प्राणवायू अभावी होणारे मृत्यू रोखा

0
79

>> उच्च न्यायालयाने राज्य सरकार, गोमेकॉला फटकारले

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोमेकॉतील अपुर्‍या प्राणवायूमुळे कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूच्या प्रश्‍नावरून राज्य सरकार आणि गोमेकॉला काल फटकारले. सरकारने प्राणवायूच्या अपुर्‍या पुरवठ्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने प्राणवायू अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये याची काळजी घेण्याचे राज्य सरकार आणि इस्पितळाला निर्देश दिला. बुधवारची रात्र ही परीक्षा घेण्याची वेळ आहे. बुधवार (१२ मे) आणि गुरूवारी (१३ मे) २४ तास गोमेकॉतील प्राणवायू पुरवठ्यावर देखरेख ठेवावी आणि एकही रुग्ण प्राणवायूच्या अभावी दगावणार नाही याची काळजी घ्यावी, असा निर्देश खंडपीठाने दिला. खंडपीठाला गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना तातडीने सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचा निर्देश द्यावा लागला.

दक्षिण गोवा वकील संघटना आणि इतरांनी राज्यातील कोविड व्यवस्थापनासंबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकांवरील सुनावणीवेळी खंडपीठाने वरील निर्देश दिला. या याचिकांवर आज गुरूवारी सुनावणी सुरूच राहणार आहे.

..हे तर संविधानाचे उल्लंघन
प्राणवायू अभावी रुग्णांचा मृत्यू होणे म्हणजे संविधानाच्या कलम २१ ते उल्लंघन आहे. आमचे काम संविधानाचे रक्षण करणे आणि सरकारचे काम लोकांचे जीव वाचविणे. प्राणवायूच्या अभावी कोणाचे मृत्यू होऊ नये याची काळजी राज्य सरकार, इस्पितळांनी घेतली पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

प्राणवायूचा तुटवडा असल्याचे मान्य
राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून गोमेकॉतील अपुर्‍या प्राणवायू पुरवठ्याची तक्रार केली जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणेकडून प्राणवायूची कमतरता नसल्याचे जाहीर केले जात होते. उच्च न्यायालयात बुधवारच्या सुनावणीवेळी डीन डॉ. बांदेकर आणि नोडल अधिकार्‍यांनी प्राणवायूचा तुटवडा असल्याचे मान्य केले.

राज्यात अनेक कोरोना रुग्णांचा प्राणवायूच्या अभावी मृत्यू होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जात आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूची वाढती आकडेवारी मोठी चिंताजनक गोष्ट आहे. आता यापुढे प्राणवायू अभावी कोणी मरणार नाही. याला आमचा प्राधान्यक्रम आहे. एकमेकांना दोष देण्याचा खेळ नंतर खेळला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने एचएफएनओ यंत्र न वापरल्याबद्दल डीन डॉ. बांदेकर यांना धारेवर धरले. जर, रुग्णांना त्याची गरज भासली असेल, तर इस्पितळ ती नाकारू शकत नाही, असे न्यायालयाने सुनावले.
गोमेकॉतील प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी दरदिवशी ७२ ट्रॉली प्राणवायूची गरज आहे. मात्र इस्पितळाला जास्तीत जास्त ५५ ट्रॉलीचा पुरवठा केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रधान सचिव पुनीत गोयल यांनी न्यायालयाला दिली.

इस्पितळाला दुपारी २ वाजता ५०० जेम्बो सिलिंडरची गरज भासते. रात्री १० वाजता २५० आणि सकाळी ६ वाजेपर्यंत आणखी २५० सिलिंडर लागतात, असे डॉ. बांदेकर म्हणाले.

डीन न्यायालयात
कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा प्राणवायू आणि त्याचा पुरवठा या विषयी तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास अपयशी ठरल्याबद्दल खंडपीठाने गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर यांना चांगलेच धारेवर धरले. बुधवारी न्यायालयाचे कामकाज तहकूब होण्यापूर्वी डीन डॉ. बांदेकर यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यास बजावले. त्यानंतर डीन डॉ. बांदेकर यांनी न्यायालयासमोर सुनावणीसाठी तातडीने उपस्थिती लावली. गोमेकॉमध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा आणि प्राणवायू पुरवठ्याची कमतरता आहे. १ हजार कोविड रुग्णांसाठी फक्त ७०० खाटा आणि पाईप केलेल्या प्राणवायूद्वारे १६० रुग्ण तर ३२० रुग्ण सिलिंडरवरील प्राणवायूवर आहेत, अशी माहिती डीन डॉ. बांदेकर यांनी दिली.