फुटिरांचा विजय

0
172

कर्नाटकमधील विधानसभेच्या पंधरा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने काल निर्विवाद अग्रेसरत्व सिद्ध केले. परंतु कुमारस्वामी सरकार पाडत केवळ स्वार्थासाठी भाजपमध्ये सामील झालेल्या कॉंग्रेस व जेडीएसमधील या फुटिरांना जनतेने पुन्हा निवडून देणे हे केवळ उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याच्या मतदारांच्या मतलबी प्रवृत्तीमुळेच घडून आलेले आहे. त्यामुळे या विजयात शेखी मिरवण्यासारखे संबंधितांपाशी काही नाही. स्वार्थासाठी सरकार पाडून दुसर्‍या पक्षात सामील होणार्‍या फुटिरांना मतदारांनी उदार अंतःकरणाने स्वीकारले एवढाच त्यांच्या या विजयाचा अर्थ आहे. मतदारांना शेवटी हवा असतो तो केवळ आपल्या मतदारसंघाचा विकास आणि त्यासाठी हवे असते ते स्थिर सरकार. कर्नाटकासारख्या राज्यामध्ये तर खेड्यापाड्यांमधून विकासाची वानवाच आहे. त्यामुळे पोटनिवडणुकांमधून सत्ताधार्‍यांच्या बाजूने कौल देण्याची मतदारांची सहजप्रवृत्ती असते. त्यामुळे कर्नाटकात सध्या सत्तारूढ असलेल्या येडीयुराप्पांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला स्थैर्य देण्यासाठी व त्यातून आपल्या पदरी आनुषंगिक लाभ पाडून घेण्यासाठीच मतदारांनी या पक्षबदलू फुटिरांच्या पारड्यात निरुपायाने मते टाकलेली आहेत असे दिसते. येडीयुराप्पांचे हे सरकार मागल्या दाराने स्थापन झालेले आहे याकडेही मतदारांनी त्यामुळे सोईस्कर कानाडोळा केला आहे. या पोटनिवडणुकीत पक्ष बदलून उभ्या राहिलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी यापूर्वी कॉंग्रेस किंवा जेडीएसच्या तिकिटावर या मतदारसंघातून निवडणुका लढविल्या होत्या आणि काहींनी तर सातत्याने जिंकल्याही होत्या. म्हणजेच हे त्यांचे पारंपरिक मतदारसंघ आहेत आणि त्यावर आजवर त्यांचे प्राबल्य प्रस्थापित झालेले आहे. दोन तीन निवडणुकांतून निवडून येत असलेल्यांचा पुन्हा विजय होण्यामागे त्यांच्या वैयक्तिक करिष्म्याचा वाटाही मोठा असतो. या पोटनिवडणुकीतही तेच घडले आहे. शिवाय भारतीय जनता पक्षाचे एकूण संख्याबळ लक्षात घेता त्यांच्या तिकिटावर उभे राहिलेल्या उमेदवारांना निवडले तर स्थिर सरकार तरी लाभेल व विकासाची गंगा दारी येईल हा विचारही मतदारांनी केलेला असू शकतो. परंतु नैतिकतेच्या कसोटीवर विचार केला तर हे जे पक्षबदलू या पोटनिवडणुकांतून विधानसभेवर पुन्हा निवडून आलेले आहेत, त्यांचे हे यश अनैतिकतेच्या पायावरच उभे असलेले दिसेल. निव्वळ स्वार्थासाठी या मंडळींनी कुमारस्वामी सरकारविरुद्ध बंड केले आणि रातोरात भाजपाच्या गोटात सामील झाले. कुमारस्वामी सरकार पाडताना सतरा लोक फुटले होते. पोटनिवडणुका केवळ पंधरा जागांवर झाल्या आहेत. दोन मतदारसंघांतील पोटनिवडणूक सर्वोच्च न्यायालयात गैरप्रकारांचे स्वतंत्र खटले असल्याने प्रलंबित आहेत. विधानसभेचे सभापती रमेशकुमार यांनी या पक्षबदलु महाभागांना अपात्र ठरविले आणि सन २०२३ पर्यंत फेरनिवडणूक लढवण्यास मनाईही केली. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची अपात्रता कायम ठेवली. मात्र पुन्हा निवडणुकीस उभे राहण्याचा त्यांचा हक्क अबाधित ठेवला. त्या पळवाटेचा फायदा घेऊन हे सारे महाभाग भाजपच्या वतीने या पोटनिवडणुकीत उभे राहिले आणि जिंकले आहेत. त्यांचा हा विजय लोकशाहीला गौरवास्पद म्हणता येत नाही. उलट या लोकांनी लोकशाहीचे धिंडवडेच काढले आहेत. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर जेडीएस आणि कॉंग्रेस एकमेकांवर खापर फोडत एकमेकांपासून वेगळे झाले. ते या पोटनिवडणुकीत एकत्र नव्हे, तर स्वतंत्रपणे लढले होते हेही येथे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्राप्रमाणे कॉंग्रेस – जेडीएसने भाजप उमेदवारांचा पराभव करण्याचा चंग बांधला असता तर निकाल काही वेगळे लागू शकले असते, परंतु स्वतंत्रपणे लढण्यामागे जेडीएसची स्वार्थी वृत्तीच दिसून आली. स्वतः किंगमेकर होण्याच्या लालसेनेच जेडीएसने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढणे पसंत केले. म्हणजे भाजप असो वा कॉंग्रेस, ज्याच्यासोबत जाण्याने शेवटी सत्ता हस्तगत होईल त्याच्या बाजूने उभे राहायचे असा हा डाव होता, जो मतदारांनी उधळून लावला आहे. कर्नाटकमधील येडीयुरप्पा सरकारला स्थैर्यासाठी किमान सात जागांची आवश्यकता होती. परंतु विजयी उमेदवारांची मोठी संख्या हा आता येडीयुरप्पांसाठी दिलासा नव्हे, तर डोकेदुखी ठरणार आहे, कारण या सगळ्या फुटिरांना कॅबिनेट मंत्रिपदांची आश्वासने देऊन भाजपामध्ये आणले गेलेले होते. त्यामुळे आता या सर्वांना कॅबिनेट मंत्रिपदी कसे सामावून घ्यायचे हा भाजपपुढील मोठा प्रश्न असेल. शिवाय अन्य पक्षांतून आलेल्या या फुटिरांमुळे भाजपमध्ये निष्ठावंतांची नाराजी निर्माण झालेली आहे ती वेगळीच. भाजप खासदाराचे एक पुत्र तर या निवडणुकीत अपक्ष उभे ठाकले होते. कॅबिनेट मंत्रिपदांवरून पुन्हा नाराजीनाट्ये रंगली तर त्याचा फायदा घेऊन हे सरकारही अस्थिर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तूर्त येडीयुराप्पा सरकार या विजयामुळे तरले आहे, परंतु आपला कार्यकाळ ते यशस्वीपणे पूर्ण करू शकेल की पुन्हा कर्नाटकात स्वार्थाचे नवे नाटक रंगेल याबाबत मात्र अनिश्‍चिताच राहील!