प्रियकराला भोसकल्या प्रकरणी रिमांड

0
99

प्रियकर धोंडू रमेश कुडव (२५) मूळ न्हयभाग – पेडणे याच्या पाठीत चाकू खुपसून खून करण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपावरून प्रेयसी असलेल्या सरिता रमाकांत गावकर (२१) शिगणेव्हाळ – निरंकाल हिला फोंडा पोलिसांनी काल न्यायालयात उभे करून सात दिवसांचा रिमांड घेतला. दि. १३ रोजी तिला अटक करण्यात आली होती. धोंडू कुडव याच्यावर गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचार चालू आहेत.दोघांमध्ये प्रेमसंबंध होते व दोघेही मडकई येथे औद्योगिक वसाहतीमधील एका आस्थापनात कामाला होते. सरिताला वीज खात्यात कंत्राटी पध्दतीवर नोकरी मिळाल्याने तिने खाजगी आस्थापनातील नोकरी सोडली होती. धोंडू कुडव हा आपल्यावर दडपण आणत होता व परत मडकईला नोकरीला ये म्हणून सारखा तगादा लावत होता. आपण लवकरच लग्न करूया असे सांगून आपणाला सारखा त्रास देत होता म्हणून आपण हे कृत्य केल्याचे सरिताने जबानीत म्हटले आहे. फोंडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.