फातर्पा खून : पतीस पर्वरीत अटक

0
82

कट्टा-फातर्पा येथे पत्नी जिया हिचा सुर्‍याने भोसकून खून करून मोटरसायकलने पसार झाल्याचा आरोप असलेला पती जयेश नाईक याला काल पर्वरी येथे पकडण्यात पोलिसांना यश आले.
काल सायंकाळी म्हापसा येथून येत असताना त्याला पोलिसांनी पकडले. दरम्यान, जिया हिचा मृतदेह काल उत्तरीय तपासणीनंतर भाऊ वैभव नाईक याच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, उत्तरीय तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याचे कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक राम आयरे यांनी सांगितले.
पती जयेश हा पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय घेत होता. यातून तो दररोज तिला मारहाण करीत असे. त्यातच तो बेकार असल्याने दारूसाठी त्याला पैसे मागायचा अशी माहिती मिळाली आहे.
परवा खूनाची घटना घडली त्या दिवशी जयेशने ६ वर्षांची मुलगी राजीव व चार वर्षांचा मुलगा गौरव या दोघांना बाळ्ळी येथे शाळेत सोडले. त्यानंतर सकाळीच दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. अचानक जोदार किंकाळ्या ऐकू आल्या. शेजारी घराकडे धावले असता दरवाजाला आतून कडी लावल्याचे आढळून आले. शेजार्‍यांनी तात्काळ कुंकळ्ळी पोलिसांनी संपर्क साधून बोलावले. खूनानंतर जयेशने तात्काळ बाथरूमध्ये जाऊन कपडे बदलले व मागील दरवाजातून दगडी कुंपणावरून उडी मारून जीए ०२ ८१४५ या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी त्याचा पाठलाग केला पण तो निसटून जाण्यात यशस्वी ठरला. रात्रभर पोलीस त्याला शोधत होते.
दरम्यान, खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना तीन सुरे सापडले. जियाच्या कानातील कर्णफुले, मनगटी घड्याळ तुटून जमिनीवर पडले होते व भिंत तसेच जमिनीवर रक्त सांडलेले होते. कपाटातील कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती. खून झाल्याचे समजताच जियाचा भाऊ वैभव मोहन नाईक व मामा सुदेश तोरस्कर यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांना तो गेली दोन वर्षे कसा छळ करीत होता याची माहिती दिली. त्याच्या छळाला कंटाळून जिया मुलांना घेऊन पणजी येथे नातेवाईकांकडे गेली होती. माहेरच्या मंडळीना तिला मारहाणीची खबर कित्येकदा दिली असता, तिला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता. काही दिवसांमागे तिने मडगांव येथील महिला पोलिस स्टेशनवर तक्रार नोंदविली होती पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.