प्रादेशिक चित्रपटांना उर्जावस्था प्राप्त करून देण्याची गरज असून राज्य सरकारला हे काम हाती घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्रादेशिक चित्रपट पोचण्याची गरज असून ते कामही हाती घ्यावे लागणार असल्याचे बेनेगल यांनी स्पष्ट केले. देशात बालचित्रपट चळवळ मृत झालेली असून मुलांसाठी मोठ्या संख्येने चित्रपट तयार करण्याचे काम हाती घ्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
स्वतः कलात्मक चित्रपट तयार करणार्या बेनेगल यांनी काल मुलाखतीतून मनोगत व्यक्त करताना मात्र चित्रपट हे एक मनोरंजनाचे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. चित्रपट पहायला येणार्या प्रेक्षकांना मनोरंजनच हवे असते असे ते म्हणाले.
‘अंकुर’ या आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की, लहानपणापासून आपणाला चित्रपटाची आवड होती. कॉलेजात शिकत असताना तेथे काढण्यात येत असलेल्या पत्रिकेचा आपण संपादक होतो. त्या पत्रिकेसाठी आपण स्वतः लिहिलेल्या लघुकथेवरून ‘अंकुर’ या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिल्याचे ते म्हणाले. आपल्या गावात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ती कथा होती, असे ते म्हणाले. त्या काळी मुंबईला जाऊन चित्रपट क्षेत्रात शिरकाव करणे हे सोपे काम नव्हते. पहिल्या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन १०-१२ वर्षे भटकावे लागले. १९६० साली स्क्रिप्ट लिहिले होते. चित्रपट मात्र १९७२ सालीच होऊ शकल्याची माहिती त्यांनी दिली.
चित्रपट करण्यापूर्वी सुमारे ९०० जाहिरातपट केल्याचे ते म्हणाले. चित्रपट म्हणजे कथा सांगणे. हे कथन खूप परिणामकारक असे असावे लागते, असे ते म्हणाले.
गुरुदत्त हे आपले आवडते चित्रपट दिग्दर्शक असल्याचे ते यावेळी म्हणाले. आपल्या चित्रपटाची कथा कशी सांगावी हे दिग्दर्शकाला माहीत असायला हवे, असे ते म्हणाले.
‘भारत एक खोज’ या मालिकेला देशाबाहेरही खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले. या मालिकेच्या सीडी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
वृत्तवाहिनीसाठी लवकरच एक मालिका तयार करणार असल्याचे ते म्हणाले. काल बदलतो त्याप्रमाणे माणसालाही बदलावे लागते. ४० वर्षांपूर्वी आपण ज्या प्रकारचे चित्रपट करीत होतो त्या प्रकारचे चित्रपट आता करता येणार नसल्याचे ते म्हणाले.