प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

0
350

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती

प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बांबोळी येथील प्लाझ्मा बँकेला प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविड बरे झालेल्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना केले.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी, राज्यातील गंभीर आजार असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात खास विभाग सुरू करून उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मडगाव येथील ईएसआय कोविड इस्पितळामधील गंभीर कोरोना रुग्णांना उपचारार्थ गोमेकॉत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित को-मोर्बिड रुग्णांच्या वाढत्या मृत्यूच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

गोमेकॉच्या आवारात गंभीर आजार असलेल्या कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वॉर्ड क्र. १४५, क्र. १४६ आणि क्र. १४७ मध्ये खास विभाग स्थापन करून आवश्यक वैद्यकीय व्यवस्था केली जाणार आहे. अन्य आजार असलेल्या गंभीर कोविड रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सुपरस्पेशालिटी अंतर्गत उपचार केले जाणार आहेत. जुनाट आजारांच्या रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गोमेकॉच्या इतर वॉर्डापासून हा खास वॉर्ड वेगळा ठेवण्यात येणार आहे. गोमेकॉमधील डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमत्र्यांनी दिली.

मडगाव आणि फोंडा येथील कोविड इस्पितळामध्ये कोविड रुग्णांवर उपचारांसाठी नवीन वैद्यकीय यंत्रसामग्री लवकरच खरेदी केली जाणार आहे. होम आयसोलेशनला विरोध करणार्‍या गृहनिर्माण सोसायट्या व नागरिकांची गय केली जाणार नाही, असा इशारा यावेळी राणे यांनी दिला.

होम आयसोलेशनची सुविधा
राज्य सरकारने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य यंत्रणेकडून होम आयसोलेशनला मान्यता देताना सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. आयएमएच्या डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या होम आयसोलेशनला कुणीही विरोध करू नये, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

गणेश चतुर्थी वैयक्तिक
पातळीवर साजरी करा
कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी आरोग्य सुरक्षेसाठी श्रीगणेश चतुर्थी वैयक्तिक पातळीवर साजरी करावी. श्रीगणेश चतुर्थीच्या काळात शेजारी, मित्रांच्या घरी जाऊ नये. गणेश चतुर्थी श्रीगणेश जयंतीला साजरी करण्याचा पर्याय खुला आहे, असे राणे म्हणाले.

अनामत रकमेबाबत अनभिज्ञ
मडगाव येथील एका खासगी इस्पितळाकडून कोविड रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपयांची अनामत रक्कम भरण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी संबंधित प्रश्‍नावर बोलताना सांगितले.