‘कदंब’कडून मासिक पास देणे पुन्हा सुरू

0
107

कदंब महामंडळाने बंद केलेले मासिक पासांचे वितरण पुन्हा सुरू केले असल्याचे महामंडळाचे माहिती अधिकारी एस्. एल्. घाटे यांनी काल सांगितले.
तीन दिवसांपासून नव्याने पास वितरण सुरू करण्यात आल्यानंतर शनिवारपर्यंत ११० जणांनी पास मिळवले. नव्याने सुरू केलेले मासिक पास वितरण येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत चालू राहणार आहे.
पास देणे बंद केल्यानंतर योजनेचा आढावा घेण्यात आला, असे त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले. हा आढावा घेतला असता ३६ हजार पासधारकांपैकी तीन एक हजार पासधारकांनी आपल्या पासांचे नूतनीकरण केले नसल्याचे आढळून आले, असे घाटे म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर नव्याने मासिक पास करून घेण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांना पासांचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे घाटे म्हणाले.
एका शहरातून दुसर्‍या शहरात बदली झालेले नोकरदार, शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात येणे बंद केलेले विद्यार्थी, उद्योग धंद्यानिमित्त अल्पकाळासाठी परराज्यातून गोव्यात आलेले व नंतर गोवा सोडून आपल्या मूळ गावी गेलेले लोकही मासिक पासांचे नूतनीकरण करीत नसल्याचे पास योजनेचा आढावा घेता असता दिसून आले.
काही विद्यार्थी अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्यासाठी एका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवास करीत असतात. (उदाहरणार्थ मडगांव ते पणजी, वास्को ते पणजी, वास्को ते मडगांव) मात्र, बारावीचे शिक्षण पूर्ण झाले की त्यांचा प्रवास बंद होतो व ते मासिक पास काढणे बंद करतात. एका शहरातून दुसर्‍या शहरात बदली झालेले काही नोकरदारही पासांचे नूतनीकरण करीत नाहीत. कारण दुसर्‍या शहरात त्याला हवी तेव्हा कदंबची बस असतेच असे नाही, असे घाटे म्हणाले.
दरम्यान, पासधारकांपैकी जवळ-जवळ निम्मे लोक एपिल व मे महिन्यात प्रवास करीत नसल्याचे आढळून आल्याचे घाटे म्हणाले. महामंडळाचे जे ३६ हजार पासधारक होते. त्यात सुमारे ३-४ हजार पासधारक हे विद्यार्थी होते. काही पासधारकांना तात्पुरत्या काळासाठी पास नको असल्याचे त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कळून आल्याने त्यांचे पास ‘ब्लॉक’ करून ठेवण्यात आले आहेत, असे घाटे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना जादा कालावधीचे पास
विद्यार्थ्यांसाठी तीन महिने, सहा महिने व एका वर्षाचा पास काढण्याची सोय आहे. अन्य प्रवाशांसाठी मात्र फक्त मासिक पासाची तेवढी सोय आहे.
दरम्यान, पास योजनेखालील सर्वांत लांब पल्याच्या प्रवास हा मडगांव – पोळे असून या पासाची किंमत सर्वाधिक म्हणजे ९८० रु. एवढी आहे. तर सर्वांत कमी पल्ल्याच्या प्रवास हा मडगांव-सावर्डे असून या पासाची किंमत ३७० रु. एवढी आहे.
मासिक पासांची किंमत
पणजी – वाळपई – ८१० रु.
पणजी – मडगांव – ५४० रु.
पणजी – वास्को – ५४० रु.
फोंडा – डिचोली – ६३० रु.
पणजी – पेडणे – ५४० रु.
पणजी – सावर्डे – ८१० रु.

योजनेचा आढावा
एकूण ३६ हजार पासधारक
३ हजार जणांकडून नूतनीकरण नाही
४ हजार विद्यार्थी पासधारक
एप्रिल – मे महिन्यात निम्मे प्रवासी वापरत नाहीत पास