सेक्स स्कँडल प्रकरणात नाव समोर आल्यानंतर जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवण्णा याने जर्मनीत पळ काढला होता. आता तो भारतात येण्यासाठी जर्मनीहून निघाला आहे. म्युनिक विमानतळावरून त्याने बंगळुरूपर्यंतचा बोर्डिंग पास मिळवला आहे. काल सकाळी 11.20 वाजता त्याने विमान प्रवास सुरू केला. शुक्रवार दि. 31 मेपर्यंत तो भारतात परतेल, अशी अपेक्षा आहे. भारतात परतल्यानंतर तो थेट एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा हा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जेडीएसचा उमेदवार आहे. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात त्याने मतदान केले होते. त्यानंतर त्याच्या कथित सेक्स व्हिडिओंचा पेन ड्राईव्ह समोर आला. कर्नाटकमधील अनेक महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले असल्याचे त्या व्हिडिओतून स्पष्ट झाले. कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली. एसआयटीने सीबीआयमार्फत इंटरपोलला रेवण्णांचा ठावठिकाणा शोधण्याची विनंती केली होती. प्रज्ज्वल रेवण्णावर आतापर्यंत बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेवण्णाने काही दिवसांपूर्वी आपला एक व्हिडिओ प्रसारित केला होता, त्यातत्याने 31 मे पूर्वी एसआयटीसमोर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते.