Home Featured दीपक केसरकरांच्या ‘पीए’सहचौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद

दीपक केसरकरांच्या ‘पीए’सहचौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंद

0

मांद्रेतील मारहाणीच्या निषेधार्थ रोखला होता मुंबई-गोवा महामार्ग

गोव्यात पर्यटनासाठी गेलेल्या तळवडे-सावंतवाडी येथील परब कुटुंबीयांना स्थानिक तरुणांनी मारहाण केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी बांदा येथे उमटले होते. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर पत्रादेवी-बांदा सीमेजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सचिव आणि युवासेना पदाधिकारी सूरज परब यांच्यासह चौघांविरुद्ध बांदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महामार्गाच्या मध्यभागी गाडी आडवी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

रविवारी रात्री मांद्रे-मोरजी मार्गावर परब कुटुंबीयांना मारहाण झाली होती. याचे पडसाद सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बांदा येथे पाहायला मिळाले होते. सूरज परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपली कार (क्र.एमएच-10-ईआर-7008) थेट मुंबई-गोवा महामार्गावर आडवी लावली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. गाडी आडवी लावल्यानंतर त्यांनी गोव्यातील गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी मोठ्याने घोषणाबाजी करत आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बांदा पोलिसांनी सूरज प्रकाश परब (33, रा. तळवडे), संकेत शेखर परब (32, रा. सांगेली), अनिकेत शेखर परब (रा. सांगेली) आणि क्लेट्स फर्नांडिस (36, रा. सावंतवाडी) अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धनंजय नाईक करत आहेत.