion. / AFP PHOTO / GIANLUIGI GUERCIA

>> भारताविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना आज

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज न्यूलँड्‌सच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये यजमानांचे हे सर्वांत आवडते मैदान असून या मैदानावर ३३ पैकी २८ सामन्यांत त्यांनी विजय मिळविला आहे. परंतु, फिरकी व दुखापती यामुळे त्रस्त असलेल्या द. आफ्रिकेला आपल्या फेव्हरिट मैदानावर जिंकण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागणार हे मात्र नक्की. पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी भारताने घेतली असल्याने यजमानांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
फाफ ड्युप्लेसिस, एबी डीव्हिलियर्सनंतर क्विंटन डी कॉक दुखापतग्रस्त झाल्यामुळे संकटात सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेची डोकेदुखी युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीने अधिक वाढवली आहे. खेळपट्टी

फिरकीला पोषक नसतानादेखील त्यांचे भिंगरीसारखे वळणारे चेंडू दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या दोन्ही सामन्यातील पराभवाचे प्रमुख कारण ठरले होते. चेंडूला उंची देऊन फलंदाजाला फशी पाडण्याची चहलची कला व मनगटाच्या बळावर फलंदाजाला गोत्यात आणण्याचे कुलदीपकडे असलेले कसब दक्षिण आफ्रिकेच्या पतनासाठी कारणीभूत ठरले आहे. यातच त्यांचा प्रमुख फिरकीपटू इम्रान ताहीर दोन्ही सामन्यात प्रभाव पाडण्यास अपयशी ठरल्याने त्यांचे प्रमुख अस्त्र निकामी झाल्याचे दिसून आले. आज होणार्‍या तिसर्‍या सामन्यात डी कॉकच्या अनुपस्थितीत कर्णधार ऐडन मारक्रम याला सलामीची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. अनुभवी खेळाडू हाशिम आमला व जेपी ड्युमिनी यांनी अधिक जबाबदारीने खेळ केला तरच यजमानांना भारतासमोर आव्हान निर्माण करणे शक्य होणार आहे. या दोघांचा ढासळलेला फॉर्मदेखील भारताच्या पथ्यावर पडू शकतो.

यष्टिरक्षक फलंदाज हेन्रिच क्लासेन या सामन्याद्वारे आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार आहे. दुसर्‍या सामन्यात खेळताना चायनामन तबरेझ शम्सी याला तिसर्‍या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी असून त्याच्या जागेवर मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू आंदिले फेलुकवायो किंवा उपयुक्त फलंदाजीसह कामचलाऊ गोलंदाज असलेल्या फरहान बेहार्दिन यांच्यापैकी एकाला अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. भारतीय संघाचा विचार केल्यास संघात कोणताही बदल अपेक्षित नसून अंतिम क्षणी किंवा सरावादरम्यान कोणाला दुखापत झाली तरच एखादा बदल होऊ शकतो.
भारत (संभाव्य) ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल.
द. आफ्रिका (संभाव्य) ः ऐडन मारक्रम, हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, खाया झोंडो, हेन्रिच क्लासेन, फरहान बेहार्दिन, ख्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, मॉर्ने मॉर्कल व इम्रान ताहीर.