गोवा दुसर्‍या दिवशी मजबूत स्थितीत

0
162

>> अमित वर्मा, स्नेहल कवठणकरची शतके

कर्णधार अमित वर्मा आणि स्नेहल कवठणकर यांच्या दमदार अर्धशतकांमुळे गोव्याने पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या सिक्किमविरुद्धच्या प्लेट गट रणजी चषक सामन्यांत दुसर्‍या दिवशी आपली स्थिती मजबूत केली आहे.

काल दुसर्‍या दिवशी ३ बाद १२४ धावांवरून पुढे खेळताना गोव्याने आपला पहिला डाव ६ बाद ४३६ धावांवर घोषित केला. त्यामुळे गोव्याने आपल्या पहिल्या डावात ३०० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. कर्णधार अतिम वर्मा (१६ चौकारांनिशी १९२ चेंडूत ११३) आणि स्नेहल कवठणकर (२३ चौकारांसह २३९ चेंडूत १४३) यांनी दमदार शतके नोंदविली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण १८४ धावांची भागीदारी केली. अमित वर्मा तंबूत परतल्यानंतर स्नेहल आणि सुयश प्रभुदेसाई यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. सुयशने आक्रमक फलंदाजी करताना १२ चौकारांच्या सहाय्याने ९८ चेंडूत ९१ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचे शतक ९ धावांनी हुकले.

प्रत्युत्तरात ३०० धावांच्या पिछाडीवरून पुढे खेळताना सिक्किमने आपल्या दुसर्‍या डावात दिवसअखेरपर्यंत २२ धावांत २ गडी गमावले आहेत. ते अजून २७८ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे गोव्याला रणजी मोसमातील हा पहिलाच सामना जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आलेली असून सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत.

-: संक्षिप्त धावफलक :-
सिक्किम, पहिला डाव ः १३६. गोवा पहिला डाव ः (३ बाद १२४वरून पुढे) ६ बाद २३६ घोषित, (अमित वर्मा ११३, स्नेहल कवठणकर १३४, सुयश प्रभुदेसाई ९१, दर्शन मिसाळ नाबाद ११ धावा. ईश्वर चौधरी २-९६, पाल्जोर तामंग १-८४, भुषण सुब्बा १-२५, इक्बाल अब्दुल्ला १-१२७, ली योंग लेपचा १-६३ बळी), सिक्किम, दुसरा डाव ः ८ षट्‌कांत २ बाद २२, निलेश लामिछाने नाबाद १० धावा. दर्शन मिसाळ आणि अमुल्य पांड्रेकर प्रत्येकी १ बळी).