फातोर्डा बस अपघातात १२ प्रवासी जखमी

0
109
फातोर्डा येथे प्रवासी बस कलंडल्यानंतर मदतीसाठी लोकांची झालेली गर्दी. (छाया : गणादीप)

काल दुपारी फातोर्डा येथील बांधकाम खात्याच्या कचेरीच्या अलिकडे खाजगी प्रवासी मीनी बसला अपघात होऊन बसमधील १२ जण जखमी झाले. जखमीत एका वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. सुदैवाने सर्व जण किरकोळ जखमावर बचावले. अपघातानंतर बसचालक तेथून फरारी झाला.
काल दुपारी जीए- ०२-टी- ४६२४ क्रमांकाची ‘मायरा’ ही खाजगी मीनी बस मडगाव येथून इत्थ द राशोल येथे निघाली होती. दुपारी ३.३० वा. फातोर्डा येथील श्री दामोदर लिंगापासून दीडशे मीटर अंतरावर ही बस एका बाजूने रस्त्यावर कलंडल्याने प्रवासी अडकून पडले. तात्काळ लोकांनी तेथे धाव घेऊन अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून ऑस्पिसियु हॉस्पिटलात नेले.जखमींमध्ये सचिंद्र नाईक, गजेंद्र नाईक (४०) सांतीमळ, श्रुती नायर (२२) बोरी, जितेंद्र चात्रिया (२४) सांतीमळ, आवेलीना पिन्हेरो (२०) राय, मनोज जीना, रुबीन फर्नांडिस (१), दितीना फर्नांडिस, सुकोरिना जुझे पियेदाद सिल्वा (५३), व्हेलंटिना जुझे सिल्वा (२४), सांजुझे आरियाल- पाद्रीभाट, मंजिता सावंत (२२) फातोर्डा, मंजुळा अयैर यांचा समावेश आहे.
अपघातानंतर शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले व रस्ता अडविला. त्यानंतर आमदार विजय सरदेसाई, वाहतूक खात्याचे सहाय्यक संचालक संदीप देसाई, पोलीस अधिकारी तेथे पोहचले. आमदार विजय सरदेसाई यांनी निष्काळजीपणे व भर वेगाने वाहन हाकणार्‍या या बसचा परवाना व बसचालक डेव्हीड डिसौझा या चालकाचा परवाना रद्द करावा अशी मागणी केली.
वाहतूक खात्याचे संदीप देसाई यांनी या बसला तंदुरुस्त परवाना जो कोणी दिला त्याची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. बसचालक डेव्हीड डिसोझा (किराभाट) हा फरारी असून तो दारूच्या नशेत होता, असे लोकांनी सांगितले. तसेच बसचे टायर्स गुळगुळीत झालेले दिसले. मडगाव पोलिसांनी चालक डेव्हीड डिसौझा याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. ही बस पीटर आल्मेदा यांच्या मालकीची आहे. या जागी काही महिन्यामागे कदंबा बस तर तीन वर्षांपूर्वी खाजगी बसला अपघात झाला होता.